Thursday, 27 May 2021
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांची योग्य काळजी घ्या - डॉ. आनंद भुतडा
नागपूर, दि.27: आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका असल्याचे संकेत दिले आहे. प्रत्येक पालकाने आपापल्या मुलांची सुयोग्य काळजी घेतल्यास मुलांना कोरोनापासून वाचविता येऊ शकते, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. आनंद भुतडा यांनी स्पष्ट केले.
नागपूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोनाची तिसरी लाट आणि म्युकरमायकोसिससंदर्भात लोकजागृती अभियानामध्ये कोरोनाची तिसरी लाट परतवून लावण्यासाठी प्रशासन सुसज्ज असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यावेळी उपस्थित होते.
नवजात बालकांची काळजी घ्या
मार्गदर्शक म्हणून डॉ.आनंद भुतडा बोलत होते. नवजात बाळांसह कोणत्याही वयोगटातील मुलांना कोरोनाचा धोका संभवतो. त्यामुळे गाफिल राहू नका, असे आवाहन करतांना डॉ. भुतडा म्हणाले. मोठ्या व्यक्तींप्रमाणे मुलांमध्येही कोरोनाची लक्षणे सारखीच आहेत. कोरोनाची लक्षणे दिसताच मुलांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. घरात एकापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाल्यास लहान मुलांची तपासणी करून घ्यावी. लहान मुलांना कोरोना होत नाही हा गैरसमज असल्याचे ते म्हणाले. रॅपीड अॅण्टीजेन टेस्ट किंवा आरटी-पीसीआर चाचणींच्या माध्यमातून कोरोनाचे निदान करून घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.
पोस्ट कोविड एमआयएस-सी
लहान मुलांना कोरोनानंतर दीड ते दोन महिन्यानंतर पोस्ट कोविड एमआयएस-सी होऊ शकतो. यात जास्त प्रमाणावर ताप येतो. बाळाच्या लिव्हर, किडनी, हृदयावर सूजही येते. त्यामुळे बाळांची प्रकृती जास्त खराब होऊ शकते. अंगावर लाल चट्टेही येऊ शकतात. त्यामुळे कोरोना आणि एमआयएस-सीचे वेळीच निदान करून घेणे गरजेचे असते, असे डॉ.भुतडा म्हणाले. ‘बाळाची काळजी’ या सत्राचा समारोप करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कोरोनाचा लढा सर्वांनी एकत्र येत मजबूत करण्याचे आवाहन केले.
मुलांना देण्यात येणारे उपचार
v कोरोनाबाधित मुलांना मोठ्या व्यक्तींची औषधे देण्यात येत नाही.
v कोरोना झाल्यास किंवा लक्षणे असल्यास पाण्याचे प्रमाण व पातळ आहार जास्त प्रमाणात दिला जातो.
v पचायला अत्यंत सहज असे पातळ पदार्थ, पेस्ट मुलांना दिली जाते.
v तापासाठी पॅरासिटामॉल देण्यात येते.
v व्हिटॅमीन सी, झिंकचे औषध देण्यात येते.
पालकांनो, कोणती खबरदारी घ्याल?
v मुलांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखा.
v लक्षणे आढळल्यास मुलांचे 17 दिवस विलगीकरण.
v मुलांना कोरोना झाल्यास पालकांनीही घराबाहेर पडू नये.
v पालकांना कोरोना झाला असल्यास मुलांना दूर ठेवा.
v मास्क, सॅनिटायजर, सुरक्षित अंतराचे पालन करा.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ग्रामीण व शहरी भागात लहान मुलांची तपासणी व उपचार यासंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment