Tuesday, 10 December 2024
केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या प्रसिद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करूया - संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे
नागपुरातील पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या सदस्यांसोबतच चर्चा
नागपूर,दि 10 : केंद्र व राज्य शासनातर्फे राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध महत्वाकांक्षी योजनांना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले होते. त्यानुसार आज पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या (पीआरएसआय) सर्व सदस्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे विदर्भ विभागातील योजनांना प्रसिद्धी देण्यासाठी समन्वयाने काम करण्यासाठी सहकार्य करावे, अशा भावना माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी व्यक्त केल्या.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि पीआरएसआय यांच्या समन्वयाने केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी अनौपचारिक बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी पीआरएसआय चे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.पी.सिंग, नागपूर शाखेचे सचिव मनिष सोनी, डब्ल्युसिएलचे जनसंपर्क महाव्यवस्थापक पी. नरेंद्र कुमार, महामेट्रोचे अखिलेश हळवे, दूरदर्शनच्या रचना पोपटकर आणि मीनल पाठराबे, पीआयबीचे सौरव खेकडे, मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे शरद मराठे आदि उपस्थित होते.
सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विविध महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ गरजुंना मिळावा यासाठी आधुनिक प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर करून समन्वयाने व्यापक प्रसिद्धी करण्यावर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
एस.पी.सिंह यांनी पीआरएसआयच्या माध्यमातून विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, याबाबत आश्वस्त केले. पीआरएसआय तर्फे डॉ. गणेश मुळे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मनिष सोनी यांनी मानले.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment