Thursday, 27 June 2024

शिवराज्याभिषेक आणि छ. शाहू महाराज जयंती निमित्ताने सारथीचा 'सीड बॉल’ उपक्रम

 

विभागातील २९ अधिछात्रवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सहभाग



 

 

नागपूर, दि.२६ :  350 वा शिवराज्याभिषेक  आणि  छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीच्या औचित्याने 6 ते 26 जून 2024 दरम्यान सारथी नागपूर विभागीय कार्यालयाच्या अधिछात्रवृत्तीधारक 29  विद्यार्थ्यांनी 5000 सीड बॉल तयार करुन किल्ले परिसर व ओसाड ठिकाणी फेकण्याचा अभिनव उपक्रम राबविला.  

 

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) नागपूर विभागीय कार्यालयाची अधिछात्रवृत्तीधारक नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील 29 संशोधक विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक  आणि  छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने चिंच, सुबाभूळ, आंबा, कडूनिंब, सीताफळ, करंजी, चिकू, जांभूळ, आवळा, आदी बिया वापरून सुमारे 5 हजार सीडबॉल तयार केले. या विद्यार्थ्यांनी  चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह किल्ला व भंडारा जिल्ह्यातील पवनी किल्ला परिसरात तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर व रस्त्याच्या कडेला सीडबॉल फेकले. तसेच 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात कार्यालयाच्या अधिकारी -कर्मचाऱ्यांनी सूराबर्डी परिसरात 700 सीडबॉल फेकले.

 

00000

 

मराठा, कुणबी, मुलामुलींसाठी ‘इंडो जर्मन टूल रुम’ कौशल्य विकास प्रशिक्षण


विभागात 125 जागा ; अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 जून

 

नागपूर, दि.26 : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व इंडो जर्मन टूल रुम यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर प्रशिक्षण केंद्राच्या 125 जागांसाठी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या युवक-युवतीसाठी नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध प्रशिक्षणाकरिता 29 जून 2024 पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेअर गटाच्या युवक-युवतीसाठी पूर्णवेळ, अनिवासी, नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 10 वी, आयटीआय, डिग्री डिप्लोमा, मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, सिव्हील इंजिनिअर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या प्रशिक्षणासाठी छत्रपती संभाजी नगर, वाळूज, पुणे, नागपूर, कोल्हापूर अशा  एकूण 851 जागा असून नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रासाठी 125 जागा उपलब्ध आहेत. ‘इंडो जर्मन टूल रुम’ कौशल्य विकास प्रशिक्षणाविषयी विस्तृत माहिती सारथीच्या https://sarthi-maharashtragov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध असून जास्तीत जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

000000

Tuesday, 25 June 2024

जिल्ह्यातील एक हजार ९१० आशा सेविकांचे कार्यालयीन कामासाठी मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण




     उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण

 

नागपूर, दि. 23 - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्ह्यातील 13 तालुक्यातील प्रत्येकी एका आशा स्वयंसेविकेला प्रातिनिधिक स्वरूपात आज मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने जिल्हयातील ग्रामीण भागात कार्यरत १ हजार ९१० आशा सेविकांना मोबाईल फोन सुविधेच्या माध्यमातून आता अधिक सक्षम केले जात आहे.

देवगिरी या शासकीय निवासस्थानी यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास आमदार टेकचंद सावरकर, आ. आशिष जायसवाल, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

ग्रामीण भागातील आशा सेविका या आरोग्य विभागाचा कणा आहेत. आधुनिक युगात आता शासकीय कामकाजाशी निगडीत अनेक अहवाल, लाभार्थी नोंदणी हे ऑनलाईन पद्धतीने तथा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करणे क्रमप्राप्त झाले आहे. या कामांमध्ये आशांना तत्परतेने काम करण्यास मदत होण्याच्या दृष्टीने त्यांना आधुनिक अँड्राईड मोबाईल देण्यात येत आहेत. प्रधानमंत्री मातृवंदन योजना, यू विन

पोर्टल, आयुष्यमान भारत ई-कार्ड, आभा कार्ड तसेच अन्य ऑनलाईन कामे आता आशांना या मोबाईलच्या मदतीने करणे सुलभ होईल. यासाठी खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ९० लक्ष ९८ हजार ९० रूपये निधी आरोग्य व्यस्थापन सुविधेसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

नागपूर जिल्हयातील सावनेर, कळमेश्वर, मौदा, कामठी, हिंगणा, नागपूर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, कुही, भिवापूर, नरखेड व काटोल या 13 तालुक्यात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातुन कामांना गती मिळेल.

*****

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानाच्या पुरस्काराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण


  


नागपूर, दि. २३ - मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानामध्ये जिल्ह्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त शाळांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज बक्षीस वितरण करण्यात आले.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक,विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोग्य स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राज्य शासनातर्फे संपूर्ण राज्यात राबविण्यात आले.

शासकीय आणि खाजगी व्यवस्थापन गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथम 11 लक्ष, द्वितीय पाच लक्ष तर तृतीय तीन लक्ष असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शासकीय गटातील तीन शाळांना पुरस्कार वितरित करण्यात आले. यात रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलेवाडा, हिंगणा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भारकस, सावनेर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सापुर या शाळांचा समावेश आहे.

खाजगी व्यवस्थापन गटातील 3 शाळांनाही बक्षीस वितरित करण्यात आले. यात काटोल तालुक्यातील लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी, नागपूर ग्रामीण तालुक्यातील श्री सत्यसाई माध्यमिक विद्यालय नरसाळा तसेच कळमेश्वर तालुक्यातील न्यू इंग्लिश हायस्कूल मोहपा या शाळांचा समावेश आहे.

याप्रसंगी आ. टेकचंद सावरकर, आ. आशिष जायसवाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

*****

विभागीय आयुक्तांच्या हस्ते ‘आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिका-२०२४’चे प्रकाशन


 

नागपूर दि.21 : नैसर्गिक आपत्ती काळात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी विभागीय, जिल्हा तसेच तालुकास्तरावर कार्यान्वित  विदर्भातील  सर्व जिल्ह्यातील यंत्रणांचा समन्वय दूरध्वनीच्या माध्यमातून सुलभ होण्याच्या दृष्टीने माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिका-2024’ चे प्रकाशन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते आज करण्यात आले.

 

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात दूरध्वनी पुस्तिकेचे प्रकाशन झाले. महानगर पालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, विभागीय माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार, शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक केतन लाड यावेळी उपस्थित होते.

 

आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिकेद्वारे नैसर्गिक आपत्ती काळात विविध हानी टाळण्यासाठी  नागपूर  विभागातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया , वर्धा व गडचिरोलीसह अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यान्वित यंत्रणांचे दूरध्वनी देण्यात आले आहेत. या माध्यमातून विविध यंत्रणांमध्ये  समन्वय साधने सोईचे होणार असून संपर्कासाठी तत्काळ दूरध्वनी उपलब्ध होणार आहे. ही पुस्तिका ऐनपावसाळ्यापूर्वी सुबक पद्धतीने तयार केल्याबद्दल श्रीमती बिदरी यांनी माहिती विभागाचे कौतूक केले आहे.

 

 या पुस्तिकेत अमरावती व नागपूर विभागातील आपत्ती नियंत्रण कक्ष व यंत्रणांचे दूरध्वनी क्रमांक, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नियंत्रण कक्ष मुंबईसह, प्रसार माध्यमे आदींचे दूरध्वनी क्रमांक समाविष्ट आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती काळात घ्यावयाच्या विविध खबरदारीबाबतही माहिती देण्यात आली आहे.

००००००

Monday, 24 June 2024

अंबाझरी धरण बळकटीकरणाची अल्प मुदतीची कामे पूर्ण विविध यंत्रणांनी विभागीय आयुक्तांना सोपविला अहवाल

 

  

 नागपूर, दि.२१ : अंबाझरी धरणाचे मातीबांधकाम, क्रेझी कॅसल परिसरातील नदी खोलीकरणासह अन्य कामे, अंबाझरी धरणाच्या सांडव्याचा विसर्ग वाहून जाण्यासाठी पुल तोडणे आदी पावसाळयापूर्वी करायच्या अल्प मुदतीच्या उपाययोजनांतर्गत कामे पूर्ण झाले असून यासंदर्भातील अहवाल संबंधित यंत्रणांनी आज उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना बैठकीत सोपविला.

            अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी कामांच्या प्रगतीचे अहवाल देण्यात आले. बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी,  जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पी.के.पवार, मनपाच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, दीपाली मोतियेळे यांच्यासह महामेट्रोरेल, नागपूर सुधार प्रन्यास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी विभागांचे अधिकारी  यावेळी उपस्थित होते.

             उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयाद्वारे सुरक्षेच्यादृष्टीने अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.  अल्प मुदतीच्या उपाययोजनांतर्गत पाटबंधारे विभागाने अंबाझरी धरणाच्या मातीबांध बळकटीकरणाचे  ९३५ मिटरचे काम  पूर्ण केले आहे, यातील अपस्ट्रीमींग व पिचिंगचे काम येत्या आठवड्यात पूर्ण करण्यासंदर्भातील अहवाल या बैठकीत सादर करण्यात आला. धरणाच्या मुख्य गेट जवळ १२ x १ मीटर क्षेत्र कापून बफर क्षेत्र तयार करण्याचे कामही पूर्ण झाले आहे.

क्रेझी कॅसल परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना अंतर्गत महामेट्रोने आठ पुल तोडण्याचे तसेच या भागातील बोट व पिलर तोडण्याचे काम पूर्ण केले आहे. येथील नाग नदी खोलीकरण व रुंदीकरणाची कामेही पूर्ण झाली आहेत. यासंदर्भातील छायाचित्रे, नकाशे व ध्वनीचित्रफितीसह अहवाल महामेट्रोकडून सादर करण्यात आला.

अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी येथील दोन्ही पूल तोडण्याचे काम पूर्ण झाले असून पहिल्या पूलाचे बांधकाम नव्याने सुरु झाले आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने समितीसमोर सविस्तर अहवाल सोपविला.  

   अंबाझरी  धरणाच्या बळकटीकरणाच्या कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येत असून या कामांच्या प्रगतीचा अहवाल समितीतर्फे  उच्च  न्यायालयाला नियमितपणे सादर  करण्यात येत आहे.

0000000

मराठा, कुणबी, मुलामुलींसाठी इंडो जर्मन टूल रुम कौशल्य विकास प्रशिक्षण 29 जून पर्यंत अर्ज करता येणार


 

नागपूर, दि.20 : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व इंडो जर्मन टूल रुम (IGTR) 2024-25 यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर प्रशिक्षण केंद्राच्या 125 जागांसाठी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या युवक-युवतीसाठी नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध प्रशिक्षणाकरिता 29 जून 2024 पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेअर गटाच्या युवक-युवतीसाठी पूर्णवेळ, अनिवासी, नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 10 वी, आयटीआय, डिग्री डिप्लोमा, मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, सिव्हील इंजिनिअर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या प्रशिक्षणासाठी छत्रपती संभाजी नगर, वाळूज, पुणे, नागपूर, कोल्हापूर अशा  एकूण 851 जागा असून नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रासाठी 125 जागा उपलब्ध आहेत. ‘इंडो जर्मन टूल रुम’(IGTR)  कौशल्य विकास प्रशिक्षणाविषयी विस्तृत माहिती सारथीच्या https://sarthi-maharashtragov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध असून जास्तीत जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

000000

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत १५ जुलै पर्यंत होता येणार सहभागी


 

नागपूर, दि.19 : खरीप हंगाम 2024 करिता कर्जदार  व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे. केवळ  1 रुपये प्रती अर्ज एवढी रक्कम भरुन पीक विमा पोर्टलवर विम्याची नोंदणी करण्याचे आवाहन, विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावार यांनी केले आहे.

राज्यात खरीप हंगाम 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2020 पासून तीन वर्षासाठी राज्यात ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी 2025-26 हंगाम या तीन वर्षाकरिता अधिसुचित पीकांसाठी वीमा क्षेत्र घटक धरुन ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून या तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्हावार विमा कंपन्यांची नावे व टोल फ्री क्रमांक

वर्धा व नागपूर जिल्हयासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18001037712 हा टोल फ्री क्रमांक आहे. भंडारा जिल्हयासाठी चोलामंडलम एम एस जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18002089200 हा टोल फ्री क्रमांक आहे. गोंदिया जिल्हयासाठी युनिर्व्हसल सोम्पो जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18002005142/ 18002004030  हा टोल फ्री क्रमांक आहे. चंद्रपूर जिल्हयासाठी ओरिएन्टल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 1800118485 हा टोल फ्री क्रमांक आहेत. तर गडचिरोली जिल्हयासाठी रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18001024088 हा टोल फ्री क्रमांक आहे.

पीक विमा योजनेंतर्गत या जोखमींचा समावेश

हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पेरणी पासून काढणी पर्यंतच्या 

कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या जोखमींचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गंत समावेश करण्यात आला आहे.

            आधारकार्ड, 7/12 उतारा, 8 अ, आधार संलग्न बॅक पासबुक या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना नजीकच्या बॅक शाखेत तसेच आपले सेवा केंद्रामध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी होता येणार आहे.  

000000


--

Tuesday, 11 June 2024

क्रेझी कॅसल, अंबाझरी घाट परिसरातील नदी खोलीकरण व रुंदीकरण कामांची विभागीय आयुक्त बिदरी यांनी केली पाहणी

 







नागपूर, दि. ११: अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्ष विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी धरण परिसरातील क्रेझी कॅसल, अंबाझरी घाट, एनआयटी स्केटिंग रिंग भागातील नाग नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांची आज पाहणी केली.

 

     समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले. क्रेझी कॅसल परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना अंतर्गत महा मेट्रोने पुल तोडणे, नदी खोलीकरण-रुंदीकरण आदी केलेल्या कामांची माहिती महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. येथे ५०० मीटर परिसरात नाग नदीवर स्थित सात पुल तोडण्यात आले असून आज आठवा पुल तोडण्यात येत आहे, याबाबतची माहितीही देण्यात आली. येथील जुन्या वॉटर पार्क परिसरात नाग नदीच्या किनाऱ्यावर काँक्रीट पिलर वर स्थित असलेली बोट व पिलर येत्या आठवड्याभरात काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सुरक्षेच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात दोन मेट्रो पिलर दरम्यान नाग नदी परिसरात पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. महा मेट्रोचे संचालक (प्रकल्प) राजीव त्यागी आणि संचालक (धोरणात्मक नियोजन) अनिल कोकाटे यावेळी उपस्थित होते.

  श्रीमती बिदरी यांनी अंबाझरी घाट परिसरात मनपाकडून सुरु असलेल्या  नाग नदी रुंदीकरणाच्या कामांची पाहणी केली. या भागात ४७ मिटर अंतरावर नदी किनाऱ्यापासून १७ मिटर पर्यंत नदी रुंदीकरण करण्यात आले आहे. उर्वरित रुंदीकरणाचे कामही प्रगतीपथावर असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. मनपा उपायुक्त प्रकाश वराडे, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, कार्यकारी अभियंता गुरुबक्षानी आदी यावेळी उपस्थित होते. एनआयटीच्या स्केटिंग रिंग परिसरातील नाग नदी खोलीकरण-रुंदीकरणाच्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली.

तत्पूर्वी, सोमवार १० जून २०२४ रोजी श्रीमती बिदरी यांनी अंबाझरी धरण परिसरातील धरण बळकटीकरणाच्या कामांची पाहणी केली.      

0000

 

 

 

 

Monday, 10 June 2024

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केली अंबाझरी धरण बळकटीकरण कामाची पाहणी







 

नागपूर, दि. १०: अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्ष विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी तलाव बळकटी करणाच्या सुरू असलेल्या कामांची आज पाहणी केली.

 

       पाहणी दौऱ्यामध्ये समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पी.के.पवार, मनपाच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी आदी उपस्थित होते.

        उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

 

अंबाझरी  धरणाच्या  बळकटीकरणासाठी  सुरक्षेच्यादृष्टीने अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली. धरणाच्या माती बांधकामा अंतर्गत सुरु असलेल्या अपस्ट्रिमिंगच्या कामांची  पाहणी करून यातील उर्वरित कामांची  माहिती घेण्यात आली. धरणाचा विसर्ग वाहून जाण्याकरिता मुख्य गेट जवळ दहा मीटर क्षेत्र कापून त्याची एक‍ मिटरने उंची कमी करण्याचे काम लवकरच हाती घेवून या महिन्याअखेर पूर्ण करण्यात येणार आहे, या कामाची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करण्यात आली.  दीर्घकालीन उपायोजनेंतर्गत या भागात दोन चॅनल गेट उभारण्यात येणार आहेत. त्याबाबतची पाहणीही करण्यात आली.

 

अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून  वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी सुरु असलेल्या नवीन पूल बांधकामाची पाहणी यावेळी करण्यात आली. येथील दुसऱ्या पुलाच्या बांधकामाबाबतही त्यांनी माहिती घेतली. पाहणी दरम्यान श्रीमती बिदरी यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या. 

००००० 

 

 

 

Monday, 3 June 2024

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती

 

नागपूर, दि. 2 : नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणूकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षकांची ( counting observer)  नियुक्ती करण्यात आली आहे.

 

            फैयाज अहमद मुमताज हे उमरेड, कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असतील. त्यांचा मोबाईल क्रमांक 8263895421 असा आहे. महेश कुमार दास हे काटोल, सावनेर आणि हिंगणा या विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असतील. त्यांचा मोबाईल क्रमांक 7782959597 असा आहे.

 

            विपुल बंसल हे नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण व नागपूर पूर्व या विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असतील. त्यांचा मोबाईल क्रमांक 9356053085 असा आहे. तर राजीव रंजन सिन्हा हे नागपूर मध्य, नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर (अ.जा.) या विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असतील. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 9931604077 असा आहे.

 

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी संबंधित बाबींच्या निरीक्षणाकरिता आलेल्या निरीक्षकांची राहण्याची व्यवस्था अनुक्रमे कॉटेज क्रमांक 9,2,6 आणि 8 रवी भवन नागपूर येथे करण्यात आलेली आहे. मतमोजणी बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवाराची, नागरिकांची किंवा मतदारांची तक्रार असल्यास उक्त मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी केले आहे.

 

******

प्रत्येक फेरीची मतमोजणी वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

      


▪ तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे मतमोजणी बाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

 

नागपूर, दि. 2 : कोणत्याही परिस्थितीत मतमोजणीतील अचूकता व वेळेत प्रत्येक फेरींचे मतमोजणी यावर प्रत्येक टेबलच्या नेमलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे. संबंधित टेबलच्या पर्यवेक्षकाने आलेली आकडेवारी त्वरित निरीक्षकांकडे दिली पाहिजे. स्वतः कोणताही निर्णय न घेता मतमोजणी प्रक्रियेत खंड पडणार याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिल्या.

नागपूर आणि रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार असून यासाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सत्रात ते बोलत होते. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित प्रशिक्षणासाठी निवडणूक निरीक्षक विपुल बन्सल,निवडणूक निरीक्षक राजीव रंजन सिन्हा, निवडणूक निरीक्षक महेश कुमार दास,  रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यावेळी उपस्थित होते.

मतमोजणी प्रक्रिया अचूकपणे आणि विहित कालावधीत होण्यासाठी सर्वांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मतमोजणी विषयक निर्देशांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय स्वतंत्र कक्षात मतमोजणी होणार आहे. प्रत्येकाने सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, असे डॉ. इटनकर म्हणाले.

मतमोजणी कक्ष, मतमोजणी आकडेवारीचा तक्ता, टपाली मतपत्रिका मोजणी, एनकोर प्रणाली,  मतदान यंत्राद्वारे मतमोजणी आदी विषयाची यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली.

                                                                                                                                    *****