Tuesday, 10 January 2017

स्वामी विवेकानंदाचे स्मारक समाजाला प्रेरणा देणार - मुख्यमंत्री





नागपूर दि.01 :-  स्वामी विवेकानंद यांनी गरीबी, बेरोजगारी, भुखबळी व जातीयवाद याविरुद्धचा लढा म्हणजे खरी देशभक्ती असा संदेश दिला होता. त्यांचा हाच संदेश आजही लागू होत असून देशात सध्या भ्रष्टाचार, बेरोजगारी व जातीयवादाविरुद्ध लढा उभारला जात असून या लढ्यात तरुणांनी सहभागी होऊन देशभक्तीच्या प्रवाहात सामील व्हावे, ही प्रेरणा स्वामी विवेकानंदच्या या भव्य स्मारकापासून मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेच्यावतीने अंबाझरी येथे स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक बनविण्यात आले. या स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रवीण दटके, खासदार अजय संचेती, खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार प्रा.अनिल सोले, डॉ.परिणय फुके, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, डॉ.मिलिंद माने, विकास कुंभारे, स्वामी ब्रम्हानंद, उपमहापौर सतीश होले, स्थायी समिती सभापती बंडू राऊत, सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी  व आयुक्त श्रावण हर्डीकर यावेळी उपस्थित होते.
कन्याकुमारीच्या धर्तीवर अंबाझरी तलाव येथे स्वामी विवेकानंदचे भव्य स्मारक उभारण्यात आले. 30 फूट उंच खडकावर 20 फूट उंचीचा ब्राँझ धातुचा स्वामीचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. साडे सात एकर जागेत 7 कोटी खर्च करुन नयनरम्य असे स्मारक तयार करण्यात आले आहे. या स्मारकात संपूर्ण वातालुकीलीत सभागृहात स्वामी विवेकानंद जीवन चरित्र प्रदर्शनी, आकर्षक विद्युत रोशनाई, अद्ययावत ध्वनी व्यवस्था, प्रशस्त पार्कींग, जलाशय बेटावर नयनरम्‍य हिरवळ व आकर्षक कारंजे, स्वामीजींच्या जीवनावर आधारित 17 एलइडी स्क्रीनवर स्वामीजींचा जीवनावर आधारित प्रेरित कथा एकण्याची संधी तसेच स्वामीजींच्या जीवनावरील आधारित 28 नयनरम्य म्यूरल असणार आहेत.  या स्मारकाचे आज मुख्यमंत्री व नितीन गडकरी यांचे उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, स्वामीजींचे हे स्मारक राष्ट्रीय स्तरावरील स्मारकाशी साधर्म्य सांगणारे आहे. स्वामी विवेकानंदानी प्रगती व प्रेरणेचा विचार दिला.  आपल्या जीवनावर सुद्धा स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा प्रभाव असून आपण त्यांनी दाखवून दिलेल्या विचाराचे  अनुकरण करुनच विकास करत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगीतले. स्वामींनी जगात भारताची ओळख निर्माण केली होती. माझ्या बंधु आणि भगिनींनो हा संदेश प्रथमच जगाला देणाऱ्या स्वामींनी युवा शक्तीला प्रेरणा देण्याचे काम केले. आज देश भ्रष्टाचार, काळेधन, बेरोजगारी व गरिबी या विरोधात लढा देत आहे. स्वामींच्या मते हा लढा म्हणजे देशभक्ती असून या लढ्यात सहभागी होऊन तरुणांनी देशभक्तीच्या व विकासाच्या लढयात सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. स्वामींच्या स्मारकापासून प्रेरणा घेऊन समाजाने आपले जीवन उज्वल करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी बोलतांना केंद्रीय नितीन गडकरी म्हणाले की, महानगरपालिकेने अतिशय उत्कृष्ट व अविस्मरणीय स्मारक बनविले आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना टप्प्याटप्याने या स्मारकाचे सहल घडवून आणण्याचे काम महानगरपालिकेने करावे. यामुळे स्वामीच्या जीवनकार्याचा व विचाराचा परिचय नव्या पिढीला घडेल. विवेकानंद स्वामी यांचा मुल्याधिष्टीत जीवन पद्धतीवर भर होता.  स्वामींच्या स्वप्नातील भारताचा परिचय घडवून देणारे हे स्मारक असून नव्या पिढीला यापासून उर्जा व प्रेरणा मिळेल असे गडकरी म्हणाले. अतिशय कमी पैशात महानगरपालिकेने हे स्मारक उभारले, असे सांगून गडकरी यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले. या स्मारकात फाऊंटन निर्माण करण्यासाठी निधी नसल्याचे दयाशंकर तिवारी यांनी निर्देशनास आणून दिल्याचा उल्लेख करुन गडकरी म्हणाले की या ठिकाणी सुरेख फाऊंटन निर्माण करण्यासाठी राज्यसभा खासदार अजय संचेती व डॉ.विकास महात्मे यांनी हवा तेवढा निधी उपलब्ध करुन देण्याचे कबूल केले आहे.
यावेळी दक्षिण-पश्चिम नागपूर भागातील नागरिकांना जमिनीचे पट्टे मुख्यमंत्री यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शिल्पकार राम सुतार, कंत्राटदार वकीलसिंग, वास्तुशास्त्रज्ञ उदय गजभिये, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांचेसह विविध अधिकारी यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
महापौर प्रवीण दटके व  स्वामी ब्रम्हानंद यांची यावेळी भाषणे झालीत. दयाशंकर तिवारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या भव्य सोहळ्यास पहाण्यासाठी नागपूरकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
00000000

No comments:

Post a Comment