Friday, 16 December 2016

निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या भूखंड वाटपाचा अहवाल तीन दिवसात सादर करावा - मुख्यमंत्री


नागपूर, दि. 16 : निम्न वर्धा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडवाटपाचा अहवाल येत्या तीन दिवसांत द्यावा तसेच पुनर्वसीत गावांच्या ज्या ग्रामपंचायती स्थापन केल्या नाहीत त्या येत्या सहा महिन्यात पूर्ण कराव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विधानमंडळातील मंत्री परिषद सभागृहात निम्न वर्धा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या बाबत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी  आ. समीर कुणावार, मदत व  पुनर्वसन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मालिनी  शंकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एक्बलसिंह चेहल, मुख्यमंत्री सचिवालयाचे सचिव मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त अनूप कुमार, वर्धा जिल्हाधिकारी शैलेश नवल उपस्थित होते.
निम्न वर्धा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसीत गावात केंद्र सरकारच्या सैनिटरी निधीतून स्वच्छतागृह बांधून द्यावीत, भूभाड्याची रक्कम, पुनर्वसीत गावातील बेसलाईन सर्व्हे, याबाबीवर योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत प्रशासनाला दिले.
पुनर्वसित गावातील पायाभूत सोयी सुविधा जलसंपदा विभागाकडून निर्माण कराव्यात, जे पुनर्वसीत गाव महसूली झाली नाहीत, ते येत्या सहा महिन्यात महसूली करून तिथे ग्रामपंचायतीची स्थापना करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
*****

No comments:

Post a Comment