Tuesday, 10 January 2017

समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देणारा विभाग म्हणून प्रतिमा निर्माण करा - देवेंद्र फडणवीस




डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्यायभवन इमारतीचे उद्घाटन
  • जात पडताळणीसाठी जनतेची गैरसोय टाळा
  • शिष्यवृत्ती योजना आधारसोबत संलग्न
  • सायकल रिक्षामुक्त शहर करण्यासाठी पुढाकार

नागपूर, दिनांक 30 :   समाजातील प्रत्येक घटकांना योजनांचा लाभ पारदर्शीपणे व सुलभपणे देण्यासाठी ई-गर्व्हनन्स वापर वाढवतांनाच प्रत्येक व्यक्तीला न्याय देणारा विभाग म्हणून सामाजिक न्याय विभागाची प्रतिमा निर्माण करा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
श्रध्दानंदपेठ येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रविण दटके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. निशा सावरकर, आमदार सर्वश्री प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बागडे, आयुक्त पीयुष सिंह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे राजेश डाबरे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, सुभाष पारधी, ना.गो. गाणार, मनोज सूर्यवंशी, प्रादेशिक उपायुक्त माधव झोड आदी उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागाचे विविध कार्यालय एकत्र आणल्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत न्याय पोहचविण्याचे प्रभावी कार्य होत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिष्यवृत्ती वाटपातील गैरप्रकार टाळण्यासाठी व खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत अनुदान पोहचविण्यासाठी आधारशी संलग्न करुन संगणकीरणामुळे सुलभता आली आहे. जात पडताळणीसाठी जनतेला होणारा त्रास दूर करण्यासाठी आनलाईन पध्दतीचा अवलंब करा  व निश्चित कालावधीत प्रमाणपत्र द्या अशा सूचना त्यांनी केल्यात.
शहरात सायकल रिक्षा ऐवजी ई-रिक्षा कशा देता येतील यासंदर्भात योजना तयार करण्यात येऊन नागपूर शहर सायकल रिक्षामुक्त शहर करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. असे सांगतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 1926 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शोधप्रबंधाद्वारे चलनातील मोठ्या नोटा रद्द कराव्यात तसेच प्रत्येक दहा वर्षांनंतर निश्चलनीकरण करावे, अशी सूचना केली होती पण आपण या सूचनेची अंमलबजावणी पूर्ण न केल्यामुळे काळा पैसा मोठया प्रमाणात निर्माण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चलनीकरणाचा धाडसी निर्णय घेतला. कॅशलेस व्यवहारासाठी भीम ॲप्सचे लोकार्पण केल्यामुळे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळणार आहे. हा ॲप्स 60 कोटी मोबाईलवर डाऊनलोड होणार असल्यामुळे आर्थिक महासत्तेकडे नेण्याचे काम भीम ॲप्सच्या माध्यमातून होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानासोबतच दिलेले दूरदृष्टीला आपण अभिवादन देणारा निर्णय ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अध्यक्षस्थानी भाषणात सामाजिक न्याय विभागातर्फे मागील दोन वर्षात राबविण्यात आलेल्या धाडसी निर्णयाबद्दल राज्य शासनाच्या कार्याचा गौरव करताना दीक्षाभूमी, चिंचोली, ड्रग्नपॅलेस यांच्या विकासासाठी केंद्र शासनातर्फे दोनशे कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागपूर शहर प्रदुषणमुक्त व्हावे यासाठी सायकल रिक्षांच्या एवजी ई-रिक्षा देण्यासाठी सामाजिक न्याय विभागासह महानगर पालिकेने पुढाकार घेण्याचे आवश्यकता व्यक्त केली. सर्व विभाग ई-गर्व्हनन्सच्या माध्यमातून कॅशलेस व्हावी, तसेच सर्व कामे कार्यालयात न येता घरपोच सेवा मिळाव्यात अशी सूचना केली.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सामाजिक न्यायमंत्री यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील समाजाला न्याय देणारा विभाग म्हणून सातत्याने प्रयत्न केला आहे. मागील दोन वर्षात सामाजिक न्याय विभागातर्फे विविध मागास घटकासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात हा विभाग यशस्वी झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बार्टीचे कार्यालय नागपूर आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सामाजिक न्यायभवन हस्तातरण प्रादेशिक उपायुक्त माधव झोड यांना करण्यात आले. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोनशिलेचे अनावरण करुन सामाजिक न्यायभवन या अद्यावत इमारतीचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.  स्वाग्त व प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्र कुमार बागडे यांनी केले. अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वाग्त गीत सादर केले. यावेळी मोठया संख्येने नागरिक तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
00000000

No comments:

Post a Comment