Saturday, 3 April 2021
वन्यजीवांच्या मृगयाचिन्हांचे संवर्धन कार्य नागपुरात व्हावे - पालकमंत्री
·वन्यजीव जतन व संवर्धन प्रयोगशाळेला भेट
·मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
· गोरेवाड्याच्या मृगयाचिन्हांच्या धर्तीवर विकास करण्याची ग्वाही
नागपूर दि. 3: विदर्भात पुरातन काळातील वन्यजीव प्राण्यांच्या मृगयाचिन्हांच्या (ट्रॉफीच्या) जतन व संवर्धनासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करा. तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करुन या प्रयोगशाळेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे सांगितले.
मध्य भारतातील एकमेव असलेल्या सेमीनरी हिल्स येथील वन्यजीव जतन व संवर्धन प्रयोगशाळेला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपवनसंरक्षक प्रभुदास शुक्ल, यांच्यासह माजी महानिदेशक डॉ. बी. व्ही. खरबडे, संवर्धन तज्ज्ञ लीना झिलपे-हाते, वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते यावेळी उपस्थित होते.
वन्यजीव प्राण्यांच्या ट्रॉफीचे जतन करणे, त्यांचे संवर्धन करणे आणि त्यातून भावी पिढीला याबाबतची माहिती उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. विदर्भात आणि त्यातही नागपूर येथे यामध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. येथे पुरातत्व वस्तुसंग्रहालय आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर येथे वन्यप्राण्यांच्या ट्रॉफी आहेत. त्यामुळे येथील वन्यप्राण्यांचा इतिहास जनतेला सहजपणे या ट्रॉफींच्या माध्यमातून उपलब्ध होतो. शिंगे, कागद, कपडे इतर भाग हे सर्व सद्यस्थितीत प्राथमिक अवस्थेत आहे. त्यांचे जतन व्हायला पाहिजेत. राज्यभरात जिथे जिथे आहे, त्या सर्व ट्रॉफींना एकत्र केल्यास एक चांगला ठेवा तयार होईल, अशी माहिती लीना झिलपे-हाते यांनी पालकमंत्र्यांना दिली.
मुख्यमंत्र्यांनी नुकतेच गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात येथील स्थानिक गोंडवाना आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्याच धर्तीवर या प्रयोगशाळेच्या माध्यमातून काम करता येणार असून, त्याचा संयुक्त प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री राऊत यांनी विभागाला दिल्या.
नागपूरचे स्थानिक कल्चर वाचवायचे आहे. त्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून द्या, त्यावर चांगले काम करुन स्थानिक तसेच विदेशी पर्यटकांना येथील संस्कृतीची माहिती मिळेल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment