नागपूर दि. 10 : गेल्या अनेक वर्षांपासून कास्ट्राईब ही संघटना मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहे. या संघटनेने कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. शासन, प्रशासन आणि कर्मचारी संघटना एकमेकांना पूरक असतात. कृष्णा इंगळे यांनी सातत्य ठेवून काम करणारे कार्यकर्ते म्हणून नावलौकिक मिळविला आहे. यापुढेही त्यांनी विधायक काम करीत राहावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
खामला येथील विजयश्री पराते सभागृह येथे आज “कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे” 36 व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, प्राचार्य बबनराव तायवाडे, ज्येष्ठ पत्रकार रणजीत मेश्राम, ॲड. प्रभाकर मारपकवार, अधीक्षक अभियंता कुलदीप रामटेके, माजी न्यायमूर्ती पी.पी.पाटील तसेच राज्यभरातील कास्ट्राईब संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राजकुमार बडोले पुढे म्हणाले की, मागासवर्गीय समाजातील मुले शासन सेवेत येतात. त्यांना मार्गदर्शन करणारे कोणीतरी असावे लागते. ते काम कास्ट्राईब संघटना आवाहनपणे करीत आली आहे, असे गौरवोद् गार त्यांनी यावेळी केले.
आपल्या भाषणात कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे म्हणाले की, या संघटनेच्यहा माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. या संघटनेचे कर्मचारी, एकदिलाने काम करतात. त्यामुळे प्रोत्साहन व ऊर्जा मिळते. गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेली या संघटनेच्या अधिवेशनाची पंरपरा अशीच पुढे चालू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी कास्ट्राईब संघटनेने अनुसूचित जाती व जमातीच्या हितासाठी काम करत रहावे. पंरतु इतर मागासवर्गीयांच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीही सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी या संघटनेच्यावतीने मदत केली, असे गौरवोद् गार काढले. ॲड. प्रभाकर मारपकवार व अधिक्षक अभियंता कुलदीप रामटेके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन विभागीय अध्यक्ष डॉ.बाळासाहेब बन्सोड तर आभार कार्याध्यक्ष रवींद्र पालवे यांनी मानले.
** * * * **
No comments:
Post a Comment