Thursday, 15 December 2016

स्पर्धा परीक्षेच्या यशस्वितेसाठी ध्येय निश्चिती गरजेची सचिव ब्रिजेश सिंह


नागपूर, दि. 15 : स्पर्धा परीक्षांची  तयारी  करण्यापूर्वी आपले ध्येय निश्चित करा. इतरांशी स्पर्धा न करता स्वत:शी निकोप स्पर्धा करून स्वत:ला परीक्षेसाठी तयार करा. आत्मविश्वास हीच यशाची खरी गुरूकिल्ली  आहे, असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी आज व्यक्त केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सीताबर्डी मार्केटजवळील अपना बाजार इमारतीमध्ये असणाऱ्या माहिती केन्द्रातआज  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी माहिती केन्द्राच्या अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांशी दिलखुलास चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार धमेंद्र झोरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, माहिती केन्द्राचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मागदर्शन करतांना सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना आधी आपले ध्येय निश्चित करा. वाचन, सराव आणि आत्मपरिक्षण या त्रिसुत्रीचा वापर करा. मुंबई-पुणे  अशा महानगरातील विद्यार्थ्यांपेक्षा विदर्भातील स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा टक्का लक्षणीय आहे. यामुळे अपयश आले तरी निराश न होता प्रयत्नरत रहा. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, आर्थिक घटनांच्या प्रत्येक बदलांची नोंद ठेवा, उत्कृष्ट वर्तमानपत्राचे नियमित वाचन करा. स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन घ्या. लेखी परीक्षेची तयारी करतांना सोबतच मुलाखतीची देखील तयारी करावी. स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना ‘समूह अध्ययन पध्दती’ परिणामकारक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
जेष्ठ पत्रकार धमेंद्र झोरे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देतांना म्हणाले की, यश मिळविण्यात सर्वात महत्वाची अडचण म्हणजे न्यूनगंड ही होय. इंग्रजी विषयातील मनातील धास्ती सर्वप्रथम दूर करा. आज स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी विविध ग्रंथालय, वसतीगृहे तसेच विविध सोयीसुविधा उपलब्ध आहे. त्याची माहिती करुन त्याचा लाभ घ्या, असेही ते  यावेळी म्हणाले.
******

No comments:

Post a Comment