राज्याच्या
ग्रामीण भागातील महिला व 11-19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये
वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करण्यासह त्यांना माफक दरात सॅनिटरी
नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्यासाठी अस्मिता योजना राबविण्याचा निर्णय आज
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मासिक
पाळीच्या काळात योग्य ती काळजी न घेतल्याने महिला आणि मुलींमध्ये प्रजननाशी निगडीत
अनेक समस्या निर्माण झाल्याचे ग्रामीण भागात घेण्यात आलेल्या आरोग्यविषयक
सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. तसेच 11-19 वयोगटातील
किशोरवयीन मुली सर्वसाधारणपणे वर्षातील 50 ते 60 दिवस मासिक
पाळीच्या काळात शाळांमध्ये अनुपस्थित राहण्याचे प्रमाण वाढलेले आहे. हे
टाळण्यासाठी ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छता व
आरोग्याच्या काळजीबाबत जनजागृतीची गरज ओळखून ही योजना राबविण्यात येत आहे.
योजनेंतर्गत उमेदपुरस्कृत स्वयंसहाय्यता समुहांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील
महिलांना व किशोरवयीन मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्यात येणार
आहे. तसेच या समूहांच्या माध्यमातुन आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित माहिती, शिक्षण आणि
जनसंवाद IEC (Information, Education and Communication) विषयक
साहित्य तयार करणे व विविध बैठकांमार्फत महिला- मुलींमध्ये याबाबत प्रसार करण्यात
येणार आहे.
अस्मिता
योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाव्दारे ग्रामीण भागात महिलांना अस्मिता या ब्रँड
नावाने 240 मी.मी., Trifold, winged आठ सॅनेटरी नॅपकिन्स
24 रुपये
प्रती पॅकेट व 280 मी.मी., Trifold, winged आठ सॅनेटरी नॅपकिन्स
29 रुपये
प्रती पॅकेट याप्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्हा
परिषदेच्या शाळांमधील 11-19 या वयोगटातील मुलींना 5 रुपये
प्रति पॅकेट या सवलतीच्या दराने सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
तसेच या योजनेंतर्गत सॅनिटरी नॅपकिन्सची मागणी नोंदविण्यासाठी व पुरवठा करण्यासाठी
विशिष्ट ॲप तयार करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या
या योजनेच्या अंमलबजावणीकरीता नोडल एजन्सी म्हणून उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण
जिवनोन्नती अभियान) तर कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त संचालक हे नोडल अधिकारी
म्हणून काम पाहणार आहेत.
ग्रामीण
भागातील महिलांना व 11-19 या वयोगटातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलींना वगळून इतर
किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सार्वजनिक आरोग्य
विभागाच्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेबाबत संबधित विभागाच्या समन्वयाने
अस्मिता योजना राबविण्यात येणार आहे.
-----०-----
No comments:
Post a Comment