Monday, 15 January 2024

  

जल जीवन मिशन व प्रधानमंत्री आवास योजनेची कामे मार्च अखेर पूर्ण करा

-विजयलक्ष्मी बिदरी

Ø  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

 



 नागपूर दि. 15:  विभागात ‘प्रधानमंत्री आवास योजना’ (ग्रामीण)चे ९१.८५टक्के तर  ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत घरगुती नळ जोडणीचे 85.81 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून उर्वरित कामे मार्च २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज दिले.

 श्रीमती  बिदरी  यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), जिल्हा परिषद पद भरती विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

विभागातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा (नागपूर), विवेक जॉनसन (चंद्रपूर), एस.एम.कुर्तकोटी (भंडारा), गडचिरोलीचे राजेंद्र भुयार, गोंदियाचे प्रमिला जाखलेकर, वर्धाचे विश्वास सिद यांच्यासह  विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे आणि विकास आस्थापना उपायुक्त विवेक इलमे यावेळी उपस्थित होते.

विभागात आर्थिक वर्ष 2023-24मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती  श्रीमती बिदरी यांनी घेतली. या कार्यक्रमांतर्गत एप्रिल 2023 पर्यंत  18 लाख 12 हजार 516 कुटुंबांपैकी  15 लाख 55 हजार 284 कुटुंबांपर्यंत घरगुती नळ जोडणी पोहचली आहे.  त्यानंतर ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार आतापर्यंत 2 लाख कुटुंबापर्यंत या  योजनेचा लाभ पोहचला आहे. योजनेचे 85.81 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून उर्वरित उद्दिष्ट येत्या मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.   

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या अंमलबजावणीचा  आढावाही यावेळी घेण्यात आला. या योजनेंतर्गत विभागात २ लाख ८८ हजार ८९ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत २ लाख ६४ हजार ६१३ (९१.८५टक्के) उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. कामांना गती देवून येत्या उर्वरित उद्दिष्ट नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जल जीवन मिशन व प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध टप्प्यावरील आढावा तसेच राज्य पुरस्कृत आवास योजना, मोदी आवास योजना, पी.एम.जनमन योजना आदि योजनांचा आढावा घेण्यात आला.

वर्ष २०२३-२४ मध्ये करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील पदभरतीची माहिती  सादर करण्यात आली. विभागातील  जिल्हा परिषदांमधील २५ संवर्गातील २ हजार ६८७ रिक्त पदांकरिता परिक्षा घेण्यात आली असून लवकरच या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदांमध्ये वर्ष २०१९ आणि २०२१ मध्ये विविध पदभरतीच्या जाहिरातीसाठी ज्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले त्यांना संबंधित जिल्हा परिषदांच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती भरुन हा परतावा मिळणार आहे.   

 

विकसित भारत संकल्प यात्रेचा 15 लाख 25 हजार 360 नागरिकांनी घेतला लाभ

 

विकसित भारत संकल्प यात्रेचा नागपूर विभागातील आढावा  श्रीमती बिदरी यांनी घेतला.  ही यात्रा  विभागातील 3 हजार 616 ग्रामपंचायतींपैकी 2 हजार 589 ग्रामपंचायतींपर्यंत पोचली आहे. येत्या 26 जानेवारी पर्यंत ही मोहिम चालणार असून उर्वरित गावांपर्यंत ही यात्रा पोचविण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी दिले.

 अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे यावेळी उपस्थित होत्या. केंद्र शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी 26 नोव्हेंबर 2023 पासून देशभरात  ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरु असून विभागातील 15 लाख 25 हजार 360 नागरिकांनी यात सहभाग नोंदविला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून 3 लाख 74 हजार 486 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी वैयक्तीक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती बिदरी यांनी केले आहे. 

 

०००००

No comments:

Post a Comment