Friday, 31 March 2017

रेशन देण्यासाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर

भुसावळ येथील बोगस शिधापत्रिका प्रकरणी
जिल्ह्याबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी
- गिरीष बापट

मुंबई, दि. 30 : मुंबईत शिधापत्रिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 1 लाख 28 हजार बोगस शिधापत्रिका आढळून आले आहेत. त्यातील 55 हजार शिधापत्रिका तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. रेशन व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी यापुढे प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला बायोमेट्रिक पद्धतीने रेशन देण्यात येणार असून त्यासाठी लवकरच बायोमेट्रिक यंत्रणा राबवली जाणार असल्याची माहितीही अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
भुसावळ (जि. जळगाव) येथील बोगस शिधापत्रिका प्रकरणी स्वस्त धान्य दुकानावर कारवाईसंदर्भात विधानसभा सदस्य डॉ. संजय रायमूलकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. बापट बोलत होते.
श्री. बापट म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात ज्या तक्रारी केल्या आहेत, त्या तक्रारींची शासनाने दखल घेऊन कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी जिल्ह्याबाहेरच्या वरिष्ठ  अधिकाऱ्यांकडून चौकशी करून एका महिन्यात भुसावळ येथे बैठक घेण्यात येईल. रेशनमधील गैरप्रकारासाठी सरकारने 22 लोकांना मोक्का आणि 40 लोकांना ‘एमपीडीए’अंतर्गत  कारवाई केली असल्याचेही श्री.बापट यांनी सांगितले.
या चर्चेत विधानसभा सदस्य सर्वश्री संजय सावकारे, सुभाष साबणे, अमर काळे यांनी सहभाग घेतला.
०००००

No comments:

Post a Comment