- मुख्यमंत्र्यांचा नागभूषण पुरस्काराने गौरव
- नागपूरच्या सुपुत्राने मुंबईसह महाराष्ट्र बदलवून दाखविला
नागपूर, दि.01 : राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्याची व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी जनतेनी दिली आहे. नागपूर व विदर्भ ही आमची कर्मभूमी आहे. त्यामुळे नागपूरचा विकास करताना मुंबई, पुणे, नाशिक आदी राज्यातील सर्वच भागांचा विकास करण्याची जबाबदारी स्विकारली असून देशातील सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राचा सर्वांगिण विकासाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रभाषा संकुलाच्या श्रीसाई सभागृहात नागभूषण फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणारा नागभूषण पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. सत्कारला उत्तर देतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृह राज्यमंत्री हंसराज अहीर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही.एस. सिरपूरकर, महापौर प्रविण दटके, खासदार अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, नागभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, उपाध्यक्ष सत्यनारायण नोवाल, सचिव गिरीष गांधी, कोषाध्यक्ष ब्रजकिशोर अग्रवाल आदी उपस्थित होते.
विदर्भातील विविध क्षेत्रातील ज्या व्यक्तिने विदर्भाच्या विकासासाठी भरघोस कार्य केले. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विदर्भाचा लौकिक वाढविला त्याबद्दल नागपूर त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त नागभूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. एक लक्ष रुपये रोख व सन्मान चिन्हाच असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी विदर्भातील चौदा व्यक्तिंना नागभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सकारात्मकतेने जे काम हाती घेतले ते काम यशस्वीपणे पूर्ण केले. त्यासाठी कधीही मागे बघण्याची वेळ येऊ दिली नाही. वकील व्हायचे होते पण राजकारणात येणार नाही असे वाटले होते. असे असतानाही विद्यार्थी परिषदेचे काम करताना पक्षाने नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्याची सूचना केली असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा माझ्या वाटचालीमध्ये खुपमोठा सहभाग राहिला आहे. नागपूरसह विदर्भाचा अनुशेष राहिला आहे तो पूर्ण करण्याला प्राधान्य देतांनाच सिंचनासह उद्योग, वीजेचा प्रश्न सोडवितांनाच नागपूरचा माणूस मुंबईत सकारात्मक बदलाचे काम करतो. असा विश्वास दिला. एक व्यक्तिने मुंबई बदलून दाखविली हे मुंबईकर कधीही विसरणार नाहीत. ठाणे, पुणे येथेही विकासाचे परिवर्तन आम्ही करत आहोत.
सामान्य माणसाच्या जिवनात परिवर्तन झाले पाहिजे. याच उद्देशाने शेतीसह उद्योग धंदायांच्या विकासाचा योजना राबवित असताना खारपान पट्टयासाठी नानाजी देशमुख कृषी समृध्दी प्रकल्पाच्या माध्यमातून शेती प्रकल्पाला प्रथमच पाच हजार कोटी रुपये उपलब्ध होत आहेत. यवतमाळ जिल्हयातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या 40 टक्क्याने कमी झाल्या असल्या तरी एकात्मिक विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जिवनात परिवर्तन घडविण्यात येणार आहे. नागपूर ते मुंबई या समृध्दी महामार्गाच्या प्रकल्पामुळे विदर्भाचे चित्र बदलणार असल्यामुळे येत्या पाच वर्षात नागपूरचा सुपुत्र महाराष्ट्राचा चेहरा बदल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नागभूषण पुरस्कार स्विकारणे हा पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कारापैक्षाही महत्वाचा असून घरच्या मंडळींनी माझ्या कामाच्या कौतुकाची ही मोठी पावती असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुध्दीमत्ता, कर्तुत्व आणि विश्वासाने राज्याची सत्ता व संघटन सांभाळून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दाखविली आहे. प्रादेशिक अस्मिता न ठेवता कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतांनाच विदर्भ व महाराष्ट्राचे चित्र बदलण्याचे काम मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत असल्याचा गौरव करताना ते पुढे म्हणाले की, मनाचा मोठेपणा दाखवत काम करण्याची विदर्भीय परंपरा आहे. त्यामुळेच कुठेही संकुचितपणा न दाखवता राज्याच्या विकासाला नवी दिशा दिल्यामुळेच महाराष्ट्राला देशात नावलौकिक मिळवून दिला आहे.
नागपूरसह विदर्भ व महाराष्ट्राचे शान वाढेल असेच काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून घडेल असा विश्वास व्यक्त करताना नितीन गडकरी म्हणाले की, स्व. गंगाधरराव फडणवीस, सुमतीताई सुपळीकर यांनी खुप परिश्रम घेतले आणि जी दिशा आणि विचार दिला त्यामधूनच नेतुत्व निर्माण झाले आहे. शिफारशितून राजकारण न करता स्वत:च्या कर्तुत्वाने प्रतिकुल परिस्थित मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले. त्यामुळेच महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे विश्वासाने बघत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी न्यायमूर्ती व्ही.एस. शिरपूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा गौरव केला. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सुजनात्मक कार्यामुळे व अभ्यासू वृत्तीमुळे तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे आणि ते तरुणांचे आदर्श ठरले असल्याचे सांगितले.
प्रारंभी खासदार अजय संचेती यांनी प्रास्ताविकातून नाग भूषण फाउंडेशन व नागभूषण पुरस्काराची माहिती दिली. अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले यांनी स्वागत केले, तर गिरीष गांधी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे संचालन रेखा दडींगे यांनी तर आभार प्रदर्शन रमेश गांधी यांनी मानले. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, निशांत गांधी जयप्रकाश गुप्ता तसेच नागभूषण फाउंडेशन संस्थेचे मनोहर अग्रवाल, पदमेश गुप्ता, कुमार काळे, विलास काळे, राजेंद्र पुरोहित, सुरेश शर्मा, जामीन अमिन आदी मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती मोठया संख्येने उपस्थित होते.000000000
No comments:
Post a Comment