नागपूर, दि. 28: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी
वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची
गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश
सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज दिलेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ
याच्या अध्यक्षतेखाली विविध योजनांचा आढावा घेण्यात आला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना
ते बोलत होते. यावेळी नागपूर विभागातील सर्व उपायुक्त व संशोधन अधिकारी, जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण
अधिकारी उपस्थित होते.
बहुतांश
वसतिगृहाची क्षमता ही केवळ शंभर विद्यार्थी क्षमता असलेली आहे. त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना
वसतिगृहाचा लाभ घेता येत नाही त्याकरीता नवीन वसतिगृहाची निर्मिती ही कमीत कमी दिडशे
ते दोनशे व जास्तीत जास्त हजार विद्यार्थी क्षमता असलेले निर्माण करा. वसतिगृह महाविद्यालयाच्या
जवळपास निर्माण करा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल, असे निर्देश
समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.
समाज कल्याण विभागाच्या योजनांचा आढावा
घेतांना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, वसतिगृहाचा लाभ हा सर्व विद्यार्थ्यांना घेता
आला पाहिजे. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक गतीमान करा. जात वैधता प्रमाणपत्र
विद्यार्थ्यांना वेळेत मिळण्यासाठी तत्परतेने कार्य करा. प्रत्येक अधिकाऱ्यांनी कार्य
करतांना आपल्या विभागाविषयी व आपल्या कार्याविषयी चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचला
पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित
जाती व अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ
नये असे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे निर्देश विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप
कांबळे यांनी दिले. समाज कल्याण विभागाचे प्रधान
सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक
सुरेंद्र पवार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. मंगेश वानखेडे, सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment