Thursday, 22 April 2021
आग प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक ‘एसओपी’ कठोरपणे पाळण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
• दोन दिवसात अहवाल सादर करा
नागपूर दि.22 : नाशिक येथील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर विभागातील कोविड रुग्णालयांनी आग प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक एसओपी कठोरपणे पाळण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी रुग्णालयांना आज दिले.
विभागात यापूर्वी नागपूर आणि भंडारा येथील रुग्णालयांमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्व कोविड रुग्णालय प्रशासनाने आग प्रतिबंधात्मक आणि उपाययोजनांच्या साधनांची तपासणी करुन घेण्याचे निर्देश दिले असून, रुग्णालयात सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेताना काही अडचणी, शंका किंवा तक्रारी असल्यास अभियंता निलेश उकुंडे यांच्याशी संपर्क साधावा आणि पुढील दोन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या आहेत.
रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा किंवा प्लँट आणि वितरण व्यवस्थेतील आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना येणाऱ्या त्रुटी दूर कराव्यात. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नोज मास्क 20 आणि फेसशिल्ड रुग्णालयाच्या गेटवर आणि उर्वरीत अतिदक्षता विभागामध्ये पुरविण्याच्या सूचना केल्या आहेत. रुग्णालयातील सर्व इलेक्ट्रीकल फिटींग आणि त्यांच्या जोडण्या सुस्थितीत असल्याची खातरजमा करुन घ्यावी. ही जोडणी आणि फिटींग अधिकृत विद्युत अभियंत्याकडून तपासून घ्यावी. तसेच रुग्णालयात अतिरिक्त वीज जोडणी देण्यापूर्वी व्हेंटीलेटर आणि इतर बाबींसंबंधी विद्युत अभियंत्याचा सल्ला घ्यावा, असेही विभागीय आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
वातानुकुलित खोलीतील इलेक्ट्रीकल बोर्ड आणि बटनांपासून सर्व पडदे आणि ज्वलनशील पदार्थ दूर ठेवावेत. कोविडच्या अतिदक्षता विभागामध्ये ज्वलनशील पदार्थाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे अचानक आग लागल्यास त्याची तात्काळ माहिती मिळावी, यासाठीची तपास यंत्रणा सुस्थितीत असल्याचे तपासून घ्यावे. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णांना वापरण्यासाठी आयसीयु कक्षातील रुग्णसंख्येसाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचे दोन प्रतीत किमान 15 मिनिटे चालतील, असे संच भरुन ठेवावेत. तसेच ते वापरण्याबाबतचे वैद्यकीय चमूला प्रशिक्षण द्यावे.
संकटकाळात रुग्ण, नातेवाईक आणि रुग्णालयातील इतरांना सहजरित्या हलविता येईल, अशी व्यवस्था असावी. संकटकाळी बाहेर पडताना पुरेसा प्रकाश असला पाहिजे तसेच ऐनवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची पर्यायी व्यवस्था करुन ठेवावी. या काळात पुरेशा वैद्यकीय सोयी-सुविधांनीयुक्त यंत्रणा, जसे की अतिरिक्त पाणीपुरवठा, वॉटर हिटर, मोबाईल चार्जरसाठी जोडण्यांची व्यवस्था करुन ठेवावी. जेणेकरुन संकटकाळी या यंत्रणेवर अतिरिक्त ताण येवून ती ठप्प पडता कामा नये. संपूर्ण रुग्णालय इमारतीमध्ये सार्वजनिकरित्या संवाद साधता येईल, अशी ध्वनीक्षेपक यंत्रणा बसवावी. इमारतीमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्रणा हाताळणी आणि रुग्णांना हलवण्यासंबंधी सर्व डॉक्टर, परिचारिका आणि स्टाफला प्रशिक्षित करावे. अग्निशमन यंत्रणा, फायर एक्सटिंग्वशर्स, हायड्रंट, स्प्रिंकलर हे अद्यावत आणि सुस्थितीत ठेवावेत. अग्निशमनाबाबतची सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची निलेश उकुंडे यांच्याकडून खात्री करुन घ्यावी. तसेच तो अहवाल सादर करण्यास विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment