Monday, 1 August 2016

महिलांना संपत्तीमध्ये समान हक्कासाठी महसूल अभियानात सातबारावर नावाची नोंदणी --- अनूप कुमार



महसूल दिन व महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ
·         उत्कृष्ट कार्याबद्दल 23 महसूल अधिकारी – कर्मचाऱ्यांचा गौरव
·         महिलांना मिळाला विविध योजनांचा लाभ
नागपूर, दि. 1 :  महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये दुय्यम स्थान न राहता समान अधिकार देऊन कुटुंबांतील प्रत्येक निर्णयात सहभागी करुन घेण्यासाठी संपत्तीमध्ये सुद्धा तिला समान वाटा मिळावा यासाठी जमिनीच्या सातबारावर नाव नोंदविण्याचा उपक्रम महसूल दिनापासून प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले. महसूल दिनानिमित्त महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांचा लाभ देऊन महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत सभागृहात महसूल दिनानिमित्त राज्यस्तरावर उत्कृष्ट प्रशासकीय कार्याबद्दल विभागातील 23 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत महिलांसाठी विविध योजनांचा लाभ विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रुपाताई कुळकर्णी उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, अप्पर आयुक्त अरुण उन्हाळे, महसूल उपायुक्त जितेंद्र पापडकर, उपायुक्त आप्पासाहेब धुळाज, बी.एस.घाटे, आर.एस. आळे, पराग सोमन, कमलकिशोर फुटाने, श्रीकांत फडके, विवेक बोंद्रे आदी अधिकारी उपस्थित होते.
महिलांना यापुढे समाजात दुय्यम स्थान राहणार नाही तसेच दुर्लक्षितही राहणार नाही यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त करताना विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, कुटुंबांच्या मालकीच्या जमिनीवर सहखातेदार म्हणून महिलाचे नाव असावे ही भुमिका घेऊन महिलांच्या सक्षमीकरणाला सुरुवात केली आहे. शोषणमुक्त समाजामध्ये महिलांचे सन्मानाचे स्थान असावे. तसेच महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाला सहाय्यभूत ठरणाऱ्या विविध योजनांचा लाभ महसूल विभागातर्फे देण्याचा महत्वपूर्ण कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महसूल विभागात प्रशासनाचा महत्वाचा दुवा असल्यामुळे सामान्य जनतेला सातत्याने सुलभ सुविधा पुरविण्याची जबाबदारी शासनाने दिली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती असो वा अतिवृष्टी असो अशा विविध प्रसंगी समर्थपणे जबाबदारी स्वीकारली आहे. वैशिष्टयपूर्ण उपक्रमाद्वारे जनतेला सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरव केल्यामुळे प्रोत्साहन मिळत असून सर्व महसूल परिवाराला आपली कार्यसंस्कृती वाढवावी. तसेच स्पर्धात्मक वातावरण निर्माण करुन राज्यस्तरावर आपला गौरव कसा होईल यादृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना डॉ. रुपा कुळकर्णी म्हणाल्या की, पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांना समान दर्जा मिळत नाही. त्यामुळेच हक्काचे घर असावे, संपत्तीमध्ये आपलाही वाटा असावा ही अपेक्षा असते. शासनाने सातबारा ज्यांच्यानावे त्याभगिनीसाठी शासन धावे या अंतर्गत संपत्तीमध्ये हक्क मिळवून दिला आहे. तसेच अकरा प्रकराच्या महिला सक्षमीकरणाचा योजनांचा लाभ दिला आहे.
महिलांच्या आर्थिक विकासासोबत मनोध्यर्य वाढविणे, सांपत्तिक स्थिती व आर्थिक विकासासाठी तसेच राजकीय सहभाग वाढवून महिलांचा आत्मविश्वास वाढविला आहे. महिलांनीही मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.रुपाताई कुळकर्णी यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी महिला सक्षमीकरणाअंतर्गत विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येत असल्याचे सांगतांना सावनेर तालुक्यामध्ये सावकाराकडे गहाण असलेल्या मंगळसुत्रासह इतर दागिणे परत करण्याचा महत्वपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत नगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना लाभ देण्यात येत आहे. प्रशासनामध्ये महिलांनी राबविलेल्या महिलांसाठीच्या विविध उपक्रमाची त्यांनी यावेळी माहिती दिली. महिला अधिकारी या उत्कृष्टपणे व प्रभावीपणे अंमलबजावणी करु शकतात. याबद्दलही गौरवोद् गार काढले.  
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट प्रशासकीय कार्याबद्दल गौरविलेले गडचिरोलीचे अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, वर्ध्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी मनोगत व्यक्त केले. महसूल उपायुक्त जितेंद्र पापडकर यांनी प्रास्ताविकात महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरव करत असतांना महसूल प्रशासन व विविध योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा संकल्प असून महिलांसाठीच्या सर्व योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी तालुका स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. लक्ष्मीपुत्री योजनेअंतर्गत सातबारावर पुरुषाप्रमाणेच महिलांचे नाव, महिलांना वनहक्के पट्टे वाटप, मुद्रा योजनेअंतर्गत महिला बचत गटांना कर्जाचे वाटप, कुटुंब प्रमुख म्हणून महिलांना शिधापत्रिका, मतदार नोंदणी प्रमाणपत्र आदि योजनांचा लाभ देण्यात आला. निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर राऊत यांच्या सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आले.
महसूल प्रशासनामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल वर्धेचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, नागपूरचे उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, अहीरीचे अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, तहसिलदार एस.पी.खल्हाटे (एटापल्ली), मनोहर चव्हाण (आर्वी), नायब तहसिलदार अरविंद हिंगणे (भंडारा), अक्षय पोयाम (हिंगणा), मंडळ अधिकारी आर.ए. देठे (हिंगणा), पी.ए.डांगे (गडचिरोली), लघुलेखक एम.एच.हाडगे(वर्धा), एस.गिरी (नागपूर) तसेच अव्वल कारकून व कारकून संवर्गात संजय धार्मिक, एम.एम.पवार, चंदू प्रधान व श्रीमती छाया बारेवार, तलाठी विकास सावरकर, एम.एम.पवार, शिपाई व कोतवाल संवर्गात सलिम शेख, नेत्रदीप डोये, दर्याव रिनाईत, वसंत पिसे, बलवंत वानखेडे, रमेश चोपकर आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासुळकर यांनी तर आभार श्रीमती मनिषा जायभाय यांनी मानले.

                                                                    *******

No comments:

Post a Comment