Monday, 29 July 2024

दिव्यांग व शहीद जवानांच्या पाल्यांचे प्रश्न महसूल सप्ताहामध्ये प्राधान्याने निकाली काढणार - विजयलक्ष्मी बिदरी

 


Ø  1 ऑगष्ट पासून महसूल सप्ताह

Ø  जनतेची प्रलंबित कामांसाठी विशेष मोहिम

  

नागपूर,दि. 30 : महसूल विभागाशी संबंधीत असलेल्या जनतेच्या अडचणी तसेच प्रलंबित कामासंदर्भात महसूल सप्ताहानिमित्त विशेष मोहिम राबवून सोडविण्यात येणार आहेत. तसेच संरक्षण दलातील सैनिक यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे महसूल विभागाशी संबंधीत असलेल्या विविध कामांसाठी सैनिक हो तुमच्यासाठी तसेच एक हात मदतीचा- दिव्यांगाच्या कल्याणाचा हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.

महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच शासनाचे काम काजाबद्दल माहिती देण्यासाठी दिनांक 1 ऑगष्ट या महसूल दिनापासून तालुका व जिल्हास्तरावर विशेष महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात महसूल सप्ताह साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नागपूर विभागात महसूल सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महसूल सप्ताह निमित्त गुरुवार दिनांक 1 ऑगष्ट रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ होत असून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना संदर्भात आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 2 ऑगष्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, दिनांक 3 ऑगष्ट रोजी मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना तसेच दिनांक 4 ऑगष्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय या मोहिमे संदर्भात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सोमवार दिनांक 5 ऑगष्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी या उपक्रमा अंतर्गत संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे महसूल कार्यालयाकडून विविध दाखले व प्रमाणपत्र, घरासाठी अथवा शेतीसाठी जमीन वाटपाबाबत असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येणार आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 6 ऑगष्ट रोजी दिव्यांगांच्या कल्याणासाठी एक हात मदतीचा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर विशेष शिबिर आयोजित करुन स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने उपकरणांचे वाटप, महसूल विभागाशी संबंधीत दाखले व प्रमाणपत्रे, महिला व बालविकास विभागाशी संबंधीत अनाथ मुलांना अनुज्ञेस असलेला लाभ देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी तसेच दिव्यांग व माजी सैनिकांनी महसूल विभागाशी संबंधीत असलेले प्रश्न सोडवावे असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी केले आहे.

बुधवारी समारोप

महसूल सप्ताहाचा बुधवार दिनांक 7 ऑगष्ट रोजी समारोप होणार आहे. महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिृत्त कर्मचारी यांचा विशेष गौरव व सन्मान करण्यात येणार आहे. तसेच विभागीय आयुक्त काया्रलयातर्फे विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

महसूल सप्ताहामध्ये भूमि अभिलेखा संदर्भात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विभागात नझूल संदर्भात वर्ग 2 व वर्ग 1 जमीन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी तहसलिदार, जिल्हाधिकारी तसेच संबंधित महसूल यंत्रणेला दिले आहेत.

00000

Thursday, 25 July 2024

गडचिरोलीच्या सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी

 


 

Ø  विभागात 8 हजार 847 उमेदवारांची नोंदणी

Ø  10 हजार रुपये प्रतिमहा मिळणार विद्यावेतन

 

             नागपूर दि.25: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. विभागासाठी या योजने अंतर्गत 29 हजार 500 उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.  

            मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजने अंतर्गत खाजगी व शासकीय अशा 80 आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून विभागात नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्याने प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली.

            मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याने प्रशिक्षण योजने अंतर्गत पहिली नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी अभिनंदन केले असून इतर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

            धानोरा येथील सोनाली गेडाम बिएससी व एमएससीआयटी असून त्यांची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली असून त्यांना प्रतिमहा 6 महिन्यांपर्यत 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता महास्वयंम या पोर्टलवर विभागातील 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 3 हजार 692, वर्धा जिल्ह्यातील 855, भंडारा जिल्ह्यातील 966, गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 866, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 174 तर गडचिरोली जिल्ह्यातील 294 उमेदवारांचा समावेश आहे. विभागातील 11 खाजगी तर 69 शासकीय आस्थापनामध्ये नोंदणी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 758 पदे अधिसूचित करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली.

            मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्त कार्यालयातर्फे राबविण्यात येणार आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेसाठी राज्य शासनाने 5 हजार 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत 12 वी पास झालेल्या उमेदवाराला प्रतिमहा 6 हजार रुपये, आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उद्योजक व विद्यार्थ्याने rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. तसेच या वेबसाईटवर उद्योजकांना मागणी नोंदविण्याची सुविधा आहे. विभागात खाजगी 11 व 69 शासकीय अशा 80 आस्थापनांनी 1 हजार 758 पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

00000

 

 

Tuesday, 23 July 2024

​लोकमान्य टिळकांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन


नागपूर दि.23: थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

         आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी  यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतियेळे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००



०००

               

 

 

Thursday, 18 July 2024

“डॉ. पंजाबराव देशमुख- सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती” मराठा, कुणबी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

 

Ø  अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 जुलै

     नागपूर दि.18: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे च्या वतीने मराठा-कुणबी लक्षित गटातील विद्यार्थ्यांकरिता डॉ. पंजाबराव देशमुख- सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती 2024-25 योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 30 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.

राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांकरिता डॉ. पंजाबराव देशमुख- सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती” लागू केली आहे. या योजनेंतर्गत देशातील नामांकित 200 शैक्षणिक संस्थांमध्ये वर्ष 2024-25 प्रवेशाकरिता मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसंदर्भातील विस्तृत माहिती सारथीच्या https://sarthi-maharashtragov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असून जास्तीत-जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

000000

सामान्य लोकांच्या जलद न्यायासाठी पोलीस विभागाच्या अत्याधुनिकरणावर भर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 







▪ नागपूर येथे अत्याधुनिक कमांड अँड कंट्रोल सेंटर'चे लोकार्पण

▪ नागपूर महानगरात 1200 किलो मीटर अंतराच्या ऑप्टीक फायबर केबलच्या माध्यमातून सुमारे 5800 कॅमेऱ्याद्वारे निगराणी

▪ आता कानूनचे हातच नव्हे तर डोळेही अधिक सक्षम

▪ गुन्हेगारांच्या चेहऱ्यांसह आवाजाचीही होणार तत्काळ पडताळणी

नागपूर,दि.17 : भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत आपण इंग्रजांनी लादलेल्या कायद्याच्या अंमलाखाली न्यायाची प्रतिक्षा केली. हे कायदे बदलले तरच सर्व सामान्यांपर्यंत न्याय पोहचू शकेल ही भूमिका घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी इंग्रजांनी त्यांच्या सोयीचे केलेले कायदे बदलण्याचे धैर्य दाखविले. आता या कायद्यातील बदलांमुळे व गृह विभागाला अत्यांधुनिक तंत्रज्ञानाची जोड आपण दिल्यामुळे सर्वसामन्यांना यापुढे न्यायासाठी अधिक काळ तिष्ठत बसावे लागणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व नागपूर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानाने गुन्हेगारीला आळा बसावा याउद्देशाने सिव्हील लाईन्स येथे स्थापित ‘कमांड अँड कंट्रोल  सेंटर च्या  लोकार्पण समारंभात ते बोलत होते. यावेळी विशेष समारंभात नागपूर शहर पोलिसांकडून विविध गुन्हांमध्ये तपास करुन जप्त केलेल्या सुमारे 5 कोटी 51 लाख 81 हजार रुपयांच्या मुद्देमालाचे संबंधित व्यक्तींना न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून  हस्तांतरण करण्यात आले. सन 2021 ते 2024 या कालावधीत विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला हा मुद्देमाल होता. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल,  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, सह पोलीस आयुक्त आश्वती दोरजे, अतिरिक्त पोलीस उपायुक्त  सर्वश्री प्रमोद शेवाळे, संजय पाटील  व  मान्यवर उपस्थित होते.

पोलीस विभागातील आपण केलेल्या अत्याधुनिकीकरणामुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रभावी वापरामुळे गुन्ह्यांवर आळा घालणे सोपे झाले आहे. नागपूर महानगरात सुमारे 1200 कि.मी. अंतराच्या ऑप्टीक फायबर केबलच्या माध्यमातून जवळपास 5800 कॅमेऱ्यांचे इंटिग्रेशन या नव्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये करण्यात आले आहे. आता संपूर्ण महानगरात जागोजागी लावण्यात आलेले कॅमेरे व मॉल्स, शोरुम्स, रेल्वे स्टेशन, इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जवळपास 2200 कॅमेऱ्यांचेही इंटिग्रेशन यात आहे. कोणत्याही स्थितीत गुन्हेगार आता सुटणे शक्य नाही. कोणत्याही एका कॅमेऱ्यात गुन्हेगार लक्षात येईल. त्याच्यावर आता  निगराणी ठेवता येईल, असे स्पष्ट करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील आधुनिकता लक्षात आणून दिली. चॅट जीपीटीच्या धर्तीवर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून गुन्हेगारांचा चेहरा व आवाजही या तंत्रज्ञानात ओळखणे  सुलभ झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

