Friday, 21 April 2017

युवकांनी नवीन क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा --- विनोद तावडे



नागपूर, दि. 21 :  अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून विदर्भात औद्योगिक प्रकल्प उभे राहतअसून या प्रकल्पात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रिडा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केला.
हिंगणा येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली दिक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे संस्थापक माजी खासदार दत्ता मेघे, आमदार समीर मेघे, सागर मेघे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थ काणे उपस्थित होते.
शालेय मंत्री विनोद तावडे दिक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांना पदव्या तर मिळाल्या परंतु पुढे काय हा प्रश्न निर्माण होतो. परंतू आज वेगवेगळ्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. त्या संधीची युवकांनी किती लाभ घ्यावाच हे त्यांनीच ठरवावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, वेगवेगळ्या क्षेत्रात आजचा युवक वाटचाल करत आहे. परंतू युवकांनी आपला व्यवसाय, उद्योग सांभाळून समाजाला आपण काय देवू शकतो याचाही विचार प्राधान्याने करायला पाहिजे. आपण व आपले कुटुंब सुखी झाले म्हणजे सर्व झाले असे न समजता शाश्वत परिभाषा युवकांनी समजुन घेतली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तावडे पुढे म्हणाले की, आजचे तरुण डॉक्टर, इंजिनिअर बनून समाजाची सेवा करतात. परंतू काही डॉक्टर पैशाच्या लोभापायी पोटातील कोवळ्या मुलींना मारतात, असे डॉक्टरही समाजाला नको आहेत.   
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थ काणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनात पदवीला अतिशय महत्व असून गुरु शिवाय ज्ञान मिळू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरुला महत्वाचे स्थान असून विद्यार्थी घडवतांना गुरुजनांनी विद्यार्थ्याला ज्ञानाबरोबरच समाजातील घडणाऱ्या घडामोडीबाबत अवगत करावे.
प्रारंभी यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील 32 पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदक देवून सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेतर्फे 992 पदवी व 223 पदव्युत्तर पदवी उपस्थितांच्या हस्ते बहाल करण्यात आल्या.
या समारंभात 2015-16 मधील आकांक्षा त्यागी, पुजा जयस्वाल, अश्विन शाहू, श्रद्धा कळाळकर या चार गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रास्ताविक प्राचार्य उदय वाघे यांनी केले.

*******

No comments:

Post a Comment