Tuesday, 23 January 2024

दरवर्षी 22 जानेवारीला रामटेक येथे राम महोत्सव घेणार : देवेंद्र फडणवीस*





 *महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ* 

नागपूर /रामटेक दि. २१ :  प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र रामटेक भूमीमध्ये दरवर्षी 22 जानेवारीला रामटेक महोत्सव राज्य शासनामार्फत घेण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

      राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत रामटेक येथे 19 ते 23 जानेवारी पर्यंत महासंस्कृती महोत्सव सुरू आहे.आज तिसऱ्या दिवशी ख्यातनाम भक्ती गीत गायक हंसराज रघुवंशी यांच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना त्यांनी ही घोषणा केली. उद्या अयोध्या येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते राम लल्ला यांची राममंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या शुभ दिनाची आठवण म्हणून रामटेक येथे दरवर्षी हा महोत्सव घेण्यात येईल, अशी घोषणा हजारो रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत केली. यावेळी दीप प्रज्वलन करून त्यांनी आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केली.

   यावेळी मंचावर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार अॅड आशिष जायस्वाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा,अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते व मान्यवर उपस्थित होते.

     रामटेकचा विकास आराखडा वर्षभरात अंमलात येईल व या विकास आराखड्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कायमस्वरूपी निधीची तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विदर्भातील एक सर्वांग सुंदर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून रामटेकच्या विकासासाठी राज्य शासन वचनबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात रामटेक सारख्या ऐतिहासिक स्थळावरून होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अॅड आशिष जायस्वाल यांनी केले.

*गडमंदिर येथे घेतले श्रीरामाचे दर्शन*

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील प्रसिद्ध व प्राचीन गड मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती, पूजन केले व दर्शन घेतले.

       शहरात सुरू असलेला महासंस्कृती महोत्सव आणि अयोध्येत होत असलेल्या  रामलल्ला प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर गड मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. जिल्ह्यातील तरुण, महिला,अबाल-वृद्ध  मोठ्या संख्येने गडावर आले होते. हातात भगवे झेंडे आणि मुखी जय श्रीरामच्या जय घोषाणे वातावरण निनादून गेले होते. 

      अशा भक्तीमय व उत्साहाच्या वातावरणात श्री. फडणवीस यांनी सायंकाळी गडावर प्रवेश केला. मंदिराच्या प्रवेशद्वारा शेजारील पटांगणात आयोजित आरतीत त्यांनी सहभाग घेतला. मंदिरात विराजित प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करून त्यांनी आशीर्वाद घेतला. यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने,आमदार ॲड.आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी उपस्थित होते. रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी श्री. फडणवीस यांचे मंदिर समितीच्यावतीने शाल व श्रीफळ देवून स्वागत केले.  
              ००००

No comments:

Post a Comment