पोलीस विभागातील आपण केलेल्या अत्याधुनिकीकरणामुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रभावी वापरामुळे गुन्ह्यांवर आळा घालणे सोपे झाले आहे. मात्र हळूहळू वाढणाऱ्या सायबर क्राईमपासून स्वत:ला सुरक्षित जर ठेवायचे असेल तर नागरिकांनी कोणत्याही मोहाला, आर्थिक लालसेला बळी न पडता स्वत: अधिक सावधगिरी व सुरक्षितता बाळगणे तेवढेच महत्वाचे आहे, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध केले. पैसे मिळविण्याचा कोणताही शॉर्टकट हा केव्हाही संकट ओढावू शकतो असे ते म्हणाले.

विविध गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांकडून जप्त केलेला मुद्देमाल पोलीस स्टेशनमध्ये किती वर्ष खितपत ठेवावा यालाही मर्यादा असायला हव्यात. यासाठी ज्यांचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे त्यांच्या पर्यंत विविध तपासातून उघड झालेला व पोलीसांनी जप्त केलेला मुद्देमाल ज्याचा त्याला तत्काळ मिळावा यादृष्टीने कायद्यात नवीन झालेला बदल अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मॉ का सोना मुझे वापस मिलाही आता ज्याला मुद्देमाल भेटला त्याने दिलेली प्रतिक्रीया पोलीसांना मिळालेली मोठी पावती आहे, असे सांगून फडणवीस यांनी पोलीस विभागाचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या हस्ते सिंबा ॲपचे लोकार्पण करण्यात आले.  यावेळी एव्हेरेस्ट वीर सहायक पोलीस निरिक्षक शिवाजी नन्नावरे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सह पोलीस आयुक्त आश्वती दोरजे यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन पोलीस निरीक्षक  इसारकर यांनी केले.

00000

Friday, 12 July 2024

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभासाठी विभागातील जास्तीत- जास्त महिलांनी नोंदणी करावी - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी



 

विभागात ३ लाख १ हजार अर्ज प्राप्त

 

नागपूर, दि.१२ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांच्या ग्रामीण व शहरी भागातून ३ लाख १ हजार १३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत-जास्त महिलांनी नोंदणी करण्याचे आवाहन, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

              राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुरु असलेल्या नोंदणीचा आज दुरदृश्यसंवादप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त यांच्याकडून आढावा घेतला. श्रीमती बिदरी या बैठकीस उपस्थित होत्या. या योजनेच्या नोंदणीसाठी येत्या काहीदिवसात वेबपोर्टल सुरु करुन ही प्रक्रिया गतीमान करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या योजनेच्या लाभासाठी नोंदणी करण्यात येणाऱ्या सर्व मदतकेंद्रावर योजनेच्या अधिकृत माहितीचे फलक लावण्याच्या सुचना करण्यात आल्या. मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता अंगणवाडी सेविकांबरोबरच ग्राम स्तरावरील अन्य कर्मचाऱ्यांनाही नियुक्त करण्यात येणार आहे. नवीन बदलांसह आज या योजनेसंदर्भातील सुधारित शासननिर्णय निर्गमित होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

               दरम्यान, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी  भागातील मदतकेंद्रांवर दिनांक ११ जुलै २०२४ पर्यंत ७५ हजार ४९९ ऑनलाईन  तर २ लाख २५ हजार ६३५ ऑफलाईन असे एकूण ३ लाख १ हजार १३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये १ लाख ८ हजार ४४१ अर्ज, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १६ हजार ३४९ अर्ज, गडचिरोली जिल्ह्यामध्ये १ लाख ५ हजार ४२ अर्ज, वर्धा जिल्ह्यामध्ये १२ हजार ४४९ अर्ज, भंडारा जिल्ह्यामध्ये ३० हजार ७१९ अर्ज आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये २८ हजार १४४ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली.

             नागपूर व चंद्रपूर महानगरपालिकांमध्ये ३२ हजार ४३५ अर्ज प्राप्त झाले आहेत. नागपूर मनपाने एकूण १० प्रशासकीय प्रभाग आणि ३८ निवडणूक प्रभागांमध्ये एकूण ४८ मदत केंद्र उभारले आहेत.

 

 

जास्तीत-जास्त नोंदणी करण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

           विभागातील सर्व जिल्ह्यांतील ग्रामीण व शहरी भागांमधील महिलांनी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जास्तीत-जास्त संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी केले आहे. २१ ते ६५ वयोगटातील व २.५० लाखांपर्यंत कुटुंबाचे उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे. ज्या महिलांकडे १५ वर्ष पुर्वीचे केशरी व पिवळे रेशनकार्ड आहे त्यांना उत्पन्नच्या दाखल्याची गरज नाही. नोंदणीच्यावेळी आधारकार्डवरील नाव, पत्ता, आधारक्रमांक तसेच बॅंकखाते आदी माहिती अचूकपणे नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

           आढावा बैठकीस विकास उपायुक्त तथा या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त विभागीय नोडल अधिकारी कमलकिशोर फुटाणे, नगर प्रशासन उपायुक्त श्री. शहा, प्रशांत व्यवहारे आदी उपस्थित होते. तसेच नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

0000000

 

Tuesday, 9 July 2024

पारंपरिक वस्त्रोद्योग विणकरांसाठी बक्षीस योजना

  

Ø  19 जुलै पर्यंत अर्ज करता येणार

नागपूर, दि.09 :  हातमाग वस्त्रोद्योग विणकरांना अतिरिक्त प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यातील पाच पारंपरिक क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट डिझाईनसाठी स्पर्धा घेण्यात येणार असून 19 जुलै 2024 पर्यंत प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयात अर्ज करता येणार आहे.

वर्ष 2024-25 करिता  हातमाग विणकर कुटूंबाना प्रतिमाह 200 युनिट पर्यंत मोफत वीज, उत्सव भत्ता योजना, पाच  पारंपरिक क्षेत्रांमधील वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना व इतर हातमाग योजनांचा लाभ घेण्याकरिता  अर्ज करण्याचे आवाहन, वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर प्रादेशिक उपायुक्त सीमा पांडे यांनी केले आहे.

राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 जाहीर केले आहे. हातमाग वस्त्रोद्योग विणकरांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी अतिरिक्त प्रोत्साहन देणे हे या धोरणाचे एक उद्दिष्ट आहे. याच उद्दिष्टा अंतर्गत पैठणी साडी, हिमरु शाल ,करवत काटी, घोंगडी व खण फॅब्रीक या पाच पारंपरिक क्षेत्रातील विणकरांकरिता राज्यस्तरावर स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस 20,000/-, द्वितीय बक्षीस 15,000/-, तृतीय बक्षीस 10,000/- प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्याकरिता नागपूर विभागातील हातमाग वस्त्रोद्योग विणकरांनी आपले डिझाईन प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग ,नवीन प्रशासकीय इमारत क्र 2,बी-विंग ,8वा मजला ,सिव्हील लाईन ,नागपूर-440001 या कार्यालयात  सादर करता येणार आहे.

000000

खरीप हंगामातील ११ पिकांसाठी ‘पीक स्पर्धा’


 

मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै अंतिम तारीख ;

अन्य पिकांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार

 

नागपूर, दि. 9 : नवनवीन प्रयोगाद्वारे कृषी उत्पादनामध्ये भर घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे मार्गदर्शन परिसरातील शेतकऱ्यांना होण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम -2024 मध्ये विविध 11 पिकांसाठी राज्यांतर्गंत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

  मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै तर अन्य पिकांसाठी 31ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. नागपूर विभागातील जास्तीत -जास्त  शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावार यांनी केले आहे.

 

सर्वसाधारण व आदिवासी गटामध्ये भात, ज्वारी, बाजरी , मका , नाचणी (रागी), तूर, मुग, उडीद, सोयाबिन, भुईमुग व सुर्यफुल या 11 पिकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत  शेतकऱ्यांना भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबिन, भुईमुग व सूर्यफूल या पिकांसाठी पीक स्पर्धेमध्ये अर्ज करता येणार आहे. सर्वसाधारण गटासाठी प्रती पीक प्रवेश शुल्क 300  रुपये तर आदिवासी गटासाठी प्रती पीक  150 रुपये प्रवेश शुल्क राहणार आहे.  

 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी

            या पीक स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे, व स्वत: जमीन कसत असणे आवश्यक आहे. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धकास स्वत:च्या शेतावर स्पर्धेकरिता भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. तालुका स्तरावर  ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून शेतकऱ्यांची उत्पादकता आधारभूत घालून राज्य, जिल्हा, तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्याची निवड करण्यात येईल.

ही कागदपत्रे आवश्यक  

            स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ) भरणे आवश्यक आहे. अर्जासोबत प्रवेशपत्र भरल्याचे चलन, 7/12, 8 -अ उतारा,  जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आणि बॅक खाते, चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत जोडणे अनिवार्य आहे.

           

असे असणार बक्षिसाचे स्वरुप

        स्पर्धेत तालुका पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शेतकऱ्याला 5,000/- रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी 3,000/- रुपये व तृतीय क्रमांकासाठी 2,000/- रुपये असे बक्षिसाचे स्वरुप असणार आहे.  जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शेतकऱ्याला 10,000/- रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी 7,000/- रुपये व तृतीय क्रमांकासाठी 5,000/- रुपये असे बक्षिसाचे स्वरुप असणार आहे. राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शेतकऱ्याला 50,000/- रुपये तर व्दितीय क्रमांकासाठी 40,000/- रुपये व तृतीय क्रमांकासाठी 30,000/- रुपये असे बक्षिसाचे स्वरुप असणार आहे.

            या स्पर्धेच्या संदर्भातील अधिक माहिती  राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, अशी माहिती कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

Monday, 8 July 2024

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर - उद्योग मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. 8 : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा देशात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. राज्याच्या समतोल विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आजवर नक्षलवादी जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आता आम्ही मिटवून उद्योग नगरीचा जिल्हा म्हणून नावारूपास आणत आहोत असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

दैनिक लोकमतच्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. वनामती सभागृहामध्ये आयोजित या समारंभात इंडिया टुडेचे  संपादक प्रभू चावला, दैनिक लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा,  माजी मंत्री नितीन राऊत, दैनिक लोकमतचे संपादक श्रीमत माने व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित उद्योजक शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून  गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी पुढे सरसावत असल्याचे सामंत यांनी सांगितले.

दैनिक लोकमतने पत्रकारितेसमवेत क्रिडा व सामाजिक क्षेत्रात अपूर्व योगदान दिले आहे. संपादकांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार लोकमतच्या सामाजिक बांधिलकीचे व संपादकांप्रती कृतज्ञतेचे द्योतक ठरले आहे या शद्बात त्यांनी गौरव केला. 

यावेळी राज्यस्तरीय पत्रपंडित पद्यश्री पां. वा. गाडगीळ आणि पत्र महर्षी म.य. दळवी स्मृती पुरस्कारांचे वितरण उद्योगमंत्री उदय सामंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

00000

Friday, 5 July 2024

१२ वी व १०वी पुरवणी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध


 

नागपूर, दि. 5 :  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) पुरवणी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र  ४ जुलै २०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या संदर्भात तांत्रिक अडचणी उद्भवल्यास माध्यमिक शाळा तसेच कनिष्ट महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ट महाविद्यालयांना जुलै-ऑगष्ट २०२४ च्या १०वी, १२वी परिक्षेची प्रवेशपत्रे www.mahahsscboard.in  या संकेतस्थळावर ४ जुलै २०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. School/College login मध्ये डाऊनलोड करण्याकरिता ही प्रवेशपत्र उपलब्ध झाली आहे. जुलै ऑगष्ट २०२४ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ट महाविद्यालयांनी  १०वी, १२वी परिक्षेची प्रवेशपत्रे प्रिंट करुन घ्यावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.

ऑनालाईन प्रवेशपत्राची प्रिंट घेण्यास कोणतेही शुल्क पडणार नाही, या प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी घेता येणार आहे, विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा, कनिष्ट महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढुन त्यावर द्वितीय प्रत असा शेरा द्यावा, फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून  मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी  घ्यावे आदी सूचना मंडळातर्फे देण्यात आले आहे.

000000

Wednesday, 3 July 2024

मराठा, कुणबी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणाची संधी Ø अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जुलै

 

नागपूर, दि.3 : मराठा, कुणबी मुला-मुलींसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्यामार्फत महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना 2024-25 करिता 30 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

चालू शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाकरिता (पीएचडी)  क्युएस जागतिक मानांकन क्रमवारीत 200 च्या आत असणाऱ्या व परदेशात शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल अशा विद्यार्थ्यांकरिता नियोजन विभागांतर्गत ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता अर्ज करण्यासाठी 30 जुलै 2024 अंतिम मुदत असून जास्तीत-जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे. या योजनेविषयी विस्तृत माहिती सारथीच्या https://sarthi-maharashtragov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

000000

Monday, 1 July 2024

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 





 

नागपूर, दि. 1 :  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कृषितज्ज्ञ वसंतराव नाईक यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

         आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

             ०००००