Thursday, 26 September 2024
स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरी सुविधा व सौंदर्यीकरणाला प्राधान्य द्यावे - आयुक्त मनोज रानडे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाचा आढावा
नागपूर, दि. 26 : स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात नागरी सुविधा सौंदर्यीकरण अभियान तसेच विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अश सूचना नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे यांनी दिल्या.
नागपूर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तसेच प्रशासकीय कामांचा आढावा जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आला. त्यावेळी श्री. रानडे बोलत होते.
बैठकीस स्थानिक स्वराज्य संस्थाचे सहआयुक्त संजय काकडे, श्रीमती अश्वीनी वाघमोडे, शंकर गोरे, अधिक्षक अभियंता रत्नाकर बामने, विभागीय सहआयुक्त मनोज कुमार शाहा, सहायक आयुक्त संघमित्रा ढोके, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठणकर, चंद्रपूरचे चंदन पाटील आदी उपस्थित होते.
विभागातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, प्रधानामंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गतीशक्ती योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना करतांना नगरोत्थान अभियान तसेच मालमत्ता कर वसूली, नागरीकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनासाठी असलेले उद्दिष्ट पूर्ण करावेत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी प्राधान्याने सोडवाव्यात असेही आयुक्त मनोज रानडे यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी संघमित्रा ढोके यांनी प्रास्ताविक केले. तर आभार जिल्हा सहआयुक्त विनोद जाधव यांनी मानले.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment