* नगरधनच्या महिला व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची भेट
* उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनामार्फत चौकशी
* दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई
नागपूर, दि. 15 : हागणदारीमुक्त अभियानांतर्गत नगरधन येथे शौचालय बांधकामामध्ये झालेल्या अनियमितता तसेच लाभार्थ्यांच्या निवडीसंदर्भात महिला व ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत व महिला व बाल कल्याण यांच्यामार्फत सखोल चौकशी करुन येत्या सात दिवसांत अहवाल मागविण्यात येईल तसेच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध त्यानुसार कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
रविभवन येथे नगरधन येथील महिला व ग्रामास्थांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन हागणदारीमुक्त अभियानांतर्गत चौकशी करण्याची मागणी केली होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या समवेत संपूर्ण प्रकरणांसंदर्भात आढावा घेतल्यानंतर उपमुख्य कार्यपालन अधिकारी पंचायत अरुण निंबाळकर तसेच उपमुख्य कार्यपालन अधिकारी महिला व बाल कल्याण मिलिंद जाधव यांनी सखोल चौकशी करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
नगरधन येथील महिलांनी हागणदारीमुक्त अभियानांतर्गत लाभार्थ्यांची निवड करतांना गरजू लोकांची निवड न करणे तसेच ज्यांच्याकडे शौचालय आहे अशा व्यक्तींची निवड, अनुदान वितरित न करणे तसेच लाभार्थ्यांची यादी सदोष तयार करणे आदी संदर्भात निवेदन दिले होते. त्यानुसार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिलांनी निवेदनाद्वारे केलेल्या आरोपासंदर्भात सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी जिल्हा परिषेदचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी अरुण निंबाळकर, मिलिंद जाधव, रामटेकचे गटविकास अधिकारी तसेच नगरधन येथील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****

No comments:
Post a Comment