Ø 1 ऑगष्ट पासून महसूल सप्ताह
Ø जनतेची प्रलंबित कामांसाठी विशेष मोहिम
नागपूर,दि. 30 : महसूल विभागाशी संबंधीत असलेल्या जनतेच्या अडचणी तसेच प्रलंबित
कामासंदर्भात महसूल सप्ताहानिमित्त विशेष मोहिम राबवून सोडविण्यात येणार आहेत.
तसेच संरक्षण दलातील सैनिक यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे महसूल विभागाशी
संबंधीत असलेल्या विविध कामांसाठी सैनिक हो तुमच्यासाठी तसेच एक हात मदतीचा-
दिव्यांगाच्या कल्याणाचा हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय
आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.
महसूल विभागाकडून
देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच शासनाचे
काम काजाबद्दल माहिती देण्यासाठी दिनांक 1 ऑगष्ट या महसूल दिनापासून तालुका व
जिल्हास्तरावर विशेष महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महसूल मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी
यांनी मोठ्या प्रमाणात महसूल सप्ताह साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार
नागपूर विभागात महसूल सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महसूल सप्ताह निमित्त
गुरुवार दिनांक 1 ऑगष्ट रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ होत असून महिलांच्या आर्थिक
स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना संदर्भात आवश्यक कागदपत्रे
सादर करण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 2 ऑगष्ट रोजी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, दिनांक 3 ऑगष्ट रोजी मुख्यमंत्री तिर्थ
दर्शन योजना तसेच दिनांक 4 ऑगष्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय या मोहिमे
संदर्भात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सोमवार दिनांक 5 ऑगष्ट
रोजी सैनिक हो तुमच्यासाठी या उपक्रमा अंतर्गत संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक
यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे महसूल कार्यालयाकडून विविध दाखले व प्रमाणपत्र,
घरासाठी अथवा शेतीसाठी जमीन वाटपाबाबत असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात
येणार आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात
येणार आहे. मंगळवार दिनांक 6 ऑगष्ट रोजी दिव्यांगांच्या कल्याणासाठी एक हात मदतीचा
हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर विशेष शिबिर
आयोजित करुन स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने उपकरणांचे वाटप, महसूल विभागाशी संबंधीत
दाखले व प्रमाणपत्रे, महिला व बालविकास विभागाशी संबंधीत अनाथ मुलांना अनुज्ञेस
असलेला लाभ देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी तसेच
दिव्यांग व माजी सैनिकांनी महसूल विभागाशी संबंधीत असलेले प्रश्न सोडवावे असे
आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी केले आहे.
बुधवारी समारोप
महसूल सप्ताहाचा बुधवार
दिनांक 7 ऑगष्ट रोजी समारोप होणार आहे. महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणारे
अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिृत्त कर्मचारी यांचा विशेष गौरव व सन्मान करण्यात
येणार आहे. तसेच विभागीय आयुक्त काया्रलयातर्फे विविध स्पर्धांमध्ये यशस्वी
ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
महसूल सप्ताहामध्ये
भूमि अभिलेखा संदर्भात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष
शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विभागात नझूल संदर्भात वर्ग 2 व वर्ग 1
जमीन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना विभागीय
आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी तहसलिदार, जिल्हाधिकारी तसेच संबंधित
महसूल यंत्रणेला दिले आहेत.
00000
No comments:
Post a Comment