Thursday, 27 July 2017

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबवा -जिल्हाधिकारी

नागपूर, दि. 26 :  जिल्हयात सप्टेंबरच्या पंधरवडयात कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. समाजातील कुष्ठरुग्णांना शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराने बरे करुन कुष्ठरोग निर्मूलन करायचे आहे. हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवत कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे  यांनी दिल्या.
            कुष्ठरुग्णांच्या विविध अडचणी व समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कुष्ठरोग शोध अभियान 2017-18 कार्यक्रम राबविण्याकरिता जिल्हास्तरीय वैद्यकीय अधिकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली  छत्रपती सभागृहामध्ये घेण्यात आली.
            यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. माध्यमा चहांदे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत बडगे, महानगरपालिकेचे नोडल अधिकारी डॉ. एम ख्वाजा मोईनुद्दीन, शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. यू. बी. नावाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत हजारे, डॉ. संजय मानेकर, डॉ. अनुपमा खोडे, डॉ. हेमलता वर्मा यांची उपस्थिती होती.
            प्रधानमंत्री प्रगती योजनेंतर्गत कुष्ठरोग निर्मुलनासाठी कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. दिनांक 5 ते 20 सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार आहे. आरोग्य सेवेपासून वंचित असलेल्या शहरातील भागात 7 लाख 54 हजार व ग्रामीण भागातील 22 लाख 73 हजार एकूण 30 लाख 27 हजार लोकसंख्येचा कुष्ठरोग शोध अभियाना दरम्यान सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी दिली.
            यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांना कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यासाठी व कुष्ठरोगाविषयी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, नर्सिंग  स्कूलचे विद्यार्थी, समाजसेवक, एन. एस. एस. चे विद्यार्थी यांच्या मदतीने  सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या.
            तसेच या अभियानासाठी आवश्यक ती मदत व सर्व प्रयत्न करण्यात येणार असून, राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये व एकूण 234 तालुक्यांमध्ये जिल्हा समन्वय समिती व  तालुका समन्वय समितीच्या माध्यमातून  कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment