नागपूर दि. 3:- प्रवाशांना बसस्थानकांवर आवश्यक सुविधा असलेले सुसज्ज कोंढाळी बसस्थानकाचे उद्घाटन कृपाल तुमाने यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आशिष देशमुख होते तर प्रमुख पाहूणे म्हणून काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे, जिल्हा परिषद सदस्य रामदास मरकाम, उपसभापती योगेश चाफले, बाळकृष्ण पाटील शेषराव चाफले, घनश्याम गांधी आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरीकांना कोंढाळी बसस्थानकावरून एस. टी. महामंडळाद्वारे वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून या ठिकाणी स्वच्छता ठेवावी अशी सुचना खासदार कृपाल तुमाने यांनी यावेळी केली.
आमदार आशिष देशमुख यांनी बसस्थानकाच्या परिसरात ग्रामीण जनतेसाठी सुलभ व स्वस्त औषधी उपलब्ध व्हावे यासाठी जेनेरिक औषधीचे दुकान सुरू करावे तसेच प्रवाशांसाठी सर्व व्यवहार व तिकीट कॅशलेस पध्दतीने द्यावेत अशी सुचना करतांना कोंढाळी बसस्थानकाच्या सौंदर्यीकरण व विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक सुधीर पंचभाई यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेते. राष्ट्रीय महामार्गावर कोंढाळी हे महत्वाचे बसस्थानक असून सुमारे अडीच हजार चौरस मिटर जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळी 6.00 वाजता पासून रात्रौ 10.30 वाजेपर्यंत 378 बस फेऱ्याद्वारे वाहतूक करण्यात येते. बसस्थानकावर प्रतिक्षालय, 7 फलाट, वाहतूक नियंत्रण कक्ष, उपहार गृह, चालक-वाहक विश्रांतीगृह, प्रसाधन गृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे.
नागपूर विभागात 580 बसेस द्वारे 2 लक्ष प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. विभागात 24 अद्यावत प्रवासी सुविधा असून निरनिरळ्या 158 मार्गावर निवारे बांधारे बांधण्यात आले. प्रवाशांसाठी तसेच विविध सामाजिक घटाकांसाठी 24 प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यावेळी सभापती संदीप सरोदे, जिल्हा परिषद सदस्य रामदास मरकाम, उपसभापती योगेश चाफले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. सी. एन वडस्कर, सुरक्षा अधिकारी महेंद्र वानखेडे, शैलेश भारती, संजय गौखेडे, सौ. शितल सिरसाट, विभागीय अभियंता श्री. चौरसीया व श्री. गौड उपस्थित होते.
**********
No comments:
Post a Comment