Tuesday, 10 January 2017

पंतप्रधान गरीब कल्याण योजना चर्चासत्र ‘बेहिशोबी रोख अथवा ठेवी 31 मार्चपर्यंत जाहीर करा’


नागपूर, दि. 4 : ज्या नागरिकांनी त्यांच्याकडील रोख व ठेवीच्या रुपातील करपात्र उत्पन्न जाहीर केलेले नाही आणि अशा उत्पन्नावर कर अदा केलेला नाही, त्यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नावर कर भरावा आणि पुढील कार्यवाहीस सामोरे जाण्याची वेळ येणार नाही, अशी दक्षता घ्यावी असे आवाहन आयकर विभागाने केले आहे.
आयकर विभागाच्या वतीने आयोजित एका चर्चासत्रात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची तपशिलवार माहिती देण्यात आली. विभागाचे महासंचालक(तपास) राकेशकुमार गुप्ता यांनी योजना आणि कार्यपद्धतीची माहिती देताना संबंधित तरतुदीही समजावून सांगितल्या. यावेळी नागपूर विभागाचे आयकर संचालक(तपास) सुनील बातीनी, सहसंचालक किशोर धुळे यांच्यासह विविध अधिकारी तसेच उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच सनदी लेखापाल उपस्थित होते.
यावेळी श्री. गुप्ता म्हणाले की, सरकारने बेहिशोबी आणि करचुकवलेल्या पैशाबाबत कायद्यानुसार कडक कार्यवाही करण्यात येईल हे पूर्वीच स्पष्ट केलेले आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार 31 मार्च 17 पर्यंत बेहिशोबी रोख किंवा ठेवीपैकी 49.9 टक्के रक्कम कर, अधिभार आणि दंड म्हणून अदा करावी लागेल. 25 टक्के रक्कम या योजनेत ठेव म्हणून जमा करावी लागेल. या रकमेवर व्याज दिले जाणार नाही आणि ही ठेव 4 वर्षानंतर परत केली जाईल. या योजनेत जाहीर केल्या जाणाऱ्या रोख अथवा ठेवींबाबत लागू असलेल्या विविध तरतुदींची यावेळी माहिती देण्यात आली.
या योजनेत कर परत करण्याची तरतूद नाही आणि माहिती जाहीर करताना वस्तुस्थिती दडवण्याचा प्रयत्न झाल्यास त्यासंदर्भात कारवाईची तरतूद आहे. या येाजनेत उत्पन्न जाहीर करण्याऱ्यांकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे असे कार्ड नसेल त्यांना तात्काळ अर्ज सादर करुन त्याचा संदर्भ क्रमांक नमूद करावा लागेल. या योजनेशी निगडित सर्व बाबींची माहिती चर्चासत्रात देण्यात आली.  जे या योजनेत आपली बेहिशोबी रोख अथवा ठेवी जाहीर करणार नाहीत त्यांना दंडात्मक कार्यवाहीला तोंड द्यावे लागणार असून या कार्यवाहीचे स्वरुपही चर्चासत्रात स्पष्ट करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. शंकांचे निराकरण करण्यात आले.
*****

No comments:

Post a Comment