Friday, 20 December 2024
शासन योजनांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी मोबाईल पत्रकारिता महत्वाची - ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन
नागपूर,दि. 18: आधुनिक माध्यमांच्या युगात मोबाईल पत्रकारितेच्या (मोजो) माध्यमातून शासन योजनांची प्रभावी प्रसिद्धी करता येईल यासाठी हे तंत्र आत्मसात करणे आवश्यक आहे, असे ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन यांनी आज सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांनी ‘माजो’ संदर्भात महत्वाच्या टिप्स दिल्या.
माहिती संचालक कार्यालयात ‘मोजो’ संदर्भातील छोटेखानी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. संचालक डॉ. गणेश मुळे यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी, माहिती अधिकारी, सहायक संचालक, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर आणि वृत्त विभागाशी संबंधित कर्मचारी, या प्रशिक्षणास उपस्थित होते.
मोबाईल कॅमेरा वापरतांना प्रकाश, ग्रीड लेवल, ऑडियो, बॅकग्राउंड यासह विविध कॅमेरा अँगलचा उपयोग करुन ध्वनी चित्रफित बनविण्याचे तंत्र यावेळी श्रीमती चंद्रन यांनी समजावून सांगितले. विविध प्रसंगाचे वार्तांकन करतांना वापरावयाची आवश्यक मोजो किट, सहाय्यभूत ठरणारे मोबाईल अप्लिकेशन आणि विविध उपकरणांची माहिती दिली. मोबाईलवर चित्रित करण्यात आलेल्या फुटेजचे संपादन करण्याची पद्धती आणि त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरचा वापर याबाबतही त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. मोजोचा प्रभावी वापर करण्यासाठी काय करावे आणि काय करु नये याचेही सविस्तर विवेचन त्यांनी यावेळी केले. उपस्थितांनी मोजोबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांची उदाहरणासह माहिती देवून प्रतिभा चंद्रन यांनी उत्तरे दिली. मोजोची बलस्थाने व त्याचा नेटका वापर करुन प्रभावी प्रसिद्धी करण्याच्या विविध टिप्स त्यांनी दिल्या.
तत्पूर्वी संचालक डॉ. गणेश मुळे यांनी प्रस्ताविकात प्रशिक्षणामागील मनोदय व्यक्त केला. वर्धा जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांनी आभार मानले. अधिपरिक्षक पुस्तके व प्रकाशने कार्यालयातील सहायक संचालक ईरशाद बागवान, सहायक संचालक संतोष तोडकर उपस्थित होते.
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment