कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिवस साजरा
कोरोना प्रोटोकॉलमुळे फक्त ध्वजारोहण व बक्षिस वितरण
नागपूर दि. 26 : ऑक्सिजन, बेड, औषधसाठा,वैद्यकीय मनुष्यबळ या सर्वांची उपलब्धता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र नागरिक स्वयंशिस्तीत जोपर्यंत कोरोना प्रोटोकॉल पाळणार नाहीत, तोपर्यंत बाधितांची संख्या नियंत्रणात येणार नाही. त्यामुळे लोकसहभागातूनच कोरोनावर मात शक्य आहे,असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केले.
ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाच्या बहात्तराव्या वर्धापन दिवसानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधला. राज्य शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी मर्यादित उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस बॅण्ड पथकाचे राष्ट्रगीत, पथकाची सलामी व बक्षीस वितरण असा हा मर्यादित कार्यक्रम झाला. सव्वा नऊ वा
जता त्यांनी ध्वजारोहण केले. पोलीस बॅण्ड पथकाच्या तालावर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यानंतर आपल्या संक्षिप्त भाषणात त्यांनी कोरोना उपाययोजना करतांना लोकसहभागाचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित केले.
जगात 152 देशांमध्ये सध्या कोरोना विषाणूचा विळखा आहे. नागपूरमध्ये दररोज ही आकडेवारी पाच हजाराच्या घरात चाललेली आहे. त्यामुळे शाळा व कॉलेजेस बंद आहेत. जनतेने गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडले तर न विसरता मास्क वापरणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरातील व्यापारी, राजकीय पक्ष, पत्रकार या सर्व क्षेत्राने दंडात्मक कारवाई व गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही सक्तीचे उपाय करण्याबाबत प्रशासनाला आग्रह केला आहे. मात्र जनता जागरूकतेने पुढे आल्यास याबाबत कोणतेही निर्बंध व सक्ती करावी लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जवळपास २७ हजार बेड निर्माण करण्याची क्षमता सध्या वैद्यकीय क्षेत्राकडे आहे. याशिवाय ८७४.३१ मेट्रिक टन ऑक्सिजन साठ्याची क्षमता तयार करण्यात आली आहे .मेडिकल, मेयो, एम्स, याठिकाणी आणीबाणीच्या परिस्थितीत व्हेंटिलेटर, आयसीयू आणि ऑक्सिजन खाटांची निर्मिती करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या भाषणांमध्ये त्यांनी यावेळी कोरोना उपायोजना सोबत ऊर्जा मंत्री म्हणून कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 मध्ये शेतकऱ्यांना केलेल्या मदतीची माहिती दिली. या योजनेमध्ये कृषी ग्राहकांनी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम मार्च 2022 पर्यंत भरल्यास उर्वरित 50 टक्के रकमेची सवलत देण्यात येते. त्यामुळे शेतकरी थकबाकीतून मुक्त होतो. नागपूर जिल्ह्यात याला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसात नुकसान झालेल्यांना आवश्यक मदत दिली जाणार आहे ,असे त्यांनी स्पष्ट केले तर यापूर्वी कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या बाधितांच्या नजीकच्या नातेवाइकांना वाटप करावयाच्या रकमेचे काम जिल्ह्यात योग्य पद्धतीने चालू असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात कोरोना काळात आरोग्य विभाग व पोलीस विभागाने केलेल्या कार्याचा त्यांनी गौरव केला फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य नागरिक विसरणार नाही, असे त्यांनी सांगितले. दिवंगत नेते सरदार अटलबहादूर सिंग यांना त्यांनी आपल्या भाषणामध्ये श्रद्धांजली व्यक्त केली तर नागपूरकर बॅडमिंटनपटू मालविका बनसोड, किशोरवयीन मुलांचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त करणारा श्रीनभ अग्रवाल यांचे कौतुक केले. यावेळी विविध क्षेत्रातील उपलब्धतेसाठी मान्यवरांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावर्षी नागपूर जिल्ह्याने सीमेवरील सैनिकांसाठी ध्वजनिधी संकलनात 90% उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांना पुरस्कृत करण्यात आले.
या ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र छेरिंग दोर्जे, सहपोलीस आयुक्त अश्वती दोर्जे, नक्षलविरोधी अभियान गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., अप्पर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त आशा पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, अतिरिक्त महापालिका आयुक्त राम जोशी ,निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जगदीश काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सेवानिवृत्त वैदयकीय अधिकारी डॉ. दिपक साळीवकर यांनी केले. नागपूर शहर पोलीस सलामी पथकाचे नेतृत्व या वेळी सचिन थोरबोले यांनी केले तर वाद्यवृंद पथकाचे नेतृत्व प्रदीप लोखंडे यांनी केले.
No comments:
Post a Comment