नागपूर दि. 20 : सातत्याने वाढणारे तापमान व निर्माण होणारी उष्णतेची लाट पाहता येत्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. मे 2015 मध्ये नागपूर शहराचे तापमान 47.70 पर्यंत गेल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत उष्माघातापासून स्वत:चा बचाव करावा. असे आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागाने केले आहे.
उष्णतेचा जास्त संबंध आल्याने शरीराच्या नैसर्गिक ताप नियंत्रण प्रणालीत बिघाड होऊन उद् भवणारा जीव घेणा आजार म्हणजे उष्माघात होय. उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा मजूरीचे फार वेळ काम करणे, फार वेळ उन्हात फिरणे, कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे व घट्ट कपड्यांचा वापर या बाबी उष्माघातासाठी कारणीभूत ठरतात. दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान पाहता शासनाने उष्माघात कृतीआराखडा नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात प्रथमत:च नागपूर शहरातील जनसामान्याकरिता उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना कृती आराखडा राबविण्यात आला. गेल्या वर्षी या उष्माघात प्रतिबंधक उपयायोजनेचा लाभ शहरातील 30 लक्ष लोकांना झाला होता.
एप्रिल, मे व जून या महिन्यात 43 डिग्री पेक्षा जास्त तापमान असते. त्यामुळे या तीन महिन्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असते. परंतु उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना कृती आराखडा राबविल्यामुळे सन 2016 मध्ये उष्माघाताचे 438 रूग्ण आढळून आले यापैकी 07 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना कृती आराखडा 2016 मध्ये राबविण्याकरिता 36 हजार 124 वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व इतर सदस्यांना प्रशिक्षण दिले.जनसहभागाने 429 पाणपोई सुरू करण्यात आले, दुपारी विश्रांती घेण्यास थंड विसावा मिळण्याकरिता 119 उद्यांनांमध्ये व्यवस्था केली. बॅनर, पोस्टर, हँडबिल्सद्वारे जनजागृती करण्यात आली.
यावर्षी देखील गेल्या आठवड्यात तापमानात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे 1 एप्रिल 2017 ते 30 जून 2017 या कालावधीत सन 2016 प्रमाणे नागपूर शहरातील जनसामान्यांकरिता उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याचे निर्देश महानगरपालिका आरोग्य विभागाला देण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment