Thursday, 18 August 2016

कामगार विभाग अधिक लोकाभिमुख व्हावा -- कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर

नागपूर दि. 16 : मालक व कामगार यांच्यात समन्वयाची भूमिका राखण्यावर कामगार विभागाचा भर आहे. कामगारांच्या कल्याणासाठी तसेच त्यांची पुढील पिढी अधिक सक्षम बनावी यासाठी शासन कटिबद्ध असून हा विभाग अधिक लोकाभिमुख व्हावा, असे मत कामगार मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर यांनी व्यक्त केले.
कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली  आज  रविभवन येथील सभागृहात  कामगार विभाग, औद्योगिक महामंडळ सुरक्षा संचालनालय, बाष्पके संचालनालय, बांधकाम कामगार मंडळ, सुरक्षा रक्षक मंडळ आदी विभागाची आढावा बैठक कामगार मंत्री  संभाजी पाटील- निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार कृष्णा  खोपडे, बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, कामगार आयुक्त  श्री. पेंडसे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य  विभागाचे  संचालक जयेंद्र मोटघरे, बाष्पके संचालनालयाचे संचालक संदीप कुंभलकर तसेच नागपूर-अमरावती विभागातील संबंधित विभागाचे अधिकारी, कामगार तसेच सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आढावा बैठकीमध्ये कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. गजराज कश्यप टोळी तसेच अन्य टोळीतील पदाधिकाऱ्यांनी माथाडी कामगारांना काम मिळण्याबाबत निवेदन सादर केले. माथाडी व असंरक्षित कामगार मंडळामध्ये नागपूर व वर्धा जिल्ह्यात नोंदणीकृत 8 हजार माथाडी कामगार असून त्यापैकी 6 हजार माथाडी कामगार कार्यरत आहेत. सुरक्षा रक्षकाच्या मंडळाचा महामंडळामध्ये समावेश करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. राज्य कामगार विमा योजनेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या यावेळी सादर करण्यात आल्या.  तसेच उपस्थित अधिकाऱ्यांनी कामकाज करत असतांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. कामगार मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
देशात सर्वाधिक नोंदणीकृत कामगारांची संख्या महाराष्ट्रात आहे. यापुढे कामगार नोंदणीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यात पारदर्शकता आणण्यात येईल. तसेच कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत  लवकरच चर्चा करण्यात येईल, असेही श्री. पाटील-निलंगेकर यांनी  यावेळी सांगितले.
* * * *

No comments:

Post a Comment