Tuesday, 25 May 2021
बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका - डॉ. दीप्ती जैन
नागपूर, दि.25 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका संभविण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अशात सर्व बालकांकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून नका, असे कळकळीचे आवाहन नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाल चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीसंदर्भात बाल रोग विभागाच्या प्रमुख डॉ.दीप्ती जैन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने कारोनाची तिसरी लाट आणि म्युकर मायकोसिससंदर्भात लोकजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचा भाग म्हणून डॉ. जैन बोलत होत्या.
शहरी आणि ग्रामीण भागातील शिशुंच्या संगोपनाच्या पद्धतीत थोडा फरक आहे. कोरोना झालेल्या बाळांमध्ये थोडी वेगळी लक्षणे आढळतात. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील वातावरण, राहणीमानही थोडे वेगळे असते. त्यामुळे अशा भागात राहणाऱ्या बाळांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यास ताप, सर्दी, खोकला, मळमळ, उलटी, पोट दुखणे, जुलाब अशी लक्षणे दिसू शकतात. अशी माहिती देतांना डॉ.दीप्ती जैन म्हणाल्या की, बाळांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसताच तातडीने उपचारात्मक पावले उचलावी. रॅपीड अॅण्टीजेन टेस्ट आणि आरटी-पीसीआर चाचणीच्या माध्यमातून कोरोनाचे निदान करून घेता येते. सौम्य प्रकारच्या कोरोनात रक्ताच्या चाचण्यांची फारशी गरज भासत नाही. परंतु तरीही आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे त्या म्हणाल्या.
बाल आरोग्यासंदर्भात डॉ. जैन यांनी दिलेल्या टीप्स
v बालकांना भरपूर पाणी पाजा.
v बालकांना पातळ आहार द्यावा.
v ताप, ऑक्सिजन पातळी मोजत रहा.
v 100 फॅरनहिट किंवा त्यापेक्षा जास्त ताप असेल तर पॅरासिटामॉल द्या.
v ताप असल्यास दर सहा तासांनी पॅरासिटामॉल देता येईल.
v कोरोनासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून नका.
v चार दिवसांपेक्षा जास्त ताप असेल तर बाळाला दवाखान्यात न्यावे.
v बाळाला श्वसनास त्रास होत असेल तरी दवाखान्यात न्यावे.
v भूक कमी होणे, बाळ सुस्त असल्याही तातडीने सल्ला घ्यावा.
आई कोरोनाबाधित असल्यास नवजात शिशूला कोरोना होऊ शकतो. परंतु अशा परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही. अशा बाळांना आईला स्तनपान करू द्यावे. मातांनी सॅनिटायजर, मास्कचा वापर करावा. आशा, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा संदेश घराघरात पोहोचविणे गरजेचे असल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भात प्रशानातर्फे आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. जनतेने कोरोना प्रतिबंधासाठी दिलेल्या प्रोटोकॉलचे पालन करावे तसेच सर्व पात्र नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले की, कोरोना नवनवीन रुपात पुढे येत आहे. अशात आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अद्ययावत माहिती सामान्यांपर्यंत पोहोचावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment