Monday, 27 October 2025

अरहम ॲनिमल ॲम्ब्यूलन्स’ सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 


           नागपूर,दि 26: राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब जी यांच्या दिव्य आशीर्वादाने 'अरहम ॲनिमल ॲम्ब्यूलन्स’ सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. रामगिरी निवासस्थान येथे हा सोहळा झाला.

            यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीत आपण केवळ माणसांचा नव्हे, तर सर्व प्राणीमात्रांचा विचार करतो. सगळ्यांना जगण्याचा समान अधिकार आहे. याच सेवाभाव आणि करुणेच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाची सुरुवात होत आहे. ॲनिमल केअर हॉस्पिटलसाठी जागेची मागणी करण्यात आली आहे. यासाठी सकारात्मक विचार करू असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

           'अरहम ॲनिमल ॲम्ब्युलन्स'सेवेशी जोडलेले राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब जी आणि सर्व कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आभार मानले.


                                                                                           00000

नवीन पाच पोलीस चौकीमुळे नागपुरच्या सुरक्षिततेला मिळणार बळ - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 



पाच पोलीस चौकीचे उदघाटन

 

      नागपूर, दि. 26 : नागपुरच्या वाढत्या विस्ताराला लक्षात घेऊन सुरक्षितता व सुरक्षा नियोजनाच्या दृष्टीने काही भागांसाठी पोलीस चौक्यांची आवश्यकता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेले निर्देश लक्षात घेऊन शहरातील पाच ठिकाणी पोलीस चौकींची उपलब्धता करण्यात आली आहे. यामुळे निश्चितच नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासह अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास महसूल मंत्री तथा  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

 

      पोलीस आयुक्त कार्यालय येथे आज त्यांच्या हस्ते या पाच पोलीस चौकीचे दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेद्र दाभाडे, शिवाजी राठोड, पोलीस उपायुक्त  लोहित मतानी, दिपक अग्रवाल व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. गणेश नगर कोराडी, कापसी, जामठा, गोंडखैरी, उमरगाव या ठिकाणी  पोलीस चौकी साकारण्यात आल्या आहेत.

 

     पोलीस विभागाच्या यु-टर्न ऑपरेशनमुळे वाहतुक सुरक्षित होणार असून अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. नागपूर शहर आता आंतराष्ट्रीय शहर म्हणून नावारुपास आले आहे. सुरक्षीत नागपूरसाठी युवकांचा सहभाग आवश्यक असून त्यासाठी पोलीस विभागाने युवकांना सोबत घेऊन सुरक्षीत नागपूर उपक्रमाला लोकसहभागाची जोड द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी केले. यु- टर्न ऑपरेशनमुळे कायदा व सुव्यवस्था सुरळीत होण्यास मोठा हातभार लागणार असून नागरिकांसाठी वाहतूक सोईची होईल, असे  त्यांनी सांगितले.

 

00000

खेळाडूंच्या जडणघडणीसाठी अंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह उत्तम पायाभूत सुविधा देण्यावर भर - मुख्यमंत्री देवेंद फडणवीस

 


75 व्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन 

नागपूर,दि. 26 : महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीने शासनाच्या क्रीडा विभागाअंतर्गत एक व्यापक धोरण आपण अंगिकारले आहे. खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्यात अधिक पारंगत होता यावे यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक व इतर पायाभूत सुविधा आपण व्यापक प्रमाणात उपलब्ध करुन देत आहोत. मिशन ऑलम्पिकची तयारी क्रीडा विभागामार्फत सुरु करण्यात आली असून गत काही वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्यातील खेळाडू आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत यशाला गवसणी घालताना दिसत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. 

नागपूर येथे धरमपेठ क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित 75 व्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट राज्य बॉस्केट बॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य संदीप जोशी, आमदार विकास ठाकरे, अखिल भारतीय बास्केटबॉल संघटनेचे सचिव कुलविंदर गिल, राज्य बास्केट बॉल असोसिएशनचे सचिव गोविंद मुथुकुमार व मान्यवर उपस्थित होते.  

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी, खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर आपल्या क्रीडा कौशल्याला दाखविण्याची संधी मिळावी यादृष्टीने खेलो इंडिया हे व्यापक अभियान हाती घेतले. महाराष्ट्राने क्रीडा क्षेत्रात अलिकडच्या काही वर्षात जे सातत्यपूर्ण प्रयत्न केले त्या प्रयत्नांना आपल्या खेळाडूंनी खेलो इंडियामध्ये सार्थकी लावले. गत तीन वर्षात महाराष्ट्र हा खेलो इंडियातील विविध स्पर्धांमध्ये आघाडीवर राहीला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

नागपूर येथे आपण अधिकाधिक ठिकाणी खेळाडूंसाठी क्रीडा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मानकापूर येथे अंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम असे भव्य क्रीडा संकुल साकारत आहोत. मोठया प्रमाणात स्पर्धांचेही आयोजन करीत आहोत. चांगल्या खेळाडूला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या उपलब्ध करुन देण्यावर आमचा भर असल्याचे ते म्हणाले. 

गत आठ वर्ष बास्केटबॉलसाठी संघटनेतील राजकारणामुळे खेळाडूंना अनेक गोष्टींना मुकावे लागले. खेळातील राजकारणाला बाजूला सारून खेळाडूंसाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी आमदार संदीप जोशी यांनी महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ते खेळाडूंसाठी अधिक तत्परतेने आपली जाबाबदारी पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

क्रीडा संघटनामधील आपसी हेव्यादाव्यांपेक्षा खिलाडूवृत्तीला सर्वोच्च स्थान असल्याचे ते म्हणाले. कोणताही खेळाडू या  खिलाडूवृत्तीच्या बळावरच आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात अखिल भारतीय पातळीवरील यश संपादन केलेल्या अंडर 18 व अंडर 13 स्पर्धेतील अनुक्रमांक   तिसरा क्रमांक व रनरअप ठरलेल्या खेळाडूंना रोख बक्षीसांचा धनादेश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट राज्य बास्केट बॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य संदीप जोशी यांनी केले. आठ वर्षानंतर प्रथमच या स्पर्धा महाराष्ट्रात होत असल्याचे त्यांनी सांगितले. खेळाडूंना प्रेरणा मिळावी यादृष्टीने आपण महाराष्ट्रात विजेत्या टिममधील खेळाडूंना रोख बक्षीसे देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार विकास ठाकरे व अखिल भारतीय बॉस्केट बॉल संघटनेचे सचिव कुलविंदर गिल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Sunday, 26 October 2025

संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख · मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

     सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस  प्रकल्पास मिहान येथे   २२३ एकर भूखंडाचे वितरण 

 नागपूर, दि. 23 : मिहान आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेंस अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी  233 एकर क्षेत्रात  अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादनात  प्रकल्प  उभारणार आहे. या प्रकल्पासाठी मिहान तर्फे 233 एकर भूखंडाचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

            रामगिरी येथे आयोजित  कार्यक्रमात  मिहान संघ  प्रकल्पातील आजपर्यंतच्या सर्वात मोठया भुखंडाचे वितरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते कंपनीचे अध्यक्ष श्री. सत्यनारायण नुवाल यांना करण्यात आले. या प्रसंगी संरक्षण उत्पादन कंपनीचे मनीष  नुवाल, राघव नुवाल, जे.एफ साळवे तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे  व्यवस्थपकीय संपादक तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर श्री. गौरव उपश्याम, संजय इंगळे आधी उपस्थित होते.

             सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी  राज्यात 12 हजार 80 कोटीची गुंतणूक करुन अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन  प्रकल्प  उभारणार आहे.  या प्रकल्पामुळे  6 हजार 800 प्रत्येक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच मिहान आर्थिक क्षेत्रात 680 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करुन विमान व संरक्षण उपकरण निर्मिती केंद्र स्थापन करणार आहे. या प्रकल्पामुळे 875 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

            प्रमुख संरक्षण एरोस्पेस उत्पादन केंद्र  सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्प  विकासासाठी   देशातील प्रमुख संरक्षण व एरोस्पेस  उत्पादन केंद्र  म्हणून  विकासासाठी मोठी मदत  होणार आहे. हा  उपक्रम महारास्ट्राच्या ‘ मेक इन इंडिया’ ‘आत्मनिर्भर भारत’ आणि औद्योगिक प्रगतीच्या  विकासाठी अधिक बळकटी देणारा ठरणार असल्याची  ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

            सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीला वितरीत करण्यात येते. मिहान सेझ प्रकल्पातील सर्वात मोठे भूखंड असून महाराष्ट्राच्या प्रगत, गुंतवणूकदार-अनुकूल धोरणांचा व अग्रगण्य उद्योगांचा वाढता विश्वास यावरून अधोरेखित होतो.असल्याचे  यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगीतले.

            या प्रकरणामुळे  संरक्षण उत्पादन उद्योग क्षेत्रात/ नागपूरला आंतरराष्ट्री स्तरावरील  नान्यता मिळणार असून यामुळे विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीत मोठी भर पडणार आहे.

शासन व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित असून, उच्च-मूल्य गुंतवणूक आकर्षित करणे, प्रादेशिक रोजगारनिर्मिती वाढवणे आणि संरक्षण व उत्पादन क्षेत्रात राज्याचे नेतृत्व अधिक दृढ करणे हा त्यामागील हेतू  असल्याचे यावेळी एमएडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. विपीन ईटनकर यांनी सांगितले.

 

*****


'महाज्योती'च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

'महाज्योती'च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन 

नागपूर, दि. 19 :  महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज आकारास आले आहे.  येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त ठरणार आहे. याला आपण इतर मागासवर्ग विभागाची स्थापना केल्यामूळे गती मिळाली. या विभागाच्या माध्यमातून होतकरू नवीन पिढी आकारास येईल तसेच त्यांच्या स्वप्नांना बळ मिळून गगनभरारी घेता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

सदर येथील जिल्हा नियोजन भवन आवारात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त व नियोजन राज्य मंत्री अॅड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, परिणय फुके, कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे उपस्थित होते. 

मुख्यमंत्री बोलताना पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाला पुढे नेण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यात प्रशिक्षण, स्वयंरोजगार यांचा समावेश आहे. ओबीसी समाजातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी महाज्योतीची निर्मिती केली असून याला पुरेसा निधी उपलब्ध केला आहे.  आज ओबीसी मुलासाठी 60 पेक्षा जास्त वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत.  महाज्योतीतून प्रशिक्षण घेऊन मुले विविध स्पर्धा परिक्षेत यश संपादन करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ओबीसी समाजाची नॉन क्रिमिलिअर मर्यादा आपण आठ लाखांपर्यंत नेली आहे. ओबीसी समाजाच्या कल्याणसाठी शासन तत्पर असल्याचे ते म्हणाले. 

शैक्षणिक प्रगतीचा पाया घालणारा क्षण

-          पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाज्योती संस्थेच्या स्वतंत्र इमारतीची पायाभरणी आज झाली आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. नागपूरच्या भूमीवर आता ‘महाज्योतीची भव्य 7 मजली प्रशासकीय इमारत तयार होणार आहे.  हा केवळ वास्तूचा नव्हे तर शैक्षणिक प्रगतीचा पाया घालणारा क्षण असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 

ही प्रशासकीय इमारत शिक्षणासह संस्कार आणि संशोधनासाठी आदर्श मापदंड ठरेल

                        - मंत्री अतुल सावे

नागपूर येथील महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीत या इमारतीत वाचनालय, समुपदेशन कक्ष, प्रशिक्षण कक्ष, भोजन कक्ष आणि 248 विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय अशा सर्व सुविधांचा समावेश असणार आहे. ही वास्तू म्हणजे शिक्षण, संस्कार आणि संशोधनाचा पवित्र संगम राहणार आहे. नाशिक येथे देखील महाज्योती संस्थेचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी 174 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे मंत्री श्री. सावे यावेळी म्हणाले. 

महाज्योती संस्थेतून प्रशिक्षण घेऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कार व महाज्योतीच्या यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आला. तसेच सात मजली प्रशासकीय इमारत बांधकामाची चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी केले. आभार मुख्य लेखा अधिकारी प्रशांत वावगे यांनी मानले. तर सूत्रसंचालन दिनेश मासोडकर यांनी केले. 

अशी असेल सात मजली प्रशासकीय इमारत

राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी उभारली जाणाऱ्या भव्य  7 माळ्याची प्रशासकीय इमारतीचे बांधकाम नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) मार्फत होत आहे. महाज्योतीच्या कार्यक्षमतेत आणि सेवाक्षमतेत अभूतपूर्व वाढ घडवणारा हा पायाभूत उपक्रम ठरणार आहे. या प्रशासकीय इमारतीत तळघर क्रमांक 1 व 2 मध्ये मुबलक वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तळमजल्यावर 500 लोकांच्या क्षमतेचे ऑडिटोरियम, अभ्यास कक्ष, नियंत्रण कक्ष आणि उपहारगृह असणार आहे.  पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यांवर अधिकारी व कर्मचारी यांची बैठक व्यवस्था तसेच प्रशासकीय सभागृह असतील. तिसऱ्या मजल्यावर अभिलेख कक्ष व उपहारगृह, तर 4, 5, 6 आणि 7 व्या मजल्यांवर प्रशिक्षण कक्ष आणि बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. ही इमारत आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक बांधणी आणि कार्यक्षम जागा नियोजनाचा सुंदर संगम ठरणार आहे.

00000

 

 


समाजातील प्रत्येक वंचित व्यक्तीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

जिल्ह्यातील 1 हजार महिला बचत गटांना व्यवसायासाठी

प्रतीगट 1 लाख रूपयांचा निधी

-          महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

Ø  जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण संजीवनी योजनेंतर्गत दोन टप्प्यात एकूण 755 ई-रिक्षांचे दिव्यांग व्यक्तींना वाटप 

नागपूर, दि. 19 :- सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक व्यापक विचार आम्ही बाळगला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकातील माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जी दूरदृष्टी बाळगली ती प्रत्यक्षात आम्ही समाजातील विविध घटकांना प्रत्ययास देत आहोत. त्यांना अभिप्रत असलेल्या सामाजिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून सामाजिक न्याय विभागाचा हा विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ पोहचविण्याचा उपक्रम याचेच द्योतक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.   

स्व. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या समारंभात ते बोलत होते. प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने ई-रिक्षा व इतर वैयक्तिक लाभ योजना वाटप समारंभास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहनिर्माण तथा इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, सर्वश्री आमदार कृपाल तुमाने, परिणय फुके, डॉ. आशिष देशमुख, मोहन मते, चरणसिंग ठाकुर, संजय मेश्राम, राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

वंचित घटकांना स्वंयरोजगाराची साधने मिळण्यासाठी आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्नरत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महिलांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली आहे. राज्यात आपण 25 लाख दीदींना लखपती केले आहे. आजच्या घडीला राज्यात सुमारे 50 लाख दीदी आता लखपती दीदी झाल्या आहेत. लवकरच 1 कोटी दीदींना लखपती करण्याचा संकल्प आपण पूर्ण करू असा, विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

जिल्ह्यातील मांग-गारुडी व इतर वंचित घटकातील व्यक्तींना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन शासनाचे विशेष कॅम्प लावले. यातून या समाजाला त्यांच्या हक्काचे ओळखपत्र मिळाले. यामुळे रमाई आवास सारख्या योजना प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पाहचविणे आता सहज शक्य झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचा गौरव केला.

जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी व्यक्तीला ऊर्जा दाता करण्याची नाविन्यपूर्ण योजना राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मांडली. यानुसार नाविन्यपूर्ण योजनेतून प्रत्येक आदिवासी घरावर सौरऊर्जा देण्याचे नियोजन झाले. या योजनेतील उपयोगीता लक्षात घेवून लवकरच अनुसूचित जाती व इतर मागासवर्ग घटकातील उपेक्षित लोकांनाही या योजनेचा लाभ पोहचू असे, सुतोवाच त्यांनी केले.  

                                                 जिल्ह्यातील 1 हजार महिला बचत गटांना व्यवसायासाठी

प्रतीगट 1 लाख रूपयांचा निधी

-          महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अधिकाअधिक महिलांना आपल्या व्यवसायाला आकार देता यावा, त्यांच्या व्यावसायीक कल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी जिल्ह्यातील 1 हजार महिला बचत गटांना प्रती गट 1 लाख रूपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देवून असे, प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकंमत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेंतर्गत सुमारे 20 कोटी रूपयांचा निधी सामाजिक न्यायासाठी, वंचित घटकातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून आपण उपयोगात घेतला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजनानांही आपण अधिक गती देवू असे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी आपण कल्पक करणार आहोत. प्रत्येक गावापातळीवर शासनाच्या विविध विकास योजना प्रभावीपणे व पारदर्शकपणे पोहचाव्यात यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाला जोडण्यासाठी एक परीपूर्ण वॉररूम साकारली जात असून याद्वारे आरोग्याच्या अधिक परिणामकारक सुविधा पोहोचवील्या जाणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.   

यावेळी वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी लवकरच दिव्यांग बांधवांनसाठी अधिक प्रभावीपणे शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली असून प्रत्येक  जिल्हा वार्षिक योजनेतून यासाठी ठराविक रक्कम देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करू, असे सांगितले. 

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाने निर्मिती केलेल्या रमाई घरकुल योजनेच्या लघुपटाचे याचबरोबर 'स्वप्न ते सत्य' कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले. कामठी तालुक्यातील वारेगाव शाळेतील अॅडव्हेंचर पार्कचे दुरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन या समांरभात करण्यात आले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शेत जमिनीचे कागदपत्र वाटप करण्यात आले. एकूण 49 एकर 23 लाभार्थ्यांना देण्यात आली.  घर घर संविधान अंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रस्ताविका देण्यात आल्या. जिल्हा परिषद, नागपूर व महानगरपालिका, नागपूर अंतर्गत आशा व अंगणवाडी सेविकांना सायकलींचे वितरण करण्यात आले. विशेषत: दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एकूण 755 ई-रिक्षा वितरित करण्यात आल्या. यातील 200 ई-रिक्षा पहिल्या टप्प्यात तर 555 ई-रिक्षा आजच्या दुसऱ्या टप्प्यात वितरित करण्यात आल्या. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना कार्यालयीन सुविधेसाठी एकूण 6 हजार 334 सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले.

                                                                            00000

 

 

 

 


हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

 



नागपूर, दि. 13:  हिवाळी अधिवेशनाच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज सर्व यंत्रणांच्या पूर्व तयारीचा आढावा घेवून व्यवस्थेबाबत नियोजनबद्ध व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

         जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपाच्या सहआयुक्त वसुमना पंत, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी, अपर आयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत राऊळकर, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

          अधिवेशनासाठी येणारे मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी आवश्यक निवास व्यवस्था आणि वाहन व्यवस्थे संदर्भात विषय निहाय सविस्तर चर्चा झाली.या दोन्ही व्यवस्थांनी चोख नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या तसेच दूरध्वनी, इंटरनेटची अद्ययावत व्यवस्था उभारण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी केल्या.अल्पोपहार व भोजन व्यवस्था देताना खाद्य पदार्थांचे प्रमाणीकरण व योग्य नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

          सुयोग येथे फक्त पत्रकारांची निवास व्यवस्था तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था वनामती येथे करण्यास याबैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्ताविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वच्छता, पाणी पुरवठा व अग्निशमन व्यवस्था,आरोग्य व औषधीय सेवा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात येणारी हिवाळी अधिवेशन संपर्क पुस्तिका आदी विषयांवरही चर्चा झाली.

००००


विभागीय लोकशाही दिनात दोन तक्रारी प्राप्त

 


तक्रारीसंदर्भात चंद्रपूर मनपाला स्पष्ट अभिप्राय देण्याच्या विभागीय आयुक्त यांच्या सूचना

         नागपूर, दि. 13: विभागीय लोकशाही दिनात चंद्रपूर महानगरपालिकेशी संबंधित अतिक्रमणाबाबत दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी तक्रारीसंबंधात स्पष्ट अभिप्राय व उत्तर देण्याच्या सूचना मनपाला केल्या आहेत.

            विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विभागीय लोकशाही दिनात चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील दोन तक्रारी प्राप्त झाल्या. यातील पहिल्या तक्रारीनुसार तक्रारदाराने त्यांच्या राहत्‍या घरामागील सभागृहालगत गल्लीत त्यांच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे सांगितले. या विषयाबाबत मनपाच्या सहायक रचनाकार यांच्याकडून साध्यंत माहिती घेतली व या प्रकरणात मनपाने तक्रारदाराने नमुद केलेल्या जागेची प्रत्यक्ष मोजणी करून स्पष्ट अभिप्राय देण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी केल्या.

            अन्य एका तक्रारीनुसार तक्रारदाराच्या मालकीच्या जागेवर रस्ता बांधकामाद्वारे मनपाकडून अतिक्रमण झाल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराने मनपाकडून संरक्षक भिंत बांधण्याची परवानगी मागितली आहे. या प्रकरणाबाबत तक्रारदार व मनपा अधिकारी यांच्याकडून माहिती घेवून श्रीमती बिदरी यांनी मनपाकडून स्पष्ट उत्तर देण्याच्या सूचना केल्या. यावेळी अपर आयुक्त सामान्‍य प्रशासन तेजूसिंग पवार यांच्यासह कृषी, पोलीस, जलसंपदा, कामगार, भूमी अभिलेख आदी विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

            लोकशाही दिनानंतर श्रीमती बिदरी यांनी उपस्थित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातील अनुकंपतत्वावरील भरती प्रक्रिया तातडीने निकाली काढण्याच्या सूचना केल्या. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये महिलांवरील लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींच्या निराकरणासाठी लैंगिक छळ प्रतिबंधात्मक समिती (पॉश) समिती स्थापन करण्याच्या सूचना केल्या. ज्या कार्यालयांमध्ये महिलांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. अशा महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पॉश समितीमध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले.     

०००००


Sunday, 12 October 2025

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा - महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 


 रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान 

नागपूर, दि. 12 :  जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री रोजगार मेळाव्याचे आयोजन सुरु आहे. जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी दर महिन्याला हा उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. 

             श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तथा युवा फाउंडेशन व नॅशनल रिअल इस्टेट काउन्सिल (नरेडको) विदर्भच्या वतीने महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे ‘पालकमंत्री रोजगार मेळावा 2.0’ चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते. कोराडीचे सरपंच नरेंद्र धनोले, माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

            रोजगार मेळावा आयोजन समितीने यापूर्वी आयोजित केलेल्या पहिल्या रोजगार मेळाव्यात 136 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केली होती. उपक्रमातील आजचा हा दुसरा मेळावा असून यातही युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत दर महिन्याला रोजगार मेळावा आयोजित करून जास्तीत-जास्त रोजगार उपलब्ध करून द्यावा व पुढील रोजगार मेळाव्याची तयारी आतापासूनच सुरू करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. मेळाव्यात सहभागी कंपन्याच्या प्रतिनिधींचे आभार मानत यापुढेही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

            पालकमंत्री रोजगार मेळाव्यासाठी 1 हजार युवक-युवतींनी नोंदणी केली. यातील 500 जणांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊन विविध क्षेत्रातील 16 कंपन्यांसाठी मुलाखती दिल्या. 100 पेक्षा जास्त उमेदवारांना या मेळाव्यात नियुक्तीपत्र देण्यात येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. 

पालकमत्र्यांच्या हस्ते 20 पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप

            या कार्यक्रमातच महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामठी तालुक्यातील नांदा गावातील 20 पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात आले.

 

000000


Tuesday, 7 October 2025

देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्थाच्या ‘ब’ श्रेणीत ‘नागपूर फ्लाईंग क्लब टॉप टेन’ मध्ये

 

 

डिजीसिएचे नामांकन जाहीर 

 

नागपूर, दि.७ :- केंद्र शासनाच्या नागरी विमान महासंचालनालयाच्या (डिजीसिए) तर्फे भारतातील ब श्रेणीतील उत्कृष्ट विमान चालक प्रशिक्षण संस्थांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. यात राज्य शासनाच्या नागपूर फ्लाईंग क्लबला ब श्रेणीमध्ये टॉप टेन नामांकन जाहीर करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाईंग क्लबच्या अध्यक्ष श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली. 

नागपूर फ्लाईंग क्लबचे महाराष्ट्र शासनातर्फे संचलन करण्यात येत असून या क्लबकडे चार प्रशिक्षणार्थी विमान आहेत. केंद्र शासनाच्या भारतीय नागरी विमान महासंचालनालयातर्फे उड्डान प्रशिक्षणाकरिता मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नागपूर येथे प्रशिक्षणासाठी पुरेशा वेळ उपलब्ध होत नसल्याने चंद्रपूर येथील मोरवा विमानतळावर दुसरा बेस तयार करण्यात आला आहे. मोरवा विमानतळावरील प्रशिक्षणालाही डिजीसिएची उड्डाण प्रशिक्षणाकरिता मान्यता मिळाली आहे. फ्लाईंग क्लबच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अपर आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक तेजुसिंग पवार यांच्याकडे आहे. 

भारतातील मान्यता प्राप्त विमान प्रशिक्षण संस्थांमध्ये असलेल्या सुविधा संदर्भात नागरी विमान महासंचालनालयातर्फे नामांकन यादी जाहीर करण्यात येते. दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर  करण्यात आलेल्या नामांकनातील प्रत्यक्ष विमान प्रशिक्षणासंदर्भातील वर्गवारीनुसार ब श्रेणीमध्ये एकूण १३ संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर फ्लाईंग क्लब दहाव्या क्रमांकावर आहे. 

मोरवा विमानतळावर प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व सूविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ पासून ८३५ पेक्षा जास्त तास उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी सेसना-१५२ या श्रेणीतील तीन विमाने तर सेसना-१७२ या श्रेणीतील एक विमान आहे. प्रत्येक प्रशिक्षण तुकडीत ४२ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा समावेश असून यापैकी वाणिज्य विमान प्रशिक्षणासाठी ३७ तर वैयक्तिक प्रशिक्षणासाठी ५ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. अल्पावधितच नागपूर उड्डाण क्लबने प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्था पूर्ण केल्यामुळे भारत सरकारच्या नागरी विमान महासंचालनालयातर्फे ब श्रेणीमध्ये समावेश होऊन पहिल्या दहा मध्ये रँकिग मिळविली असल्याचे श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.

    

००००००

 


महर्षी वाल्मिकी यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 

 

        नागपूर, दि.07 :  आदिकवी व रामायण महाकाव्याचे रचेते महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. 

आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार  यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

00000

 

 

 

‘नागपूर ग्रोथ हब किक कार्यशाळा’ आयोजनाबाबत बैठक - विविध पाच गटांमध्ये होणार विचारमंथन ; मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन

 


 

 

नागपूर, दि.७ :- विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये नागपूर व परिसराच्या आर्थिक विकासासाठी  कार्यपद्धती आखण्याच्या दृष्टीने येत्या १२ ऑक्टोबर रोजी नागपूर स्थित भारतीय व्यवस्थापन संस्थेमध्ये (आयआयएम) ‘नागपूर ग्रोथ हब किक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत  नागरी क्षेत्र विकास, उद्योग, कृषी, वने, खाण या पाच गटांमध्ये तज्ज्ञ मंडळी विचार मांडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारोप सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. 

राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) चे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे नागपूर ग्रोथ हब किकच्या आयोजनाबाबत आज बैठक झाली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार परिणय फुके आणि सुमित वानखेडे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. 

नागपूर व परिसरातील उपलब्ध स्त्रोतांचा प्रभावी उपयोग करुन विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक थिंक टँक निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. वाढते नागरीकरण व भविष्यातील उद्दिष्टे यांची सांगड घालणे, मिहान परिसरात सुरु असलेले विविध उद्योग तसेच नागपूर व परिसरात विविध उद्योगांची श्रृंखला व त्याची वाढ करणे, या भागातील कृषी व कृषी आधारित उद्योगांच्या विकासासाठी कार्यपद्धती तयार करणे, वने व वन्यजीव क्षेत्रामध्ये रचनात्मक कार्य करुन विकास साधणे, कोळसा व खनिजांनी समृद्ध असलेल्या या भागाचा विकास साधण्यासाठी महत्वाची पावले उचलण्यासंदर्भात तज्ज्ञ मंडळीचे गट स्थापन करण्याबाबत यावेळी सूचना करण्यात आल्या. या कार्यशाळेच्या अनुषंगाने विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. श्रीमती बिदरी, डॉ. विपिन इटनकर आणि डॉ. अभिजित चौधरी यांनी यावेळी विचार मांडले.

  

००००००

 


Monday, 6 October 2025

अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत घडलेल्या गुन्ह्यांचा तपासाला प्राधान्य द्या - विजयलक्ष्मी बिदरी

 

Ø  विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक

Ø  निवृत्तीवेतनासह आर्थिक लाभासाठी 2कोटी 50 लक्ष

Ø  पिडीतांच्या वारसाच्या नोकरीचे प्रस्ताव सादर करा

Ø  विभागात 154 गुन्ह्यांची नोंद 

           नागपूर, दि. 06 : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंद झालेल्या प्रत्येक प्रकरणांचा सखोल तपास करून न्यायालयात अशी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही. याची दक्षता घेतांनाच लाभार्थ्यांना समितीमार्फत आर्थिक लाभाची प्रकरणे तात्काळ निकाली काढा असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले. 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत घडलेल्या प्रकरणांचा आढावा विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्रीमती बिदरी बोलत होत्या. 

         यावेळी विभागतील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक दृकश्राव्य पद्धतीने तसेच नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक संदिप पाटील, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त प्रसाद कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त एन. के. कुकडे आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

           नागपूर विभागात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 1 एप्रिल पासून 154 गुन्ह्यांची नोंद झाली असून यामध्ये अनुसूचित जातीचे 110 तर अनुसूचित जमातींच्या 44 प्रकरणांचा समावेश आहे.  पोलीस तपासा अभावी तसेच न्याय प्रविष्ठ असलेल्या प्रकरणांसदर्भात तात्काळ चौकशी करून न्यायालयासमोर परिपूर्ण प्रकरणे सादर करण्याला प्राधान्य  देण्याच्या सूचना करतांना श्रीमती बिदरी म्हणाल्या की, ऑगस्ट महिन्यापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात अर्थसहाय्य करण्यासाठी 2कोटी 50 लक्ष रूपयांचा निधीचे वाटप तात्काळ पूर्ण करावे. याअंतर्गत 1 कोटी रूपये निवृत्ती वेतनाकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. 

            दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकी उपविभागीय स्तरावर वर्धा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात नियमित बैठकी घेण्याच्या सूचना करतांना विभागीय आयुक्तांनी मृत झालेल्या कुटुंबांना शासकीय नोकरी संदर्भात प्रलंबित असेलेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासोबत पेंशन संदर्भातही प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

प्रारंभी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी नागपूर विभागात घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील, दाखल झालेले गुन्हे यांतर्गत ॲक्ट्रॉसिटी अंतर्गत न्यायप्रविष्ठ व शिक्षा झालेल्या गुन्ह्यासंदर्भात माहिती दिली. पोलीस तपासांतर्गत 1 वर्षावरील 14 प्रकरणे तर 6 महिन्यापर्यंतच्या 2 प्रकरणासंदर्भात तपास सुरू असल्याचे यावेळी सांगितले. विभागात 78 प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

जादूटोणा विरोधी कायद्याच्या आढावा 

          विभागीयस्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा व कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यासंदर्भात प्राधान्य देण्यात येत असून गडचिरोली, गोंदिया, भंडारा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहूल भागात ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत प्रत्येक नागरिकांपर्यंत या कायद्याची माहिती समितीमार्फत पोहचविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या. 

                जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत नागपूर शहरात 16 तर ग्रामीण भागात 17 अशा 33 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वर्धा 10, भंडारा 15, गोंदिया 11, चंद्रपूर 36 तर गडचिरोली जिल्ह्यात 11 अशा नागपूर विभागात 116 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. प्रत्येक गुन्ह्यासंदर्भात पोलीस विभागातर्फे चौकशी करण्यात येवून न्यायालयात प्रकरणे दाखल करण्यात आली आहे. प्रचार व प्रसिद्धीच्या दृष्टीने विभागात 108 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले. 

तृतीयपंथी यांच्या हक्काचे संरक्षण 

          तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचा आढावा विभागीय आयुक्त यांनी घेतला. तृतीय पंथीयांना आधारकार्ड सह आयुष्यमान कार्ड तसेच संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष शिबीर आयोजित करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी दिल्या.  

                तृतीयपंथी यांच्या हक्काचे संरक्षण करतांना त्यांना आवश्यक सुविधा व सोयी प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले. नागपूर जिल्ह्यात 251 तृतीयपंथीय असून 204 तृतीय पंथीयांना पोर्टलद्वारे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. वर्धा 21, भंडारा 6, गोंदिया 15, चंद्रपूर 35 तर गडचिरोली जिल्ह्यात 5 तृतीयपंथीय असून त्यांना आधारकार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, घरकुल तसेच आरोग्य सेवेचा लाभ देण्यात येत आहे. तृतीयपंथीया संदर्भात समाजामध्ये जागृती करतांनाच आवश्यक सुविधा पुरविण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त प्रसाद कुलकर्णी  यांनी सांगितले.

0000