नागपूर, दि.29 जागतिक आरोग्य संस्थेने 2030 पर्यंत भारताला क्षयमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंतच भारताला क्षय-रोग मुक्त करण्याचे ध्येय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला ठेवण्यास सांगितले आहे. त्या दृष्टिने क्षय-रोगाचे नियंत्रण व निदान करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री. फग्गन सिंह कुलस्ते यांनी आज नागपूर येथे केले.
‘क्षयरोगाचे प्रभावी भागीदारीव्दारे निर्मूलनासाठी राज्य व केंद्रस्तरीय राष्ट्रीय परिषदेच्या’ दोन दिवसीय समीटच्याउद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार सर्वश्री, डॉ. विकास महात्मे, अशोक नेते, नाना पटोले, कृपाल तुमाने, आमदार डॉ. मिलिंद माने प्रामुख्याने उपस्थित होते. या परिषदेचे आयोजन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या केंद्रीय क्षयरोग (विभाग), महाराष्ट्र शासन व जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतातील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
जगातील क्षयरोग्यांपैकी 27 टक्के क्षयरोगी हे भारतात असून दरवर्षी भारतात 28 लाख लोक क्षयरोगाने ग्रस्त होतात. तसेच दरवर्षी 4 लाख 80 हजार रुग्ण मृत्युमुखी पडतात. यावर उपाययोजना करण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यकमाअंतर्गत नवीन रणनिती आखली. या रणनिती अंतर्गत क्षय रोगाच्या मृत्यू दरात घट आणणे, औषध प्रतिरोधकता(ड्रग- रेझिस्टंन्ट) क्षयरोग-प्रकरणांचे प्रभावीपणे नियंत्रण करणे व एच.आय.व्ही. बाधित क्षयरोग रुग्णांचे निदान करणे या तीन गोष्टीवर भर देण्यात आला आहे. क्षय-रोगाच्या विरुद्ध संघर्षामध्ये केंद्र शासनाच्या प्रयत्नासोबतच जनता, वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स, स्वयंसेवी संस्था, राज्य व केंद्राचे विविध आरोग्य विभाग यांच्या समन्वयित प्रयत्नांची व लोकसहभागाची नितांत आवश्यकता आहे, याचा यावेळी श्री. कुलस्ते यांनी आवर्जुन उल्लेख केला.
ग्रामीण क्षेत्रामध्ये क्षय-रोगासंदर्भात जन-जागृती करणे आवश्यक आहे असे सांगून सुधारित राष्ट्रीय क्षय रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत आतापर्यंत 14 लाख रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे व 3.2 लक्ष रुग्णांचे प्राणही वाचविण्यात यश मिळाले आहे, 18 लाख क्षयरोग्यांची नव्याने नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी कुलस्ते यांनी दिली.
राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी याप्रसंगी क्षय-रोगाच्या सामाजिक पैलूंबाबत उपस्थितांना माहिती दिली. क्षय-रोगी आपला आजार समाजासमोर सांगण्यास संकोच करतात. क्षयरोग हा गरिबांपुरता मर्यादित नसून तो कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे अशा परिषदेच्या माध्यमातून जन-जागृती होणे आवश्यक आहे. 79 टक्के रुग्ण हे क्षयरोगासाठी खाजगी वैद्यकीय सेवेचा लाभ घेतात, तर 21 टक्के रुग्ण हे शासकीय वैद्यकीय सेवेचा वापर करतात. यासाठी खाजगी वैद्यकीय सेवा घेणा-या रुग्णांचीही नोंद सरकारतर्फे घेतली जात असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाचे महासंचालक, डॉ. जगदीश प्रसाद यांनीही याप्रसंगी वैद्यकीय व्यावसायिकांना क्षयरोग्यासाठी उपलब्ध असणा-या शासनाच्या विविध योजना संदर्भात जन-जागृती करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महाराष्ट्रात 1.7 लक्षरुग्ण मागच्या वर्षापर्यंत क्षयरोगाने ग्रस्त असल्याची माहिती दिली. कालपर्यंत 600 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून यातीक 40 रुग्ण हे नागपुरात आढळले आहेत, असेही त्यांनी सांगितले. या रोगाच्या नियंत्रणाकरीता रुग्णांच्या स्पुटमचे निरीक्षण करण्यासाठी एक्स-रे मशीन आदिवासी बहुल भागातही बसविल्या आहेत. या परिषदेद्वारे सर्वच भागधारकांना क्षय-रोग निर्मूलनाविषयीच्या नव्या गोष्टी शिकण्यास मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या परिषदेप्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाचे उप-महासंचालक, डॉ. सुनील खापर्डे व अतिरिक्त महासंचालक , डॉ. गडपायले यांनीही मनोगत व्यक्त केले. या परिषदेस देशाच्या व राज्याच्या विविध भागातून आलेले वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर्स, महारा ष्ट्रातील वैद्यकीय संचालनालयाचे अधिकारी, क्षयरोग नियंत्रण अधिकारी, खाजगी क्षेत्रातील भागधारक व इंडियन असोसिएशन ऑफ पार्लेमेंटीरीयन ऑन पॉप्युलेशन अॅन्ड डेव्हलपमेंट (आय.ए.पी.पी.डी.) या संस्थेचे पधाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment