Friday, 31 March 2017

वन अकादमीच्‍या नवीन इमारतीचे बांधकाम पायाभूत सुविधांसाठी 186 कोटी रुपयांचा निधी

मुंबई दि. 29 : चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्‍यवस्‍थापन प्रबोधिनी संकुलातील नवीन इमारतीचे बांधकाम व पायाभूत सुविधा निर्मीती अवस्‍था –1 च्‍या 186 कोटी 09 लाख रुपये किंमतीच्‍या अंदाजपत्रकाला शासनाने प्रशासकीय मान्‍यता दिली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय वन विभागाने दि. २७ मार्च २०१७ रोजी निर्गमित केला आहे.
मंत्रिमंडळाच्या  दिनांक 28 नोव्‍हेंबर 2014 रोजी झालेल्‍या बैठकीत चंद्रपूर येथील वनप्रशिक्षण संस्‍थेचा दर्जा वाढवून वन अकादमीत रूपांतर करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. या अकादमीचे नाव चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्‍यवस्‍थापन प्रबोधिनी  असे करण्‍याचा निर्णय राज्‍य  शासनाने घेतला.
  वन्‍यजीव व्‍यवस्‍थापन आणि वानिकी उत्‍पादन विषयक प्रशिक्षण देण्‍याच्‍या प्रक्रियेमध्‍ये महत्‍वपूर्ण भूमिका असलेल्‍या चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्‍यवस्‍थापन प्रबोधिनी संकुलाच्या नवीन इमारतीचे बांधकाम व पायाभूत सुविधा निर्मीतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १८६ कोटी ०९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यास शासनाने प्रशासकीय मान्‍यता दिल्‍याने वन अकादमीच्‍या निर्मीतीचा मार्ग सुकर झाला आहे.
सर्वाधिक जंगल आणि व्‍याघ्र प्रकल्‍प तसेच अभयारण्‍य विदर्भात असल्‍यामुळे चंद्रपूर येथे वन अकादमी स्‍थापन होणे गरजेचे होते. ही गरज लक्षात घेऊनच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे वन अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला व शासनाने त्यास मान्यता प्रदान केली.
या अकादमीमध्‍ये दीर्घकालीन व्‍यावसायिक प्रशिक्षणासोबतच विविध विकास प्रकल्‍पांचा पर्यावरणीय अभ्‍यास करून अहवाल तयार करून देण्‍यात येणार आहे. पर्यावरण क्षेत्रातील संस्‍थांसाठी प्रशिक्ष्‍ाण कार्यक्रम राबविणे व जनजागृतीचे उपक्रम हाती घेणे तसेच वन खात्‍याची शिखर संस्था म्‍हणून ती अकादमी काम करणार आहे. यामध्‍ये तांत्रिक तसेच सेवांतर्गत प्रशिक्षण सुध्‍दा देण्‍यात येणार आहे.
००००

No comments:

Post a Comment