Tuesday, 10 January 2017

परमात्मा सेवक मंडळाकडून मानवधर्माचे काम --- मुख्यमंत्री




नागपूर, दि.01 : जगात मानवधर्म हा एकमेव मोठा धर्म असून, मानवसेवा हीच खरी समाजसेवा आहे. ही मानवधर्माची सेवा करण्याचे काम परमपूज्य परमात्मा एक सेवकमंडळाने केले आहे. या सेवकमंडळाने आतापर्यंत 4 लाख लोकांना व्यसनमुक्त केले आहे. ही खूप मोठी बाब होय. त्यामुळे व्यसनमुक्तीच्या माध्यमातून या मंडळाकडून मानवधर्माचे काम सुरु असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मानव मंदिर सांस्कृतिक भवनाच्या भूखंडाचे पुनर्वाटप व लीज नूतनीकरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. ययावेळी सिमेंट क्रॉक्रीटीकरण रस्त्याच्या परमात्मा एक सेवक मार्ग नामफलकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, तर प्रमुख पाहुणे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, सर्वश्री आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डाँ. मिलींद माने, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, जि. प. अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर, नासुप्र विश्वस्त भूषण शिंगणे, स्थायी समिती अध्यक्ष सुधीर राऊत, परिवहन समिती, मनपा सभापती नरेंद्र बोरकर, नगरसेविका श्रीमती संगिता कळमकर व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बऱ्याच दिवसांपासून परमात्मा एक सेवक मंडळ, मानव मंदिर सांस्कृतिक भवनाच्या भूखंडाचे पुनर्वाटप व लीज नूतनीकरण आणि येथील सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम प्रलंबित होते ते पूर्ण झाले. याचा मनस्वी आनंद होत असून, या सिमेंट मार्गाचे परमात्मा मार्ग असे नामकरणही करण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, परिवहन समिती, मनपा सभापती नरेंद्र बोरकर आणि नगरसेविका श्रीमती संगिता कळमकर यांनी या विकासकामांचा यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.  तसेच या सेवक मंडळाकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्यामुळे व्यसनमुक्ती पुरस्कारासाठी शिफारस करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
केंद्रीय भूपृष्ठ, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी
             केंद्रीय भूपृष्ठ, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी परमात्मा एक सेवक मंडळाच्या कामावर समाधान व्यक्त करुन सांगितले की, हे सेवकमंडळ समाजप्रबोधनाचे मोठे काम करत असून, समाजातील दोष नाहीसे करण्याचे काम केले जात आहे. या कामामुळेच आजपर्यंत सेवक मंडळाने लाखो भक्त जोडले आहेत. या लाखो भक्तांना दिशा देण्याचे काम अविरत सुरु असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मनपातील परिवहन समिती सभापती नरेंद्र बोरकर आणि नगरसेविका श्रीमती संगिता कळमकर यांच्या सततच्या पाठपुरावा केला. व त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे काम पूर्णत्वास नेल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे अभिनंदन केले. शहरातील सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता बांधकामाला 300 कोटी रुपये विकासनिधी दिल्यामुळेच हे काम शक्य झाल्याचे केंद्रीय मंत्र्यानी यावेळी सांगितले.
नागपूर ते मौदा या मार्गावर होणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी येथे सहापदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याचे सांगून त्यापुढे जाणारा रस्ताही सहापदरी बनविण्यात येणार असल्याचे श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी दीड लाख कोटी रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगत हे कामही लवकरच सुरु करणार असल्याचे गडकरी म्हणाले.                
तत्पूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मानव मंदिर सांस्कृतिक भवनाच्या भूखंडाचे पुनर्वाटप व लीज नूतनीकरण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळेच हे काम आज पूर्ण झाल्याचे सांगितले.
परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबा जुमदेव यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांनी प्रास्ताविक केले.
** * * * **

No comments:

Post a Comment