Sunday, 30 May 2021

जागतिक तंबाखू नकार दिन

• तंबाखूला द्या नकार, सुदृढ आरोग्याचा करा स्विकार • मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 1800-11-2356 राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत दरवर्षी 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू नकार दिन ' म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी 60 लाख लोकांचा तंबाखू सेवनाने मृत्यू होतो. ही संख्या 2030 पर्यंत 80 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे तंबाखू सेवनामुळे संपूर्ण शरीरावर हानिकारक परिणाम होतात. तंबाखूजन्य पदार्थ चघळल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू थुंकणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर होतेच पण त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, पक्षाघात, अंधत्व, श्रवणाचे आजार, पुनरुत्पादन संस्था तसेच पचनसंस्थेचे आजार, क्षयरोग इत्यादी आजार होतात. याशिवाय कोरोनाचा आजार होण्याचा धोका वाढतो. तंबाखू सोडल्यास 8 तासामध्ये ऑक्सीजनची पातळी सर्वसाधारण होण्यास मदत होते. 72 तासांमध्ये फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. तसेच एका वर्षामध्ये हृदयरोग होण्याचा धोका अर्ध्यापेक्षा कमी होतो. शिवाय 15 वर्षामध्ये हा धोका सामान्य व्यक्तीप्रमाणे राहतो. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीने घाबरु नये. व्यसन हा इतर आजाराप्रामाणे आजार आहे व तो उपचाराने व प्रयत्नाने बरा होऊ शकतो. त्यामुळे आजपासून व्यसन करणार नाही, असा निर्धार करा व तंबाखूचा त्याग करा. तंबाखू व ई-सिगारेटला नकार देवून सुदृढ आरोग्याचा स्विकार करा. तंबाखू सोडण्यासाठी मदत हवी असल्यास टोल फ्री क्रमांक 1800-11-2356 वर संपर्क साधा. आपणास निश्चित मदत मिळेल. *****

No comments:

Post a Comment