Monday, 11 November 2024
बनावट पत्रव्यवहार करणाऱ्या तोतया व्यक्तीपासून सावध राहण्याचे अपर आयुक्तांचे आवाहन
नागपूर दि. 12 : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या बोर्डा गावातील ए.एम.सय्यद या व्यक्तीने विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन उपायुक्त असा उल्लेख असणारे लेटर हेड वापरून विविध प्रशासकीय विभागास बनावट पत्रव्यवहार केल्याची बाब समोर आली असून याविषयी सदर पोलीस स्थानकास कळविण्यात आले आहे.
ए.एम.सय्यद नावाची व्यक्ती किंवा तसे पद विभागीय आयुक्त कार्यालयात नसून या व्यक्तीकडून कोणत्याही पद्धतीचा पत्रव्यवहार झाल्यास तो जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तपासून घ्यावा आणि आवश्यकतेनुसार यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आवाहन, विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
डेप्युटी कमिश्नर जीएडी, सेंट्रल मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिव्हीजनल कमिश्नर ऑफिस, नागपूर डिव्हीजन, नागपूर या आशयाच्या लेटरहेडद्वारे 2 सप्टेंबर 2024 आणि 20 ऑक्टोबर 2024 रोजी अनुक्रमे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि अभय खारकर, कॅफे हाऊस बोर्डा, तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या नावाने बनावटी पत्रव्यवहार झाल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाला कळविण्यात आले आहे. अशा बनावटी पत्रव्यवहाराद्वारे गुंडाकडून छेडछाड होत असल्याबाबत, गटविकास अधिकाऱ्यास नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता वेतन थकबाकी अदा केली नसल्याबाबतचा उल्लेख आढळून आला आहे.
या व्यक्तीची वारंवार विविध प्रशासकीय विभागास पत्रव्यवहार करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात शासकीय यंत्रणा व इतर व्यक्तींचे नुकसान होवू नये म्हणून चंद्रपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच, नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात कळविण्यात आले आहे. ए.एम.सय्यद हा तोतया व्यक्ती शासकीय यंत्रणा व इतर व्यक्तींचे नुकसान करण्याची शक्यता पाहता नागपुरच्या सदर पोलीस स्थानकास या व्यक्ती विरुद्ध नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करण्याचे अपर आयुक्त कुलकर्णी यांच्याकडून कळविण्यात आले आहे.
००००००
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment