अंबाझरी धरण बळकटीकरणाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा
Ø न्यायालयात पूरक प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना
Ø पाण्याच्या विसर्गासाठी चार दरवाजे
नागपूर दि. 24 : अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विविध यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अद्यावत माहिती पूरक प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.
अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासंबंधात उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापित उच्च स्तरीय समितीद्वारे कोर्टाचे नवीन निर्देशावर चर्चा करून झालेल्या कामांचा आढावा आज विभागीय आयुक्त बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, मेट्रोचे व्यवस्थपकीय संचालक श्रवण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता पी.के.पवार, नाशिक येथील आभियांत्रिकी संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद मांदाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्धन भानुसे, मनपाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, महसूल उपायुक्त दीपाली मोतीयेळे, नागपूर सुधार प्रन्यासचे अधिक्षक अभियंता प्र.म. भांडारकर आदी यावेळी उपस्थित होते.
अंबाझरी धरणातील अतिरिक्त पाणीसाठ्याच्या विसर्गासाठी सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व नाशिक येथील आभियांत्रिकी संस्थेतील तज्ज्ञानी संयुक्त पाहणी करून धरणाला चार दरवाजे बसविण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार सिंचन विभागाने पूर्वी ठरलेल्या दोन दरवाज्या ऐवजी आता चार दरवाजे बसविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या.
धरणातील वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी नदीपात्र आणि नदी काठावरील अतिक्रमणाची यादी निश्चित करून अतिक्रमण काढण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. तसेच नदी स्वच्छता व खोलीकरणाची कामेही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नासुप्रच्या स्केटिंग रिंग पार्किंग स्लॅब काढून टाकण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सुधार प्रन्यासद्वारे देण्यात आली.
पाण्याचा प्रवाह विनाअडथळा जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पूल व रस्त्याची कामे तसेच दुसऱ्या टप्प्यातील इतर कामांसाठीची निविदा प्रक्रीया १० दिवसात सुरू होणार आहे. या कामांना फेब्रुवारी व मार्चपर्यंत प्रत्यक्ष सुरूवात करून जून अखेरपर्यंत पूर्ण करून घेण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभाग व सिंचन विभाग व महामेट्रोकडून देण्यात आली.
महानगरपालिका, सिंचन विभाग, नागपूर सुधार प्रन्यास तसेच महामेट्रो यांनी केलेल्या उपाय योजनांचा नियमीत अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज केल्या.
0000
No comments:
Post a Comment