Tuesday, 10 January 2017

नागपूर पोलिसांचा ‘भरोसा सेल’ उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा विचार - मुख्यमंत्री





















  • राज्यात सर्वप्रथम नागपूर येथे स्थापन झालेल्या महिलांच्या ‘भरोसा सेल’ चे उद्घाटन संपन्न
  • पीडित महिला व मुले यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध राहणार
  • भरोसा सेल 24 X 7 सुरु राहणार
  • पीडित महिला व बालकांना भरोसा सेल आणि दामिनी पथकामुळे मोठा आधार

नागपूर, दि.01 :   माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आज समाजातील हिंसेचे स्वरुप बदलत आहे. यासाठी समाजात कायद्याचे भय असणे आवश्यक आहे. नागपूर पोलिस विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या भरोसा सेलमुळे कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलांना अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी मानसिक बळ प्राप्त होईल. याच धर्तीवर राज्यात इतर ठिकाणीही भरोसा सेलची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
सुभाषनगर टी पाईंट जवळील नवनिर्मित ‘भरोसा सेल’ चे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कौटूंबिक हिंसाचारांच्या घटनांमध्ये महिलांना न्याय देण्याच्या उद्देशाने नागपुरात सर्वप्रथम भरोसा सेल सुरु करण्यात आले आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, विभागीय आयुक्त अनूप कुमार, प्रभारी अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रंजन कुमार शर्मा, सहपोलिस आयुक्त संतोष रस्तोगी, पोलिस निरीक्षक श्रीमती शुभदा संखे तसेच पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भरोसा सेल मार्गदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.
उपस्थितीतांना मार्गदर्शन करतांना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, बदलत्या काळानुसार पोलिस विभागाने उच्च तंत्रज्ञान व माहितीचा वापर करुन आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. पोलिस व्यवस्था जनतेच्या मदतीकरिता आहे. उच्च तंत्रज्ञनाच्या वापरामुळे नागरिकांना लवकरात लवकर न्याय मिळण्यास मदत होईल. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करतांना नागरिकांना येथे आपल्यास न्याय मिळणार हा विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. भरोसा सेलची निर्मिती ही काळाची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याबरोबरच गुन्हा घडू नये, यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येतात. भरोसा सेलच्या निर्मितीमागे हाच उद्देश आहे. नागपूर आयुक्तालय आणि जिल्हा मुख्यालयामार्फत अनेक नवीन उपक्रम राबविण्यात आले आहेत. सीसीटीएनएस, डिजिटल ठाणी, सीसीटीव्ही यासारखे उपक्रम पथदर्शी आहे. प्रशासनाच्या वतीने नवीन पोलिस स्टेशनची निर्मिती करताना उच्च तंत्रज्ञानावर भर देण्यात येईल. तसेच पोलिसांच्या राहण्याच्या सुविधाबाबतही शासन अनुकूल आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलेची पहिली तक्रार नोंदवलिी.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले की, कायद्याविषयी सन्मान आणि भिती असणे आवश्यक आहे. कायद्याची सीमा ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच कोणत्याही समस्यांवर निर्णय घेण्यापूर्वी समेट घडून आणण्यावर भर द्यावा. आधी समेट आणि नंतर कायदा हे धोरण ठेवावे, असेही ते यावेळी म्हणाले.
हैद्राबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात भरोसा सेलचा प्रयोग प्रथमच नागपुरात राबविण्यात येत आहे. हुंडाबळी आणि कौटूंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना कुठे न्याय मागावा हेच समजत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे वेळीच समुपदेशन न झाल्यास संसाराचे दोन तुकडे व्हायला वेळ लागत नाही. कुणाच्या सुखी संसाराला तडा जाऊ नये, यासाठी दोन्ही कुटूंबीयांचे भरोसा सेलमध्ये समुदेशन करण्यात येईल. समुदेशन करुनही त्यांचे समाधान न झाल्यास शेवटी गुन्हा दाखल करण्यात येईल. भरोसा सेलमध्ये पीडित महिलेला विधिविषयक, मानसोपचार, वैद्यकीय मदत एकाच ठिकाणी मिळेल. यातून त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होऊन महिलांना न्याय मिळण्यास मदत होईल. तीन पाळ्यांमध्ये या सेलचा कारभार सुरु राहील. रात्री बेरात्री कुणी महिला आल्यास तिच्या राहण्याची व्यवस्था देखील करण्यात येईल.

*****

No comments:

Post a Comment