Tuesday, 10 January 2017

पी‍डित महिला व बालकांचे लवकरात लवकर पुनर्वसन आवश्यक - जिल्हाधिकारी सचिन कुर्वे


मनोधैर्य योजनेअंतर्गत जिल्हा ट्रामा टीम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
नागपूर, दि. 03 : मनोधैर्य योजना समाजातील पीडित महिला व बालकांना तातडीने उपलब्ध करून देते.  या योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्यासोबतच तिचे सर्वांगीण पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.
          महिला व बालविकास विभागातर्फे मनोधैर्य योजनेअंतर्गत जिल्हा ट्रामा टीम प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन.एम. बेदरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. यू. बी. नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी उपस्थित होते. कार्यशाळेची सुरूवात दिप प्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
        जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पुढे सांगितले की, या योजनेत शासनाचे काम पीडितेचे आर्थिक समुपदेशनापर्यंत सीमित राहत नाही तर आर्थिक सहकार्य तसेच सामाजिक पुनर्वसन करण्यावर भर दिला जातो. पण योजनेचा लाभ घेताना पीडित व्यक्तीची संवेदनशीलता लक्षात घेतली पाहिजे. तिचे समाजिक जीवनात पुनर्वसन करताना आर्थिक सबलीकरण आवश्यक असून, ट्रामाच्या माध्यमातून तिला सामान्य जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.  
विभागातर्फे मनोधैर्य योजनेअंतर्गत जिल्हा ट्रामा टीम प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद़घाटनप्रसंगी ग्रामीण पोलिस अधीक्षक अनंत रोकडे म्हणाले की, बालकांवरील लैंगिक अत्याचार यामध्ये पीडित महिला व बालकांना तातडीने आधार मिळविण्यासाठी व त्यांना मानसिक आघातातून बाहेर काढण्याची जबाबदारी ग्रामीण पोलिस पथकाची आहे. त्याकरिता दामिनी पथक तैनात केले आहे. त्या माध्यमातून प्रत्येक पीडित बालकांला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
                     योजना राज्यात 2 ऑक्टोबर 2013 पासून अमंलात आली आहे. त्यात पोलिस स्टेशनमधील अधिकारी, जिल्हा, तालुका स्तरावरील जिल्हा रुग्णालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अखत्यारीतील सर्व संरक्षण अधिकारी, बाल परीविक्षा अधिकारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी काम करीत असल्याचे जिल्हा माहिती व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी प्रास्ताविकात  सांगितले.
प्रशिक्षणात मनोधैर्य योजनेची पार्श्वभूमी आणि योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीकरिता संबंधित यंत्रणेचा सहभाग, ट्रामा टीम गठित करण्यामागचा हेतू, उद्देश, ट्रामा टिम अंतर्गत पोलिस अधिकारी यांची भूमिका, वैद्यकीय अधिकारी यांची भूमिका, बाल कल्याण समितीचे कार्य, बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम 2012 मधील आवश्यक तरतुदी व प्रभावी अमंलबजावणी  या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment