Wednesday, 3 August 2016

तात्काळ ॲम्बुलन्स सुविधेमुळे ग्रामीण रुग्णांना दिलासा

*मोहपा नगरपरिषदेला सुसज्ज रुग्णवाहिका
 *हैद्राबाद हाऊस येथून रुग्णवाहिकेला हिरवी झेंडी

नागपूरदि. 3 :  जनतेला वैद्यकीय सेवेचा जलद लाभ मिळावा तसेच रस्त्यावरील अपघाताप्रसंगी तात्काळ रुग्णवाहिकेची सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्र आकस्मिक वैद्यकीय सेवेअंतर्गत 108 क्रमांकावर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचविण्याचा उपक्रम जिल्ह्यात सुरु आहे. या उपक्रमांतर्गत मोहपा नगरपरिषदेला अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. के. एन. सोनपुरे व श्रीमती आशा पठाण यांच्या हस्ते नगरपरिषेदेचे अध्यक्ष शमशुद्दीन पठाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्य अधिकारी शशांक दाभोळकर, मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव वैभव गोल्हर, मोहपा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शमशुद्दीन पठाण, महाराष्ट्र आकस्मिक वैद्यकीय सेवा विभागाचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. सतुकर्ण देशमुख, अतिरिक्त व्यवस्थापक गणेश हजारे आदी उपस्थित होते.
मोहपा नगर परिषदेचे अध्यक्ष, सभापती, स्थायी समितीच्या सदस्यांनी मोहपा नगरपरिषदेसाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करुन देण्याबाबत मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती. ॲम्बुलन्स मिळविण्यासाठी विशेष कार्य अधिकारी डॉ. के. एन. सोनपुरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे मोहपा नगरपरिषदेसाठी अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेली ॲम्बुलन्स आज हस्तांतरित करण्यात आली आहे.
रस्त्यावरील अपघात, प्रसुती व इतर आकस्मिक प्रसंगी  नागरिकांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्यामुळे महाराष्ट्र आकस्मिक वैद्यकीय सेवेंतर्गत जिल्ह्यात 42 सुसज्ज अद्याप रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या असून यापैकी 22 रुग्णवाहिका ग्रामीण भागात रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. 108 हा टोल फ्री क्रमांक डायल केल्याबरोबर ग्रामीण भागात 30 मिनिटात व शहरात 20 मिनिटात रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होतील.
मोहपा नगरपरिषदेंतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नाही. या परिसरातील रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यास विलंब होत असल्यामुळे मोहपा परिसरातील रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेमध्ये आयसीयूसह सर्व सुविधा उपलब्ध असून सर्वच प्रकारच्या रुग्णांना जवळच्या शासकीय रुग्णालयात तात्काळ पोहचविणे अत्यंत सुलभ झाले आहे. तसेच रुग्णालयात पोहचेपर्यंत आवश्यक वैद्यकीय उपचार रुग्णवाहिकेत असल्यामुळे रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा  मिळणार असल्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होणार आहे.
****

No comments:

Post a Comment