Monday, 30 August 2021
महाआवास योजनेच्या माध्यमातून घरकुलाचे स्वप्न साकार करुया - प्राजक्ता लवंगारे-वर्मा
· उत्कृष्ट कार्याबद्दल विभागीय पुरस्कारांचे वितरण
· गोंदिया व वर्धा जिल्हा ठरला सर्वोत्कृष्ट
· महाआवास योजना मासिकाचे विमोचन
· केंद्राचे 1 लाख 62 हजार तर राज्याचे जवळपास 49 हजार घरकुल पूर्ण
नागपूर, दि. 30: महाआवास योजनेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनातर्फे ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांसाठी गृहबांधणीचे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात आले असून, या अभियानामध्ये विभागातून गोंदिया व वर्धा जिल्ह्यात सर्वोकृष्ट काम झाले आहे. महिलांच्या वित्त संस्थांचा घरबांधणीसाठीचा सहभाग कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गरजवंताला हक्काचा निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे –वर्मा यांनी आज येथे केले.
महाआवास अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासोबतच राज्यात सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून नागपूर नावलौकिक मिळवेल, असा विश्वास श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी व्यक्त केला.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महाआवास अभियानांतर्गंत केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियानामध्ये सर्वोकृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत तसेच वित्तीय संस्थांचा गौरव आज करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
वर्धेच्या जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सरिता गाखरे, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, वर्धा जिल्हा परिषद अपर मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, भंडारा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, विकास उपायुक्त अंकुश केदार, सहायक आयुक्त सुनील निकम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संघमित्रा कोल्हे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सर्वांसाठी घरे 2022 या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गंत हक्काचे घर मिळावे, यासाठी महाआवास योजना राबवित आहे. लोकसहभागामुळेच या योजनेचे रुपांतर अभियानात झाले आहे. विभागातील पुरस्कारप्राप्त जिल्ह्यांनी यापुढेही अंमलबजावणीमध्ये सातत्य ठेवून केंद्र शासनाचे पुरस्कार मिळवावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी केले.
महाराष्ट्राने देशाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही योजना दिली. या योजनेच्या यशस्वीतेमुळे गावातील समस्या गावातच सोडविता येतात, हे सिद्ध झाले. त्यामध्ये लोकसहभाग महत्त्वपूर्ण असून, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवरही विभागातील नागरिक सक्रिय सहभागी झाल्यामुळे हे यश मिळाले आहे, असे सांगताना महाराष्ट्राच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची चर्चा देशभरात सर्वत्र झाली असल्याचे श्रीमती लवंगारे –वर्मा यांनी सांगितले.
नोव्हेंबर 2020 ते जून 2021 या कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्यपुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान ग्रामीणची अंमलबजावणी करण्यात आली असून, या योजनेच्या माध्यमातून कामे केलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींनी केवळ एवढ्यावरच न थांबता केंद्र शासनाचे पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1 लाख 62 हजार 383 घरकुलांची बांधकामे पूर्ण करण्यात आली असून राज्यपुरस्कृत आवास योजनेंतर्गत एकूण 48 हजार 898 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. तसेच द्वितीय पुरस्कार भंडारा जिल्हा तर तृतीय पुरस्कारासाठी वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाला. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय तालुका म्हणून गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, गोंदिया व तिरोडा पंचायत समितीला अनुक्रमे पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यासोबतच उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून गोंदिया जिल्ह्यातील तळेगाव, द्वितीय कोरंबी तसेच केसोरी या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांना पुरस्कार प्राप्त झाले. तृतीय पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील इंझाळा ग्रामपंचायतीला मिळाला.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी कर्ज देणारी वित्तीय संस्था म्हणून वर्धा जिल्ह्याची नारी शक्ती प्रभात संघ सिंधीविहिरी(कारंजा), द्वितीय भंडारा जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया, आंधळगाव तर तृतीय वर्धा जिल्ह्यातील हिरकणी प्रभाग संघ, अंदोरी(देवळी) तसेच जागा व वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी प्रथम वरोरा तालुका, द्वितीय कामठी तालुका तर तृतीय भद्रावतीचा पुरस्कारप्राप्त तालुक्यांमध्ये समावेश आहे.
राज्य पुरस्कृत आवास योजनेत वर्धा प्रथम
राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याला पुरस्कार मिळाला असून, द्वितीय क्रमांक भंडारा जिल्ह्याला तर तृतीय क्रमांक चंद्रपूर जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम सडक अर्जुनी (गोंदिया), द्वितीय लाखांदूर, तृतीय पवनी पंचायत समिती, जिल्हा भंडाराने पटकावला आहे.
उत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत बोरगाव(चंद्रपूर), द्वितीय दिघोरी (भंडारा) तर तृतीय सानगाव(साकोली) व ग्रामपंचायत चिचूर(कुही) नागपूर जिल्ह्याची या ग्रामपंचायतींनी पुरस्कार पटकावला. बांधकामासाठी कर्ज देणारी उत्कृष्ट वित्तीय संस्था म्हणून प्रथम वर्धा जिल्ह्यातील समानता प्रभाग संघ, समुद्रपूर, द्वितीय परिवर्तन प्रभाग संघ सेलू तर तृतीय सार्थक प्रभाग संघ वायफळ या वर्धा जिल्ह्यातील तीनही संस्थांचा या पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींमध्ये समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त अंकुश केदार यांनी तर आभार सहाय्यक आयुक्त सुनिल निकम यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मासोदकर यांनी केले.
*******
क्रीडा संकुलाच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक बाबींची तत्काळ पूर्तता करावी - सुनील केदार
नागपूर, दि. 30: देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. कुशल मनुष्यबळ, क्रीडा संकुलासाठी लागणारी अतिरिक्त जागा, वीज, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधांसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्याचे आदेश युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय क्रीडा संकुलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे–वर्मा, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते.
मानकापूर विभागीय क्रीडा संकुल परिसरात चांगले क्रीडा वातावरण तयार व्हावे, या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत. त्यामुळे या क्रीडा संकुलात सर्वोत्कृष्ट सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा. देशातील क्रीडापटूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंतची उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्याचा देशाला अभिमान आहे. त्यामुळे भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यासाठी त्याच दर्जाची क्रीडांगणेही निर्माण करण्यावर राज्याच्या क्रीडा विभागाचा भर राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
शहरी भागासह ग्रामीण भागातून येणारे क्रीडापटूही उच्च दर्जाची कामगिरी करु शकतात. त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे विदर्भातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना नागपूर येथे सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे श्री. केदार म्हणाले.
विभागीय क्रीडा संकुलात सुरु असलेले बांधकाम, युवा वसतीगृह बांधकाम, पॅव्हेलियन, 400 मिटर ट्रॅक, क्रीडा संकुलाच्या मागील बाजूचे अतिक्रमण रोखण्यासाठी आवारभिंतीचे बांधकाम करा, ‘मेडा’कडून सौर पॅनेल बसविणे, यासह इनडोअर स्टेडियममधील एलईडी दिवे बसविण्याबाबत चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करणे तसेच संकुलाचे व्यवस्थापन करताना सिंथेटीक ट्रॅक, बहुद्देशीय सभागृह बांधकाम, मुला-मुलींचे वसतीगृहांचे बांधकाम, आदी सुविधा निर्मिती करणे, जलतरण तलाव, हॉकी ॲस्ट्रोटर्फ, अद्ययावत शुटींग रेंज, स्वतंत्र बॅडमिंटन हॉल, तसेच विविध क्रीडा प्रकारांसाठी लागणारे सुविधांचे बांधकाम करणे, उपलब्ध सुविधांची देखभाल व दुरुस्ती करण्याबाबतचे आदेशही यावेळी त्यांनी दिले.
शासन निर्णयानुसार व्यवहार सल्लागार, संपूर्ण प्रकल्पासाठी विधी सल्लागार आणि वास्तुशास्त्रज्ञाची निवड करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. विभागीय क्रीडा संकुलाच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेतून रस्ता निर्मितीसाठी आवश्यक असलेली जागा मिळावी, आदी विषयांवर यावेळी मंत्री केदार यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.
*****
Saturday, 28 August 2021
सामाजिक कार्य म्हणून संस्कृतचा प्रचार करावा - उदय सामंत
महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
नागपूर, दि. 28 :महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने सन्मानित सर्व सत्कारमूर्तींनी संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे सामाजिक कार्य यापुढेही अविरतपणे सुरु ठेवावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रामटेक येथे केले.
उच्च शिक्षण विभाग तसेच कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वितरण करण्यात आले , त्यावेळी ते बोलत होते .
खासदार डॉ . विकास महात्मे , कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, अभिजित वंजारी यांच्यासह कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, उज्जैनच्या महर्षि पाणिनि संस्कृत व वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजयकुमार, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी संस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे, उच्च शिक्षण पुणे विभागाचे सहसंचालक प्रकाश बच्छाव, नागपूर विभागाचे सहसंचालक डॉ. संजय ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. असे सांगत श्री. सामंत म्हणाले की, ही भाषा काही लोकांपुरतीच मर्यादित न राहता सर्वसामान्यांची भाषा व्हावी, यासाठी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ केवळ रामटेक पुरतेच मर्यादित न राहता त्याची उपकेंद्रे रत्नागिरीसह पुणे, परभणी तसेच जळगाव येथे सुरू करण्यात येणार आहेत. संस्कृत भाषेची व्यापकता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराची परंपरा यापुढे अखंडितपणे सुरु राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .
संस्कृत भाषा केवळ शिकून उपयोग नाही तर ती बोलता यावी व दैनंदिन व्यवहारात तिचा उपयोग व्हावा, यासाठी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने विद्यापीठ स्तरावर ‘संस्कृत भाषा वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल. तसेच मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळावा यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. राज्यात ‘मराठी विद्यापीठ’ स्थापन करण्याचा मनोदयही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढील वर्षीपासून कालिदास महोत्सवात महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराचे वितरण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले .
प्रास्ताविकामध्ये श्री. वरखेडी यांनी महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराविषयी माहिती दिली. या सोहळ्यामध्ये सन 2015 ते 2020 या कालावधीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी 48 सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र तसेच रोख 25 हजार रुपयांची रक्कम प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे सहा गट आहेत. त्यामध्ये प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक व इतर, संस्कृत प्राध्यापक व तत्सम अध्यापक , संस्कृत कार्यकर्ता तसेच अन्य राज्यातील संस्कृत पंडितांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
खासदार श्री. तुमाने, श्री. डॉ. महात्मे, आमदार श्री. वंजारी, श्री. जयस्वाल यांनीही यावेळी विचार व्यक्त केले .
कार्यक्रमाचे संचालन प्रा. पराग जोशी तर महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार समितीच्या सचिव प्रा. कविता होले यांनी आभार मानले .
महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना विविध प्रवर्गांतर्गत जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रामणे आहेत:
अशोक विष्णू कुलकर्णी, प्रमोदशास्त्री प्रकाशराव कुलकर्णी, पंडित कृष्णशास्त्री जोशी, पंडित श्रीहरी धायगुडे, पंडित राजेश्वर विश्वासशास्त्री देशमुख घोडजकर यांना प्राचीन संस्कृत पंडित या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मनोज बालाजी जोशी, वेदचूडामणी दत्तात्रोय पांडुरंग नवाथे(घनपाठी), विश्वनाथ केशवराव जोशी, पंडित दत्तात्रय महादेव मुखणे, पंडित रविंद्र दत्तात्रय पैठणे, पंडित देशिक नारायण कस्तुरे यांना वेदमूर्ती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्रीमती मंगला सोमनाथ गुडे विश्वेकर, दत्ताराम तुकाराम नन्दापुरे, डॉ. श्रीमती शैलजा रानडे, अरविंद महादेव गोसावी (कवठेकर), श्रीमती दुर्गा अरविंद पारखी, डॉ. माधव गोविंद भुस्कुटे, डॉ. हेमा विलास डोळे, डॉ. विजया विलास जोशी, डॉ. ज्योत्स्ना उपेंद्र खरे, डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे, डॉ. गजानन वामनराव आंभोरे तर डॉ. माधवी दीपक जोशी यांना संस्कृत शिक्षक व इतर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. शारदा रमेश गाडगे, डॉ. छाया रावसाहेब पालकर, डॉ. सरोजा भाटे, डॉ. विजया रामचंद्र जोशी, डॉ. ललिता दीपक नामजोशी, प्रा. डॉ. जयश्री दिलीप साठे, प्रा. डॉ. इन्दू चंद्रशेखर देशपांडे, डॉ. रजनी रामचंद्र जोशी, डॉ. मधुसुदन पेन्ना, डॉ. महेश अशोक देवकर, डॉ. मल्हार अरविंद कुळकर्णी, डॉ. कल्पना आठल्ये यांना संस्कृत प्राध्यापक व तत्सम अध्यापक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्रीमती प्रभा श्रीकृष्ण घुले, डॉ. हंसश्री सतीश मराठे, डॉ. माधव गजानन केळकर, संजीव गोविंद लाभे, डॉ. अजय रामचंद्र निलंगेकर तर तरंगिणी नरेंद्र खोत यांना संस्कृत कार्यकर्ता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रा. डॉ. सिद्धार्थ यशवंत वाकणकर, डॉ. श्रीकिशोर मिश्र, गजानन लक्ष्मीनारायण भट्ट, डॉ. हर्षदेव माधव, प्रा. पुष्पा दीक्षित, आनंदतीर्थ व्ही. नागासंपिगे यांना अन्य राज्यातील संस्कृत पंडित या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तर कै. श्री. वेंकटरमण रामचंद्र दीक्षित शास्त्री यांना प्राचीन संस्कृत पंडित पुरस्कार (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला.
***
Thursday, 26 August 2021
शाळाबाह्य मुलांना प्रवेश देण्याची तत्काळ व्यवस्था करा - शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
नागपूर, दि. 26: गोपालक भटक्या विमुक्त जाती- जमती व इतर सर्व शाळाबाह्य मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश देण्याची तत्काळ व्यवस्था करतानांच त्यांच्या शिक्षणाच्या संपूर्ण नियोजनासाठी विभागीय समन्वयकाची नियुक्ती करा, असे निर्देश शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे दिले. महारा्ष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. कडू बोलत होते.
खासदार डॉ. विकास महात्मे, उपसंचालक तथा विभागीय अध्यक्ष डॉ. वैशाली जामदार, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, श्रीमती माधुरी सावरकर, सहायक संचालक सतीश मेंढे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. गोपालक भरवाड बेडे, पाडे, वाडे मोठ्या प्रमाणावर असून, यामध्ये 14 वर्षे वयोगटापर्यंतची मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. स्थलांतरीत मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडतो. स्थलांतर झाले तरीही अशा शाळाबाह्य मुलांना तत्काळ नजीकच्या गावातील शाळांमध्ये प्रवेश देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश श्री. कडू यांनी दिले.
स्थलांतरामुळे बालकांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करावी. पौगंडावस्थेत आलेल्या मुला-मुलींना शारीरिक बदलाबाबत तसेच स्वच्छतेविषयक माहितीही आरोग्य विभागातर्फे द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
विभागीय समन्वयक म्हणून सहायक शिक्षक प्रसेजनजित गायकवाड यांची नियुक्त करण्यात यावी. भटक्या जमातीतील शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शिक्षण, प्रवेशाचे संपूर्ण नियोजन करावे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या वसतीगृहाची पूर्ण व्यवस्था करण्यासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या वसतीगृह सुरु करण्याचे प्रस्ताव पाठवावेत. तोपर्यंत या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह भाडेतत्वावर घ्यावे, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिलेत. नागपूर महानगरपालिका हद्दीत असलेल्या अशा शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात आयुक्तांसोबत बैठक आयोजित करावी, अशा सूचना यावेळी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिल्यात.
****
Friday, 20 August 2021
जिल्हा न्यायालय इमारतीचे बांधकाम डिसेंबरपूर्वी पूर्ण करा -डॉ. नितीन राऊत
जिल्हा न्यायालय नवीन इमारतीच्या बांधकामाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी
नागपूर, दि. 20: जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम डिसेंबरपूर्वी पूर्ण करा. अशी सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली.
सिव्हिल लाईन्स येथील जिल्हा न्यायालय नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी डॉ. राऊत यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, उपअभियंता चंद्रशेखर गिरी, शाखा अभियंता राजेंद्र बाणाईत, राजेंद्र बारई तसेच न्यायालयाचे अधिवक्ते, अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा न्यायालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करताना श्री. राऊत म्हणाले, इमारतीच्या बांधकामामध्ये सौरऊर्जेचा वापर करण्यात यावा. तसेच बांधकाम करताना अत्याधुनिक एलईडी दिव्यांची यंत्रणा बसविण्यात यावी. संपूर्ण बांधकामामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. न्यायाधीशांच्या कक्षेप्रमाणेच अभिवक्त्यांच्या कक्षेमध्येही वातानुकुलित यंत्रणा बसविण्यात यावी. तसेच याबाबतचा प्रस्ताव सोमवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधिताना दिले.
न्यायालय इमारतीचे बांधकाम करताना भविष्यातील सुमारे 20 ते 25 वर्षांतील बदल लक्षात घेता बांधकाम करण्यात यावे. येथील जागेचे व्यवस्थित व्यवस्थापन करण्यात यावे. जास्त व्यक्ती क्षमता असणाऱ्या लिफ्ट लावाव्यात. उर्वरित बांधकामाच्या नियोजनाची रुपरेषा तयार करुन तात्काळ सादर करण्यात यावी. ही इमारत नागपूर शहराचा नाव लौकिक वाढवेल यादृष्टीने इमारतीचे बांधकाम करावे, अशा सूचना श्री. राऊत यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा न्यायालय नवीन इमारतीच्या बांधकामाला 94.24 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता आहे. ही इमारत दहा मजली असून तळमजला, पहिला आणि दुसरा मजला वाहनतळासाठी राखीव आहे. तिसऱ्या मजल्यावर कार्यालय, उपहारगृह तसेच तात्पुरते तुरुंग आहे. चौथ्या व आठव्या मजल्यापर्यंतच्या पाचही मजल्यांवर कोर्ट हॉल आहे. असे एकूण 25 कोर्ट हॉल्स या मजल्यावर आहेत. नवव्या मजल्यावर प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे न्यायालय आहे. बैठक सभागृह तसेच विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी प्रशस्त हॉल आहे. या इमारतीच्या बांधकामाला जानेवारी, 2017 पासून सुरुवात झाली असून आतापर्यंत 80 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. पुढील बांधकामासाठी आणखी 21 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर सुमारे तीन ते चार महिन्यामध्ये इमारतींचे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती श्री. भानुसे यांनी दिली.
न्यायलय परिसरात असलेल्या पुरातत्त्व इमारतीचे जतन करुन त्या इमारतीला अनुरुप नवीन इमारतीलाही देखणेपण देण्यात येत आहे. जेणेकरुन परिसरातील सौंदर्यात भर पडेल. जुनी इमारत नवीन इमारतीशी तिसऱ्या व चौथ्या माळ्यावर जोडण्यात आली आहे. येथील तीन मजले वाहनतळासाठी राखीव ठेवल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही.
*****
एकमेकांच्या सहकार्याने राज्यातील जनतेसाठी काम करू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
• विकासकामात कोणताही अडथळा येऊ देणार नाही
नागपूर, दि. 20: राज्य शासनाच्या वतीने विकासकामासाठी आवश्यक ते सहकार्य केंद्र शासनाला करण्यात येईल. विकासाच्या प्रत्येक पावलावर एकमेकांसोबत राहून राज्यातील जनतेसाठी काम करू, हे करताना जनतेचे हित आणि राज्याच्या विकासाआड कुणालाही येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.
सिताबर्डी- झीरो माईल फ्रिडम पार्क-कस्तुरचंद पार्क सेक्शन आणि फ्रीडम पार्कच्या उद्घाटनाप्रसंगी ते (दूरदृष्यप्रणालीद्वारे) बोलत होते. ई-फ्लॅगद्वारे मेट्रो सेवेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर दयाशंकर तिवारी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी (दूरदृष्यप्रणाली) द्वारे तसेच खासदार कृपाल तुमाने, सर्वश्री आमदार ॲङ आशिष जयस्वाल, ॲङ अभिजित वंजारी, विकास ठाकरे, कृष्णा खोपडे, राजू पारवे, विकास कुंभारे अन्य स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी आर. विमला, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत, केंद्रीय सचिव श्री. दुर्गाप्रसाद मिश्रा, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रगती आणि विकासासाठी राज्यात मेट्रो, महामार्गांचे जाळे विणण्यात येत आहे. मेट्रोची ही कामे उन्नत मार्गाने पुढे नेत आहोत. त्या मार्गाखालचा भागही प्रकल्पाचा भाग समजून त्याचा विकास करावा, त्याचे सौंदर्यीकरण करून नागरिकांसाठी तिथे सोयी-सुविधा निर्माण करण्याबाबत महामेट्रोने विचार करण्याची सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
महामेट्रोने नागपूरचा कायापालट केला आहे. मेट्रोचे कालबध्दतेने काम पूर्ण केले आहे, असे सांगून विकास कामे करताना राजकीय मर्यादा दूर ठेवण्याचा पायंडा नागपूरने पाडला असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.
नागपूर शहराच्या सौंदर्यात व विकासात भर घालणाऱ्या महामेट्रोच्या या सेक्शनचे सद्भावना दिवशी लोकार्पण व्हावे हे चांगले औचित्य आहे. फ्रीडम पार्कच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी परंपरेची गाथा प्रेरणा देत राहील. वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल. पालकमंत्री म्हणून विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे डॉ. नितीन राऊत यांनी आश्वस्त केले.
नागपूर मेट्रोच्या सर्वात व्यस्त आणि महत्वपूर्ण भागातील या वाहतूक व्यवस्थेमुळे सुमारे एक लाख प्रवाशी मेट्रोशी जोडले जातील. रस्त्यांवरून देशाची ओळख होत असल्याचे सांगून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोविडच्या संकट काळातही राज्य शासन विकासकामांना चालना देत आहे. विदर्भ-मराठवाड्यासह मुंबईला जोडणारा समृध्दी महामार्ग हा राज्याच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नागपूर महामेट्रोचा हा प्रकल्प हा पर्यावरणपूरक असल्याचे सांगितले. या प्रकल्पाची विस्तृत माहितीही त्यांनी यावेळी दिली. ‘फ्लोटिंग ट्रॅक स्लॅब टेक्नॉलॉजी’ अंमलात आणली आहे. आवाज आणि कंपन कमी होण्यास त्यामुळे मदत होईल, असे ते म्हणाले.
सिताबर्डी-झीरो माईल फ्रीडम पार्क-कस्तुरचंद पार्क सेक्शनचे काम हे सर्वात अभिनव आणि अव्दितीय फ्रेंच वास्तूशास्त्रज्ञाने बांधलेले स्थापत्याचे उत्तम शिल्प असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. वीस मजली इमारत असलेले आणि चौथ्या मजल्यावरुन मेट्रो धावणारे हे नाविण्यपूर्ण राजपूत वास्तूकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कॉटन मार्केटपासून सायन्स कॉलेजपर्यंत प्रवासी वाहतूक सुलभ व्हावी यासाठी अंडरपास रस्ता करण्याचे त्यांनी जाहीर केले. मेट्रोचे हे स्टेशन आणखी आकर्षक होण्यासाठी त्यांनी काही सूचना केल्या. महामेट्रोच्या कामासाठी तत्कालीन शासनाने निधी उपलब्ध करुन दिला त्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस व मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित यांचा विशेष उल्लेख केला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्याचे त्यांनी आश्वस्त केले. तेलंगखेडी-फुटाळा येथील महामेट्रोतर्फे करण्यात येत असलेले संगीत कारंजाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. विकासकामांना कायम सहकार्य ठेवण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक झीरो माईलला फ्रीडमपार्क व वीस मजली मेट्रोच्या इमारतीमुळे भव्यता येणार असल्याचे सांगितले. महामेट्रोने देशात वेगाने काम केले असल्याची प्रशंसाही त्यांनी केली.
सुरुवातीला या विषयीची संपूर्ण माहिती देणारी दृकश्राव्य फितीचे सादरीकरण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी या नवीन मार्गावरील प्रवासी सेवेचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे संचलन श्रीमती श्वेता शेलगावकर यांनी तर आभार ब्रिजेश दीक्षित यांनी आभार मानले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लसीकरणच एकमेव पर्याय - मुख्यमंत्री
* सद् भावना जीवनरथ लसीकरण वाहनांचे हस्तांतरण
* नागपूर व अमरावती विभागांना दोनशे विशेष वाहने
* मिशन लसीकरण अभियानाला सुरुवात
नागपूर, दि. 20: कोरोनावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून महत्त्वाचे काम करीत आहे. भविष्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असून कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सद् भावना जीवनरथ दोनशे लसीकरण वाहनांच्या हस्तांतरण समारंभाप्रसंगी केले.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रांगणात विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने सद् भावना जीवनरथ दोनशे लसीकरण वाहनांचे हस्तांतरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दृकश्राव्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
महापारेषण कंपनीतर्फे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी 25 कोटी रुपयांचा सीएसआर निधी विदर्भ सहायता सोसायटीला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून विदर्भातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना दोनशे लसीकरण वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या लसीकरण वाहनांचे हस्तांतरण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर तसेच दृकश्राव्य पद्धतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, इतर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आमदार राजू पारवे, महापालिकेचे विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला आदी उपस्थित होते.
कोरोनासोबतच अतिवृष्टी व पुरासारख्या संकटाचा सामना करताना जनतेच्या संरक्षणाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात 5 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. एका दिवशी 9 लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले असून केंद्र शासनातर्फे जेवढे जास्त डोस उपलब्ध होतील त्यानुसार सर्वांना लस देण्यात येईल. लसीकरण केंद्रांपर्यंत पोहचू शकत नाहीत, अशा नागरिकांच्या घरी जावून लसीकरण करण्यासाठी ही दोनशे वाहने उपयुक्त ठरणार आहेत. लसीकरणासाठी संपूर्ण मदत देण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लसीकरण वाहनांच्या हस्तांतरणासह या विशेष मोहिमेचा शुभारंभ करताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सद् भावना जीवनरथाच्या माध्यमातून विदर्भातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी लसीकरण वाहने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संत गाडगे महाराजांचा संदेश अंमलात आणून मेळघाट, गडचिरोली यासारख्या अतिचदुर्गम भागात पोहचून लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे. दोनशे लसीकरण वाहने उपलब्ध करुन देण्याचा ऊर्जा विभागाचा अशा स्वरूपाचा देशातील हा पहिलाच उपक्रम असून राजीव गांधी यांच्या जन्मदिनी म्हणजेच सद् भावना दिनी आयोजित होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात लसीकरण महत्त्वाचे असून जनतेला या महामारीपासून दूर ठेवण्यासाठी दोनशे लसीकरण वाहने उपलब्ध केल्याबद्दल विदर्भ सहायता सोसायटी व महापारेषणचे विशेष अभिनंदन केले. आगामी काळातील सण व उत्सव साजरे करताना कोविडचा प्रोटोकॉल तंतोतंत पाळला जाईल याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन केले.
महिला व बाल विकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी सद् भावना दिनी कोरोनावर मात करण्यासाठी तसेच जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ऊर्जा विभागातर्फे दोनशे वाहने उपलब्ध करुन दिलेत. ही खऱ्या अर्थाने राजीव गांधी यांना श्रद्धांजली ठरणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण वाढवण्याला या अभियानामुळे चालना मिळणार असे यावेळी त्यांनी सांगितले.
पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी लसीकरणाचा वेग वाढविताना केंद्र शासनाने लसीचा पुरवठा वाढवावा, अशी सूचना करताना शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याला ग्रामपंचायतींना रोख पुरस्कार देवून गौरव करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्य विभागाला ऑक्सिजनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्याला प्राधान्य दिले आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करताना लसीकरण अत्यंत आवश्यक असल्यामुळे महापारेषण कंपनीतर्फे 25 कोटी रुपयांचा सीएसआर निधी विदर्भ सहायता समितीला उपलब्ध करुन दिल्यामुळे नागपूर व अमरावती विभागातील सर्व तालुक्यांना प्रत्येकी दोन वाहने याप्रमाणे दोनशे वाहने देण्यात येत आहेत. या वाहनांचा सुयोग्य वापर व्हावा तसेच वाहनाची देखभाल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नियंत्रण अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच लसीकरणासाठी वापराचा नियमित अहवाल विभागीय आयुक्तांनी घ्यावा, अशी सूचना ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी केली.
प्रारंभी सद् भावना दिनानिमित्त माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच दीप प्रज्वलीत करुन दोनशे सद् भावना जीवनरथाचे हस्तांतरण केले. नागपूर विभागासाठी 128 लसीकरण वाहनांचे हस्तांतरण विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांना तर अमरावती विभागासाठी 72 लसीकरण वाहनांचे हस्तांतरण महिला व बाल विकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांना करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी तर जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपायुक्त आशा पठाण यांनी केले.
यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी आमदार दिनानाथ पडोळे तसेच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, नागपूर व अमरावती विभागाचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
Wednesday, 18 August 2021
मिशन लसीकरण अंतर्गत दोनशे वाहनांचे 20 ऑगस्ट रोजी हस्तांतरण
• लसीकरण मोहिमेस मिळणार गती
• महापारेषणच्या ‘सीएसआर’ निधीमधून खरेदी
• विदर्भ सहायता सोसायटीचे योगदान
• नागपूर व अमरावती विभागांना मिळणार लसीकरण वाहने
नागपूर दि.18: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून नागपूर व अमरावती विभागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनी तर्फे सामाजिक दायित्व अंतर्गत 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या दोनशे लसीकरण वाहनांचे हस्तांतरण शुक्रवार, दिनांक 20 ऑगस्ट रोजी होत आहे.
विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन लसीकरण’ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या वाहनांचे हस्तांतरण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे होणार आहे.
विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी राहणार असून राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लसीकरण वाहनांचा हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कोरोना सुरक्षेचा एकच विकल्प, ‘मिशन लसीकरण हा संकल्प’ या अभियानाचा शुभारंभ सद्भावना दिनी म्हणजेच 20 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. ‘प्रत्येक घराची वारी, लसीकरण तुमच्या दारी’ यानुसार नागपूर व अमरावती विभागात विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील अकरा जिल्ह्यातील 120 तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
लसीकरण वाहनांचा हस्तांतरण सोहळा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गोंदियाचे नबाब मलिक, भंडाऱ्याचे डॉ.विश्वजित कदम, वर्धेचे सुनिल केदार, चंद्रपूरचे विजय वडेट्टीवार, अमरावतीच्या यशोमती ठाकूर, अकोल्याचे ओमप्रकाश (बच्चू) कडू, बुलढाण्याचे डॉ.राजेंद्र शिंगणे, यवतमाळचे संदीपान भुमरे, वाशिमचे शंभुराजे देसाई, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तसेच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण वाहनांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कोविड नियमानुसार ऑनलाईन तथा ऑफलाईन पद्धतीने या सोहळ्यात मान्यवर सहभागी होणार आहेत.
नागपूर व अमरावती विभागात 15 ऑगस्टपर्यंत 94 लाख 14 हजार 820 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस 72 लाख 81 हजार 665 तर दुसरा डोस 24 लाख 53 हजार 440 नागरिकांनी घेतला आहे. नागपूर व अमरावती विभागात लसीकरणाचे उदिष्ट्य पूर्ण करण्यासाठी मिशन लसीकरण ही मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेला यशस्वी करण्याचे आवाहन ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
प्रत्येक व्यक्तिला लस मिळावी किंबहुना जे रुग्ण बेडवरुन ऊठू शकत नाही अशांना लस देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी दोनशे लसीकरण वाहने प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. लसीकरणासोबतच जेष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया तसेच आकस्मिक आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय चमूस रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
विभागीय आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून विदर्भ सहायता सोसायटीमार्फत वाहनांची खरेदी करण्यात आलेली आहे.
मिशन लसीकरण या मोहिमेंतर्गत अद्याप लस न घेतलेल्या नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस घेवून आपले आरोग्य सुरक्षित करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत तसेच विदर्भ सहायता सोसायटीच्या अध्यक्षा तथा विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा तसेच अमरावतीचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले आहे.
*****
Tuesday, 17 August 2021
आदिवासींच्या 84 वनहक्क दाव्यांवर सुनावणी •आदिवासींना मिळणार हक्काच्या जमिनी
नागपूर, दि. 17 : अनुसूचित क्षेत्रातील 84 वनहक्क दाव्यांच्या अपिलांवर विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज सुनावणी घेतली. वनहक्काच्या दाव्यांसदर्भात यावेळी दावेदारांशी थेट संवाद साधून माहिती घेण्यात आली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी घेण्यात आली.
विभागीय वनहक्क समितीचे सदस्य सचिव तथा आदिवासी विकास अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, समितीचे सदस्य गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, अशासकीय सदस्य सुधाकर कुळमेथे, ज्ञानेश आत्राम, कुमारीबाई दसरु जामकटन, विभागीय वनहक्क कक्षाचे नोडल अधिकारी हरिष भामरे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील दावेदार यावेळी उपस्थित होते.
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासींचे हक्क, मागण्या विशेषत: आदिम, आदिवासी समूह, फिरते आदिवासी आणि भटक्या जमाती याबाबत जिल्हास्तरीय वनहक्क समितीमार्फत करण्यात आलेल्या दाव्यांची श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी तपासणी केली तसेच दावेदारांचे म्हणणे ऐकून घेतले.
जिल्हास्तरीय वनहक्क समिती व उपविभागस्तरीय वनहक्क समितीद्वारे तयार करण्यात आलेल्या वनहक्कांच्या मागण्या व अभिलेखांचे निरीक्षण करुन व नियमान्वये आवश्यक पुरावे पाहून या अपिलांवर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना वैयक्तिक व सामुहिक वनहक्क किंवा या दोघांचेही धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती किंवा इतर पारंपारिक वननिवासी यांना स्वत:च्या उपजिविकेसाठी शेती, शेतीसाठी वन जमीनी धारण करण्याचा व तेथे राहण्याचा तसेच निस्तारसारखे हक्क, गावांच्या सीमांतर्गत किंवा सीमेबाहेर पारंपारिकरित्या गोळा केले जाणारे गौण वनोत्पादन गोळा करुन त्याचा वापर करण्याचा हक्क आहे. पाण्यामधील मत्स्य व अन्य उत्पादने, चराई करणे, पारंपारिक मोसमी साधनसंपत्ती मिळविण्याचा हक्क आहे. पारंपारिकरित्या संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वनस्त्रोतांचे संरक्षण, पुर्ननिर्माण, संवर्धन, व्यवस्थापन करण्याचा हक्क वनहक्कांतर्गत प्राप्त झाले आहेत. आदिवासी समाजाची अन्न सुरक्षा व उपजीविका या दृष्टीने हे अधिकार अतिशय महत्त्वाचे असून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी यावेळी संबंधितांना दिले.
श्री. ठाकरे यांनी आदिवासींनी दाखल केलेल्या दाव्यांना सुनावणीसाठी समितीसमोर सादर केले.
*****
Monday, 16 August 2021
सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत घरकुल देणार - डॉ. नितीन राऊत
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन हजार घरकुलांची सोडत
नागपूर, दि. 16 : सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. त्यांच्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.
नागपुर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत बांधण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील 2 हजार 980 घरकुलांची सोडत पालकमंत्री यांच्या उपस्थितीत काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) घटक क्रमांक तीन घरकुलांची सोडत आज आभासी प्रणालीद्वारे काढण्यात आली. यावेळी डॉ. राऊत यांनी रिमोटची कळ दाबून सोडतीचा शुभारंभ केला. क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल आदी यावेळी आभासी प्रणालीद्वारे उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प हा केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे पंतप्रधान आवास योजना (शहरी) घटक क्रमांक 3 अंतर्गत सन 2018 पासून या बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली 18 ऑगस्ट 2019 रोजी एकूण 4 हजार 345 घरकुलांपैकी 4 हजार 172 घरकुलांची सोडत काढण्यात आली होती. एकूण 4 हजार 345 घरकुलांपैकी 2 हजार 980 घरकुले वाटपास उपलब्ध असून या घरकुलांची सोडत आज करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांना त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एन.एम.आर.डी.ए.) कार्य प्रशंसनीय असल्याचे सांगत डॉ. नितीन राऊत म्हणाले की, नागपूरसारख्या महानगरामध्ये घरांचे स्वप्न साकार करणे हे सोपे नाही. वाढलेल्या जमिनीच्या किंमती, घरांच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्यांना शहरात घर बांधणे व स्वतःच्या घरात राहण्याची संधी फार कष्टाने मिळते. प्रत्येकाला स्वत:च्या हक्काचे घर मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेमुळे सर्वसामान्यांना घरकुले मिळाली आहेत. या योजनेंतर्गत शहरात वाठोडा तरोडी (खुर्द) व वांजरी या भागात घरकुल बांधण्याचे प्रकल्प सुरू करून जवळपास 4 हजार 345 घरकुल बांधून तयार झालेली आहेत. म्हणजे एवढ्या लोकांना हक्काचे घर लवकरच मिळणार आहे. लोकांनी घरकुलांची सारी रक्कम भरल्याने त्यांना घरकुलाचा ताबाही मिळाला आहे. उरलेल्या जवळपास 3 हजार घरकुलांची सोडत झालेली आहे. शहराच्या विकासासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल वाटपाचे दुसरे टप्पे लवकरच विकसित करण्यात येणार आहे. एन.एम.आर.डी.ए. च्या योजनांना पालकमंत्री या नात्याने मी संपूर्ण सहकार्य करील, असा विश्वास डॉ.राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्वसामान्य माणूस आपल्या आयुष्याची पुंजी घर बांधण्यासाठी लावत असतो. त्यामुळे या योजनेंतर्गत घरांचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे राहील, याकडे एन.एम.आर.डी.ए.च्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे, असेही ते यावेळी म्हणाले.
या योजनेत सोडत लागलेल्या सर्व विजेत्यांना डॉ.राऊत, श्री.केदार तसेच श्री.तुमाने यांनी आभासी प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्यात.
एन.एम.आर.डी.ए.चे आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त संदीप इटकेलवार, प्रकल्प अभियंता लिना उपाध्ये आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार प्रकल्प कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर यांनी मानले.
********
Sunday, 15 August 2021
अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री नवाब मलिक यांची हज हाऊसला भेट
नागपूर, दि. 15 : शहरातील हज हाऊस येथे अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत हज हाऊस समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
येथे हज यात्रेकरुंसाठीच्या सोयी-सुविधा, लसीकरण, याबाबत आढावा घेत इमारतीची रंगरंगोटी, इमारत डागडुजी, दुरुस्तीसाठी आवश्यक निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन हज हाऊसच्या पदाधिका-यांनी मंत्री मलिक यांच्याकडे दिले. इमारतीची डागडुजी करण्यासाठी अभियंत्याकडून आराखडा पाहून त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी हज हाऊसच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
*******
कोरोनावर मात करण्यासाठी 100 टक्के लसीकरण करुया- पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात
· विदर्भात 25 कोटीच्या 200 लसीकरण वाहनाचे लवकरच लोकार्पण
· जिल्ह्यात 23 पीएसए ऑक्सिजन प्लॉन्ट उभारणार
· नारा डेपोजवळ 54 एकरात बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणार
· स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला 75 चौकांचे मनपातर्फे सौंदर्यीकरण
नागपूर, दि. 15 : कोरोनाच्या तिसऱ्या किंवा येणाऱ्या पुढच्या संकटाचा सामना करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाने यापूर्वीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रमाणे समन्वयाने काम करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 वा वर्धापनदिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी विमला आर., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नक्षल विरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, विशेष पोलिस उपमहानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनरेगा आयुक्त अंकित गोयल, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे, या विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, सह पोलिस आयुक्त सुनील फुलारी, अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडे, अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, निवासी उपजिल्हाधिकारी जगदिश कातकर, तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त आणि उपजिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर दोन लाटांचा सर्वांनी सामना केला. दुर्देवाने काही जणांनी आप्तस्वकीय गमावले. त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करुन पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, कोरोनाला सामोरे जाताना डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस दलातील अधिकारी –कर्मचारी, सफाई कामगार, रुग्णवाहिका चालक, आशावर्कर्स, अंगणवाडी सेविका, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार, बँक कर्मचारी यांच्यासह माध्यम प्रतिनिधींनी महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याबद्दल आभार मानत जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आघाडी सरकार नियोजनबद्ध आणि उत्तम काम करत असून, कोरोना चाचणी, खाटांची संख्या वाढ, रुग्ण तपासणी, संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर देण्यात आला. प्रसंगी खासगी रुग्णालये ताब्यात घेत साडेबाराशे खाटा पहिल्या लाटेत वाढविण्यात आल्याचे सांगून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 900 खाटा, अतिदक्षता खाटा, व्हेंटिलेटर्संची संख्या वाढविण्यासह जिल्ह्यात 12 हजार 49 खाटा निर्माण करण्यात आल्याचे डॉ. राऊत म्हणाले.
दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये दरदिवशी 194 मेट्रीक टन वैद्यकीय प्राणवायुची आवश्यकता होती. ती कमी पडल्यामुळे सर्वांच्या सहकार्याने या समस्येवर मात करता आल्याचे सांगून पालकमंत्री निधीतून ‘मिशन ऑक्सिजन’ राबविण्यात आले. त्यासाठी जवळपास 342 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे सांगताना दहा हजारावर नागरिकांना प्राण गमवावे लागल्याची खंतही डॉ. राऊत यांनी व्यक्त केली. दोन्ही लाटांचा यशस्वी सामना केल्यानंतर तिसऱ्या लाटेमध्ये दुप्पटीने काम करावे लागणार आहे. त्या तुलनेत दीड पट रुग्णवाढ होण्याची शक्यता असून जिल्ह्यात 23 ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम सुरु आहे. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी 25 कोटी निधीतून प्रत्येकी 11 आसनी क्षमतेची 200 लसीकरण वाहने नागपूर आणि अमरावती विभागासाठी महापारेषण कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून खरेदी करण्यात आली आहेत. लवकरच त्या वाहनांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या वाहनांमधून नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देणार असल्याचे सांगत डॉ. राऊत म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांची ने-आण, गर्भवती स्त्रियांचे लसीकरण, आकस्मिक आणि आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय चमूला रुग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी ही वाहने उपयोगात येणार आहेत.
कोरोनाचा सामना करताना तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच विद्यमान महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मदत झाल्याचा पालकमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला. लॉकडाऊन काळात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, या काळात रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 15 जणांवर गुन्हे दाखल केल्याचे डॉ. राऊत म्हणाले. सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात असून, नागपूरकर जनतेने कोविड प्रतिबंधात्मक सामाजिक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे आणि नाक व तोंडाला मास्क लावणे या त्रिसूत्रीचे पालन करत जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले.
उत्कृष्ट नियोजन करत गावाच्या वेशीवर कोरोना थांबविल्याबद्दल खुर्सापार गावचे सरपंच आणि नागरिकांचे अभिनंदन त्यांनी केले. या काळात सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीच्या माध्यमातून संचारबंदीत निराधार, अनाथ, दिव्यांग आणि रस्त्यावरील नागरिकांना 57 शिवभोजन थाळी केंद्रातून मोफत अन्न पुरवण्यात आले. नागपूर शहरात 10 लाख 66 हजार शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून दोन वर्षात 956 रुग्णांना चार कोटी रुपयांची मदत करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. नागपूर परिसर हा ‘टायगर कॅपिटल’अशी ओळख निर्माण करत असून पर्यटनवृद्धी होत आहे. कोराडी महामार्गावर नारा डेपो येथे इंदिरा गांधी बायोडायव्हर्सिटी पार्क निर्मितीला प्राधान्य देण्यात येत असून, त्यांनी स्मार्ट सिटीला एक कोटीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
नागपुरात महामेट्रो सुरु झाली, तसेच मिहानला गती देण्यात येत असून, रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. कौशल्य विकास विभाग, जिल्हा उद्योग कार्यालय, पतपुरवठा संस्था, महामंडळे, अनुसूचित जाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समुदायाचाही त्यांनी उल्लेख केला.
नागपूर विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा आणि जिल्हाधिकारी श्रीमती विमला आर. या महिला अधिकारी नेतृत्व करत असून, राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांचा विकास करण्यावर भर देत असल्याचे डॉ. राऊत म्हणाले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतून मदत करताना, सोबतच 130 कोटी रुपये खर्च करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 490 कोटींचे खरीप पीककर्ज वाटप, महाआवास योजनेंतर्गत घरकुल वाटपाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यावर भर देण्यात आला असून, ऊर्जा मंत्री म्हणून ‘महाकृषी ऊर्जा’ अभियानांतर्गंत जिल्ह्यात 7 हजार 300 शेतकऱ्यांनी 23 कोटींची थकबाकी भरली आहे. तसेच जवळपास दोन हजार शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी देण्यात आल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
नागपूर शहराला वीजतारामुक्त करण्यात येणार असून, भूमिगत वीजवाहिन्यांवर भर देताना ग्रामीण भागासाठी ‘ग्रामउजाला योजना’ राबविण्यात येणार आहे. तसेच आज शेतकऱ्यांसाठी ई पीकपाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वीर पत्नी प्रमिला नरेश बडोले, वीरपत्नी श्रीमती वंदना बाबुराव डोंगरे, वीरपत्नी श्रीमती कल्पना सुनिल नखाते यांचा गौरव करण्यात आला.
एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला प्रशस्तीपत्र देऊन सम्मानित करण्यात आले. तसेच कोरोनाच्या दुस-या लाटेत प्रशासकीय स्तरावर कोरोना निवारणार्थ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र. पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे अतिरिक्त संचालक डॉ. कृष्णा शिरमणवार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक निलेश काळे यांचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नागपूर यांच्याकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत गुंफाबाई दिगंबर मानकर, लिलाबाई अर्जुन डोंगरे, नंदाबाई बबन पाटील, रंजना सिद्धार्थ पाटील, विजय गजानन बावने, हरिचंद महादेव वानखेडे आणि कुणाल मधुकर लोखंडे यांना शेतजमीन पट्टे वाटप करण्यात आले.
सन 2020-21 महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंर्तगत फळबाग लागवड कार्यात उल्लेखनीय कार्य करणा-या कृषी सहायक शशिकांत इंगोले, कृष्णा घोटे तसेच राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक अंतर्गत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक प्राप्त सहायक समादेशक ललित रामकृपाल यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांना तसेच ऑक्सिजन पुरवठा करताना उल्लेखनीय कामगिरी करत प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल मे. आदित्य एअर प्रॉडक्ट्स, मे. आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स यांना प्रशस्तीपत्र देत सन्मान करण्यात आला. महाआवास अभियान पुरस्कार 2020-21 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट पंचायत समिती रामटेक, गट विकास अधिकारी, रामटेक सर्वोत्कृष्ट पंचायत क्लस्टर, सावनेर - बडेगाव येथील संजय भाऊराव सावरकर, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींमध्ये भिवापूर तालुक्यातील महालगाव, महा आवास अभियान पुरस्कार 2020-21 च्या राज्य पुरस्कृत योजना – ग्रामीण, सावनेर गट विकास अधिकारी, सावनेर - सर्वोत्कृष्ट पंचायत क्लस्टर, कुही मांढळ येथील निशांत निलकंठ येवले ग्रा.गृ.अभि सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, कुही- तितुर येथील सरपंच व ग्रामसेवकाचा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुरस्कार देत गौरव केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश बागदेव यांनी केले.
******
Subscribe to:
Posts (Atom)