Tuesday, 3 August 2021
सामाजिक बांधिलकी जोपासताना गुणवत्तापूर्वक काम करा -श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा
सामाजिक बांधिलकी जपत गुणवत्तापूर्वक काम करून नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर रहा, असा सल्ला विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे दिला.
वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी पायाभूत प्रशिक्षणा चा समारोप प्रसंगी मार्गदर्शन करतांना श्रीमती प्राजक्ता लवंगारे बोलत होत्या.
वनामतीच्या संचालक डॉ. माधवी खोडे, अपर संचालक डॉ. उदय पाटील, डॉ. अर्चना कडू, उपसंचालक प्रभाकर शिवणकर, प्रशिक्षण समन्वयक सीमा मुंडले यावेळी उपस्थित होत्या.
कृषी क्षेत्रात अनिश्चित ताअसून नैसर्गिक आपत्तीत सुद्धा वाढ होत आहे. अशा वेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून जनतेला उत्कृष्ठ सेवा देण्याची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे, या योजनांची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. जागतिकीकरणामुळे निसर्गचक्रात बदल होत असल्यामुळे नैसर्गिक आव्हाने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टी व पुरामुळे निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी कृषी अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका आहे. पूर तसेच दुष्काळाच्या समस्या भेडसावत आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध रहा. असेही त्यांनी सागितले.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग अधिक कौशल्यपूर्ण काम करण्यासाठी करा. क्षेत्रीय स्तरावर काम करण्याचा अनुभव वनामती प्रशिक्षण संस्थे सोबत आदान प्रदान करा, जेणेकरून पुढील प्रशिक्षणार्थींना तुमच्या अनुभवाचा लाभ होईल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
शासकीय कामकाज करताना समाजव्यवस्थेतील आपल्या जबाबदारीला योग्य न्याय द्या. दररोज नव्या उमेदीने काम करुन वैविध्यपूर्ण अनुभव घ्या. आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आहोत, ही भावना जोपासा. कार्यालयीन काम करताना आपल्या चमूशी नेहमी सुसंवाद साधत त्यांना प्रोत्साहित करा. , असे आवाहन श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले.
डॉ. माधवी खोडे यांनी यावेळी वनामती प्रशिक्षण संस्थेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. प्रशिक्षणार्थींनी येथील स्वयंशिस्त पुढेही कायम ठेवत उत्तम प्रशासक म्हणून आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडाव्या, असे त्या यावेळी म्हणाल्या.
प्रशिक्षणार्थी कृषी अधिकाऱ्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सीमा मुंडले तर आभार प्रभाकर शिवणकर यांनी मानले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment