नागपूर दि. 29 : ज्ञानाची साधना अखंडित
प्रक्रिया असून विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी आणि सत्याचा शोध घेवून ते
मांडण्याची तळमळ विधिज्ञांनी सतत बाळगावी
असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राष्ट्रीय विधी
विद्यापीठाचे कुलपती एस. ए. बोबडे यांनी केले.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, यांच्या
वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथे पहिल्या जी.
एल. सांघी स्मृती व्याख्यान मालेचे आयोजन
करण्यात आले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती एस. ए. बोबडे,
मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी, दिल्ली उच्च न्याचालयाचे
न्यायमूर्ती विपिन सांघी, महाराष्ट्र
राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजेंदर कुमार व्यासपीठावर उपस्थित होते.
उत्कृष्ट
विधिज्ञ कसा असावा याबाबत विचार मांडतांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती एस. ए. बोबडे म्हणाले, कायद्याच्या
व्यवसायाचे क्षेत्र सर्वच विषयांशी निगडीत असते. त्यामुळे कायदे क्षेत्रातील व्यावसायिकांनी, विधिज्ञांनी चतुरस्त्र असणे गरजेचे असते.
कारण त्यांच्यासमोर सोडवणुकीसाठी नेहमीच विविध विषयातील क्लिष्ट प्रश्न समोर येत
असतात. या सर्वांची उकल करण्यासाठी विधिज्ञांनी माहिती तंत्रज्ञानासह विविध
विषयातील ज्ञान संपादित करणे आवश्यक ठरते. विधिज्ञांनी न्याय मिळवून
देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे व या
प्रक्रियेत तत्त्वाशी तडजोड कधीही करु नये. विधिज्ञांनी समाजाबद्दल कृतज्ञता बाळगत
समाज, न्यायालय आणि पक्षकारांशी कायम निष्ठा बाळगावी. विविध प्रकरणांमध्ये
विश्लेषणात्मक दृष्टिकोन जागृत ठेवून माहिती आणि ज्ञान याबरोबरच मानवी स्वभावातील
नैसर्गिक क्रिया-प्रतिक्रियांचे भानही बाळगावे असेही श्री. बोबडे यांनी सांगितले.
स्वातंत्र्यचळवळीतही
अनेक विधिज्ञांचे योगदान अतिशय मोलाचे होते. असे सांगून न्यायमूर्ती बोबडे
म्हणाले, विधिज्ञ जी. एल. सांघी यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. कायद्याच्या
विविध शाखांचा सांघी यांचा प्रगाढ अभ्यास होता. निर्भयता आणि त्याबरोबरच विनयशीलता
हा त्यांचा स्थायी भाव होता. प्रतिपक्षाच्या वकीलांचाही आदर करणारे सांघी
तत्त्वनिष्ठ होते. सांघी यांचा आदर्श
आजच्या पिढीतील सर्वच विधिज्ञांनी डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहनही श्री. बोबडे
यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ.
विजेंदर कुमार म्हणाले, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ मानांकनाचे विविध
टप्पे गाठत असून विद्यापीठात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी विविध
व्याख्याने, परिषदा तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय
न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी म्हणाले,
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ कायदे क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षणसंस्था
सिद्ध होत आहे. न्यायसंस्थेकडे नेहमीच विविध प्रश्नांची सोडवणूक करणारी व्यवस्था
म्हणून पाहिले जाते. विविध तत्त्वज्ञानातील शिकवणींचा गाभा महत्त्वपूर्ण असून ही
शिकवण मोकळ्या मनाने आणि बुद्धीने स्वीकारली पाहिजे. असे श्री. धर्माधिकारी यांनी
सांगितले.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विपीन सांघी म्हणाले,
जी. एल. सांघी संशोधक वृत्तीचे होते. न्यायालयाचा आदर राखणे, पक्षकारांशी निष्ठा
बाळगणे तसेच कायद्यातील विविध तरतुदींचा सांगोपांग अभ्यास ही त्यांची
गुणवैशिष्ट्ये होती. सांघी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमाला कायद्याच्या
विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उद् बोधक ठरेल असेही श्री. विपिन सांघी यांनी सांगितले.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे
प्रबंधक डॉ. एन. एम. साकरकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मेधा दीक्षित
यांनी केले.
या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त
न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, न्यायमूर्ती आर. के. देशपांडे, न्यायमूर्ती एम. एस.
संकलेचा, न्यायमूर्ती पी. एन. देशमुख, न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे, न्यायमूर्ती ए.
एस. चांदुरकर, न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे, न्यायमूर्ती श्रीमती इंदिरा जैन, न्यायमूर्ती श्रीमती
स्वप्ना जोशी, न्यायमूर्ती रोहीत देव,
न्यायमूर्ती मनीष पितळे तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व
मान्यवर उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment