नागपूर, दि. 21 : राज्य शासनाने शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास कार्यक्रमाचा अधिकाधिक उपयोग करुन आपला विकास साधावा असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्यांक व वक्फबोर्ड, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज केले.
मेहमूदा सिनम आणि महिला ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या सिखो और कमाओ या योजनेच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ. अनिस अहमद, आमदार सर्वश्री प्रा.अनिल सोले, समीर मेघे, माजी महापौर सरदार अटल बहादूर सिंग, मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर, महंमद सगिम फारुखी, हाजी अब्दुल काजी, जोसेफराव, डॉ. साजीद अहमद उपस्थित होते.
प्रारंभी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन व कमवा व शिका या योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आजच्या पालकांनी विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे याचा आग्रह न धरता त्याला कोणत्या क्षेत्रात आवड आहे व तो कोणत्या क्षेत्रात यशस्वी होईल याचा निर्णय विद्यार्थ्याला घेवू द्यावा.
ते पुढे म्हणाले की, आजचा विद्यार्थी हा दुसऱ्याचे अनुसरण लवकर करतो. परंतू त्याने आपले स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्यातील कलागुणांना वाव दिला पाहिजे. यातून तो आपला विकास साध्य करु शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विनोद तावडे पुढे म्हणाले की, प्रधान मंत्र्यांचा कौशल्य विकास हा महत्वकांक्षी कार्यक्रम असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना चालना द्यावी.
यावेळी संस्थेचे चेअरमन आणि माजी मंत्री डॉ. अनिस अहमद यांनी सांगितले की, नागपूर शहर विकासाकडे वाटचाल करत असून शहरात नवीन नवीन प्रकल्प येत असल्यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शिका आणि कमवा ही केंद्र व राज्य शासनाची योजना असून या योजनेचा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना आपले पुढील शिक्षण करणे सोपे होईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मेहमूदा सिनम आणि महिला ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे नागपूर शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
*******
No comments:
Post a Comment