Monday, 9 September 2024
दूध उत्पादकांकरिता अनुदान योजनेची 30 सप्टेंबर मुदत
राज्य शासनाकडून 540 कोटींची तरतूद
नागपूर, दि. 9 : दूध उत्पादक शेतकऱ्यांकरिता येत्या 30 सप्टेंबर पर्यंत अनुदान योजना कार्यरत असून दूध भुकटी निर्यात प्रकल्प, भुकटी उत्पादक दूध प्रकल्प आणि दूध उत्पादक सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यासर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास विभाग अधिकारी एस.एल. नवले यांनी केले आहे.
राज्यातील सहकारी दूध संघ तसेच खाजगी दूध प्रकल्पांना गाय दुधाचा पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना शासनातर्फे 5 रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान योजना 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी जाहीर करण्यात आली आहे. तसेच दूध भुकटी निर्यात प्रकल्पांकरिता प्रति किलो 30 रु. आणि दूध भुकटी उत्पादक प्रकल्पांसाठी प्रति लिटर 1.50 रु. प्रोत्साहनपर अनुदान जाहीर झाले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सॉफ्टवेयरध्ये डेटा भरणाऱ्या दूध उत्पादक सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना प्रति लिटर 0.05 पैसे इतके प्रोत्साहनपर अनुदान जाहीर झाले आहे.
या योजनेच्या कालावधीकरिता राज्य शासनाकडून 540 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्पांना बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेयर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दूध उत्पादकांनी दुभत्या जनावरांची माहिती प्रकल्पामार्फत पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. या याजनेत दूध उत्पादकांनी प्रकल्पामार्फत सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनुदान योजनेविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी अथवा प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, नागपूर येथे संपर्क करता येणार आहे.
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment