* सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामांचा शुभारंभ
* दक्षिण-पश्चिम 300 कोटी रुपयांची कामे
*7 लाख झोपडपट्टी वासियांना पट्टे वाटप
*पायाभूत सुविधांसोबत रोजगार उपलब्ध करुन देणार
नागपूर, दि. 23 : नागपूर शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच दळणवळणासाठी पुढील पन्नास वर्षे टिकतील अशा सिमेंट रस्त्यांचे जाळे निर्माण करुन देशातील सर्वोत्तम शहर म्हणून विकसित करतांना सामान्य माणसाच्या स्वप्नातील शहर म्हणून विकास करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
जयताळा रोडवरील सुभाषनगर येथे सिमेंट काँक्रीट रोड बांधकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित या कार्यमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विशेष अतिथी म्हणून तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होते. खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, प्रकाश भोयर, राजीव हडप, गोपाल बेहरे आदी उपस्थित होते.
देशातील सर्वोत्तम शहर म्हणून नागपूरचा विकास करतांना सिमेंट काँक्रीट रस्त्याची 1 हजार कोटी रुपयांची कामे सुरु असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघात तीनशे कोटी रुपयांची सिमेंट काँक्रीटची कामे वर्षभरता पूर्ण करण्यात येतील. शहराचा कायापालट कोत असतांना मेट्रोच्या माध्यमातून सामान्य जनतेला परवडेल अशी व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. सन 2019 पर्यंत देशातीलच नव्हेतर जागतिक स्तरावर उत्तम शहर म्हणून नागपूरचा विकास करण्यात येईल.
झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानुसार शासन निर्णय काढण्यात आला असून शहरातील सुमारे 7 लाख लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळणार आहेत. तुकडोजी नगर येथील नागरिकांना मालकी हक्क पट्टे देण्यात आले आहेत. जयताळा जाणारा मार्ग सातत्याने खराब होत असल्यामुळे या रस्त्याची सिमेंट काँक्रीट करण्याची जनतेची मागणी होती. नागरिकांना आता चांगला रस्ता मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे तयार करतांना येथील मातीची तांत्रिक तपासणी केली असता डांबरी रस्ते उपयुक्त नसल्यामुळे शासन महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली असल्याचे सांगतांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मागील अडीच वर्षांत शहरात 28 हजार कोटी रुपयांची विकास कामे सुरु करण्यात आली आहेत. अनधिकृत वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना रस्ते, पाणी व ड्रेनेजसाठी 4 कोटी रुपये खासदार निधीमधून दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांना 24 बाय 7 पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी तसेच शहरातील पाईप लाईन बदलविण्यासाठी 1 हजार 500 कोटी रुपयांची योजना सुरु करण्यात आली आहे. झोपडपट्टी व गरीब माणसाला 24 तास पाणी मिळण्याची व्यवस्था असल्याचे सांगतांना नितीन गडकरी म्हणाले की, शहरातील 50 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. मिहानमध्ये येत्या तीन महिन्यात तेवीस कंपन्या येत असून शहरामध्ये 50 बसेस इथेनॉलवर चालवून नागपूर शहर प्रदूषणमुक्त करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यात तसेच शहरात येत्या दोन वर्षांत केलेल्या विकास कामामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. शहरातील विद्युतवाहिन्या अंडरग्राऊंड करण्यात येणार असून काँग्रेसनगर येथे 150 कोटी रुपये खर्च करुन स्मार्ट ग्रीड उभारण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले. दक्षिण-पश्चिम मध्ये 300 कोटी रुपयांपैकी 180 कोटी रुपयांची कामे सुरु झाली असून 120 कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात महापौर प्रवीण दटके यांनी 1 हजार 500 कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची 22 ठिकाणी कामे सुरु असून ट्रंक लाईनसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी 11 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असल्याचे सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानासाठी सरदार पटेल मंडळातर्फे उमेश पटेल यांनी 51 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. तर तुकडोजी नगर येथील नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे दिल्याबद्दल साहेबराव मनोहर व सुनीता शेंद्रे आदींनी मुख्यमंत्र्यांचे सर्व नागरिकांतर्फे स्वागत केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी मानले.
****
No comments:
Post a Comment