Friday, 6 August 2021
तंबाखूजन्य पदार्थाच्या नियंत्रणासाठी प्रभावी जनजागृतीची गरज – विमला आर.
जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक
तंबाखूजन्य तसेच मौखिक आरोग्यास हानीकारक पदार्थापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी जिल्ह्यात प्रभावी जनजागृती करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी विमला आर. यांनी सांगितले. समाज माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती केल्यास यावर आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. पोलीस उप अधीक्षक संजय पुरंदरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन गुल्हाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यावेळी उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी गुटखा, सिगारेट तसेच अन्य मादक पदार्थाचे सेवन करणे कायद्यान्वये गुन्हा असूनही नागरिक या पदार्थांचे सेवन करताना आढळतात. शाळेच्या परिसरात शंभर मीटर अंतरावर कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ विकू नये यासाठी शिक्षण विभागाशी संपर्क साधून जनजागृती करावी. प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी आपल्या परिसरात अशा प्रकारच्या सूचना कर्मचाऱ्यांना दयाव्यात, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तंबाखू नियंत्रणासाठी गृह, शिक्षण, कृषी, आरोगय, अन्न व औषध प्रशासन विभागाशी चर्चा करुन समन्वयाने कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या
तंबाखूजन्य पदार्थ व मौखिक आरोग्याबाबत सादरीकरणाद्वारे डॉ. गुल्हाणे यांनी माहिती सादर करतांना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी तसेच कोट्पा कायदा 2003 च्या अंमलबजावणीबाबत माहिती त्यांनी दिली. व्यापक जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात 55 ठिकाणी रस्त्यावर पेंटींग करुन आरोग्यास मादक पदार्थ हानिकारक असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समितीचे सदस्य निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मडावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साळवे, उपशिक्षणाधिकारी सबेरा शेख, अन्न व औषधी प्रशासनाचे श्री. कोलते, डॉ. दानिश इकबाल, डॉ विनोद पाकधुने, डॉ. पुर्वली काटकर, डॉ. तेजस्विनी गेडाम, वनिता चव्हाण, सोनल रोडे तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment