Tuesday, 6 August 2024

वैद्यकीय प्रतिपुर्ती विमाछत्र योजनेच्या नुतनीकरणासाठी 30 दिवसांत विमा हप्ता भरण्याचे कोषागाराचे आवाहन

 नव्या सदस्यांना 90 दिवसांचा प्रतिक्षा कालावधी नागपूर,दि 6 : वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेचे ३० दिवसांत नुतनीकरण करणे आवश्यक असून या योजनेत नव्याने समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्यांना ९० दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन, प्रभारी वरिष्ठ कोषागार अधिकारी मोनाली भोयर यांनी केले आहे. शासकीय सेवेच्या अंतिम वर्षात पदार्पित अधिकारी-कर्मचारी तसेच ३० जून २०११ नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारक व कुटुंबांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना सुरू आहे. या योजनेच्या वर्ष २०२४-२५च्या नुतनीकरणास २५ जुलै २०२४ ते २४ जुलै २०२५ या कालावधीसाठी मान्यता देण्यात आली आहे. १ जुलै २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी, अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच गतवर्षी समाविष्ट असलेल्या सर्व सदस्यांना या योजनेमध्ये स्वेच्छेने सहभागी होता येणार आहे. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता १८-३५ वर्ष, ३६-४५ वर्ष, ४६-५८ वर्ष व सेवानिवृत्त या वयोगटानुसार विमा हप्त्याचे दर ठरविण्यात आले आहेत. योजनेच्या नुतनीकरणासाठी संबंधीत विमाधारकास कंपनीद्वारे लिंक मोबाईलवर एसएमएस अथवा ई-मेलद्वारे प्राप्त होणार आहे. विमा हप्त्याचे प्रदान लिंक द्वारे भुगतान करणे बंधनकारक आहे. संबंधीत विमा कंपनीला पेमेंट एनईएफटी/आरटीजीएस/ युपीआय अथवा क्रेडीट कार्डद्वारे प्रदान करता येणार असून डेबीट कार्डद्वारे पेमेंट प्रदान करता येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये विमा धारकांना अडचण आल्यास द न्यू इंडिया ॲश्युरन्स कं. लि. यांचेशी ८६५२४३५९३४/०२२-२६५९००७० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच या योजनेबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर, संकेतांक क्र.२०२४०७२३१०४१११९६०५ द्वारे उपलब्ध आहे. 00000

No comments:

Post a Comment