* उद्योगमंत्र्यांकडे मुंबई येथे प्रकल्पासंदर्भात लवकर बैठक
* अपूर्ण मध्यम प्रकल्प तातडीने पूर्ण करा
* सिंचनासह एमआयडीसीला पाण्याची उपलब्धता
नागपूर, दि. 15 : हिंगणा तालुक्यातील लखमापूर लघुपाटबंधारे प्रकल्पाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यास हा प्रकल्प प्राधानान्याने पूर्ण होऊ शकेल. या प्रकल्पांतर्गत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात येऊन निधीची मागणी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिली.
हिंगणा तालुक्यातील लखमापूर लघुपाटबंधारे प्रकल्पासंदर्भात रविभवन येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार समीर मेघे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री. चव्हाण, अधीक्षक अभियंता श्री. इंगळे, कार्यकारी अभियंता श्री. पाटील, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संगीतराव, कार्यकारी अभियंता एन. एस. मांडवे आदी यावेळी उपस्थित होते.
लखमापूर या लघुपाटबंधारे प्रकल्पातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला 3 एमएम क्यूब पाणी उपलब्ध होणार असून 260 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पासंदर्भात सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी एमआयडीसीकडून औद्योगिक क्षेत्राला पाण्याचे आरक्षण होत असल्यामुळे निधी उपलब्ध झाल्यास अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यास सुलभ होणार आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून निधी मिळविण्यासाठी उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा आढावा घेतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अपूर्ण असलेले मध्यम प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करा. त्यानुसार निधीची मागणी करण्यात यावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी या प्रकल्पांना गती देण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
*****
No comments:
Post a Comment