नागपूर दि.16 - : नागपुरकरांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणाऱ्या नागपुर महोत्सव-2016 चे आज केंद्रीय
परिवहन, रस्ते व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन झाले.
नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने यशवंत स्टेडियम
येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उदघाटन कार्यक्रमास ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्हयाचे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, महापौर प्रवीण दटके, माजी खासदर
दत्ता मेघे, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव वल्सा आर. नायर सिंह, महानगर पालिकेचे
आयुक्त श्रावण हर्डीकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के.एच. गोविंद
राज, नागपूर महोत्सवाचे आयोजक सुधीर राऊ, संयोजक संदीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. गडकरी म्हणाले की, नागपुर महोत्सवासारख्या स्तुत्य कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर
सांस्कृतिक विकासाकडे वाटचाल करीत आहे. ही वाटचाल पुढे नेण्यासाठी शहरात कविवर्य सुरेश भट यांच्या
नावाने भव्य सभागृह बांधण्यात येत आहे. हे सभागृह नागपूर शहराच्या वैभवात भर घालणारे आहे. याच
महिन्यात या सभागृहाचे उदघाटन होईल. नागपुरच्या सांस्कृतिक विकासासाठी शासनाकडून भरीव सहकार्य
केले जाईल.
पर्यटन विकास मंत्री श्री. रावल म्हणाले की, संत्रा नगरी, टायगर कॅपीटल एवढीच नागपूरची ओळख न राहता हे
शहर आता पर्यटन नगरी म्हणूनही ओळखले जात आहे. पर्यटन विकासासाठी या शहरात सातत्याने
नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फुड फेस्टीवल सारख्या
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे ऑरेंज सिटी फेस्ट अंतर्गत
नागपूर दर्शन सहल बस सेवा सुरु करण्यात आली आहे. लवकरच खाण पर्यटन सारखा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु
करण्यात येणार आहे.
प्रास्ताविक सुधीर राऊ यांनी केले तर श्रावण हर्डिकर यांनी आभार मानले. आजादी 70 'भारतीय स्वतंत्रता की
संगीतमय गाथा' या अशोक हांडे रचित महानाटयाने नागपूर महोत्सवाची आज सुरुवात झाली. गुलामीच्या
जोखंडापासून कशा पध्दतीने भारताला स्वातंत्रय मिळाले याचे संगीतमय महानाटयाच्या माध्यमातून
कलाकरांनी यावेळी सादरीकरण केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
दिनांक 19 डिसेंबर 2016 पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात दि. 17 डिसेंबर रोजी चला हवा येऊ द्या हा
मनोरंजक कार्यक्रम होणार आहे. दि. 18 डिसेंबर रोजी प्रसिध्द गायक शंकर महादेवन यांचे गायन तर दि. 19
डिसेंबर रोजी प्रसिध्द गायक तथा अभिनेता फरहान अख्तर याचा रॉकऑन शो होणार आहे. सर्व कार्यक्रम
सायंकाळी 6.00 वाजल्यापासून सुरु होणार आहे, असे आयोजकांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment